जालना,
दि. 27 (जिमाका): येथील जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरामध्ये 24.47
कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येणाऱ्या अत्याधुनिक कॅथलॅबचे भूमिपूजन सार्वजनिक
आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते आज पार पडले.
जालना जिल्ह्यात आरोग्य
संवाद यात्रेनिमित्त सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री प्रकाश आबिटकर आले
होते.
यावेळी आमदार अर्जुन
खोतकर, आरोग्य संचालक डॉ. विजय कंदेवाड, आरोग्य उपसंचालक डॉ. कांचन वानेरे, जिल्हा
शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री भुसारे,
वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
जालना शहरात लवकरच
आधुनिक व सुसज्ज अशी कँथलँब सुरु होणार असून, जिल्ह्यातील हृदयविकाराच्या
उपचारासाठी बाहेरगावी जाण्याची गरज नाही. येथील हृदयरोगींना स्थानिक पातळीवरच
महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत मोफत, सुलभ आणि गुणवत्तापूर्ण व खात्रीशीर
उपचार मिळणार असल्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री प्रकाश आबिटकर
यांनी सांगितले.
हृदयविकाराच्या उपचारात
पहिला एक तास हा सुवर्णकाळ असतो. कॅथलॅबमुळे तो वेळ प्रवासात वाया जाणार नाही.
त्यामुळे जिल्ह्यातील जनतेला जागतिक दर्जाची हृदय उपचार सुविधा जिल्ह्यातच मिळणार,
ही जालन्यासाठी अत्यंत अभिमानाची व आनंदाची बाब असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी
सांगितले.
कॅथलॅब म्हणजे काय ? आणि त्याचा फायदा काय ?
कॅथलॅब ही हृदयाच्या
रक्तवाहिन्यांची तपासणी व उपचार करण्यासाठीची अत्याधुनिक सुविधा आहे. यामध्ये
हृदयविकाराचा झटका आल्यास तात्काळ अँजिओग्राफी तपासणी होणार आहेत. गरज पडल्यास
त्याच ठिकाणी अँजिओप्लास्टी, स्टेंट बसविणे शक्य होणार आहे. 24x7 आपत्कालीन हृदयरोग
सेवा उपलब्ध होणार असून, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले
जन आरोग्य योजना अंतर्गत पात्र रुग्णांना मोफत तसेच सवलतीच्या दरात उपचार मिळणार
आहेत. ही कँथलँब सुरु झाल्यानंतर ग्रामीण भागातील गरीब रुग्णांना वेळेत, कमी
खर्चात, जिल्ह्यातच उपचार मिळतील.
जिल्हा शल्य चिकित्सक
डॉ. राजेंद्र एस. पाटील यांनी कॅथलॅबच्या कामाची सविस्तर माहिती दिली. लवकरात लवकर
काम पूर्ण करून कॅथलॅब जनतेच्या सेवेत रुजू करण्याचा मानस यावेळी व्यक्त करण्यात
आला. तसेच सर्व नागरिकांच्या छातीत दुखणे, धाप लागणे, घाम येणे, डावा हात, जबडा
दुखत असल्यास ही हृदयविकाराची लक्षणे दिसत असल्यास रुग्णाने तात्काळ रुग्णालयात
पोहोचावे, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्रीमती सुलोचना पडूळ यांनी केले.
-*-*-*-*-*-*-*-
.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment