Thursday, 26 November 2026

सुरक्षित अन्न व पोषक आहाराबाबत जिल्हास्तरीय समितीची त्रैमासिक बैठक संपन्न शालेय विद्यार्थ्यांसाठी 1 ते 15 डिसेंबरदरम्यान निबंध व पोस्टर स्पर्धांचे आयोजन; जनजागृतीसाठी वॉकथॉन व सायकल रॅली





 

 


 

जालना, दि. 26 (जिमका) : अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सुरक्षित अन्न व पोषक आहार विषयक जिल्हास्तरीय सल्लागार समितीची त्रैमासिक बैठक जिल्हाधिकारी  आशीमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली.

या बैठकीत जिल्हाधिकारी यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाने मागील तीन महिन्यांत केलेल्या कामकाजाचा आढावा घेतला. समितीचे सचिव तथा सहायक आयुक्त श्री. निखिल कुलकर्णी यांनी सणासुदीच्या काळात राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमा, शाळा, वसतिगृहे व अंगणवाड्यांची तपासणी, तसेच आयोजित कार्यशाळा आणि प्रशिक्षण शिबिरांची माहिती उपस्थितांना दिली. विभागाच्या कामकाजाबाबत जिल्हाधिकारी यांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी 'योग्य आहार चळवळ महाराष्ट्र' या उपक्रमांतर्गत 1 ते 15 डिसेंबरदरम्यान शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध व पोस्टर स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. या स्पर्धांमध्ये शिक्षण विभागाने जास्तीत जास्त शाळांचा सहभाग सुनिश्चित करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.

तसेच सुरक्षित अन्न व पोषक आहाराबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी वॉकथॉन आणि सायकल रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. अंगणवाडी सेविका, स्वयंपाकी व मदतनीस यांच्यासाठी फूड सेफ्टी ट्रेनिंग अँड सर्टिफिकेशन (FoSTaC) प्रशिक्षणही आयोजित करण्यात येणार आहे.

सामंजस्य करारांतर्गत प्राप्त निधीतून मार्चअखेरपर्यंत क्लीन स्ट्रीट फूड हब, हायजिन रेटिंग, थर्ड पार्टी ऑडिट आणि प्रोजेक्ट भोग यांसारखे उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती सहायक आयुक्त निखिल कुलकर्णी यांनी बैठकीत दिली.

या बैठकीस जिल्हाधिकारी  आशीमा मित्तल यांच्यासह समितीचे विविध विभागांचे सदस्य उपस्थित होते.

-*-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment