जालना, दि. 27 (जिमाका) : मनोरुग्णांच्या वाढत्या संख्येचा विचार करून जालना
तालुक्यातील कुंभेफळ येथील प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम वर्षभरात पूर्ण
करावे, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री प्रकाश आबिटकर यांनी कंत्राटदाराला
दिले. आरोग्य संवाद यात्रेदरम्यान त्यांनी आज या बांधकामाची पाहणी करून कामाच्या प्रगतीचा
आढावा घेतला.
यावेळी
आमदार अर्जुन खोतकर, आरोग्य संचालक डॉ. विजय कंदेवाड, आरोग्य उपसंचालक डॉ. कांचन वानेरे,
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री भुसारे,
वैद्यकीय अधिकारी तसेच आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
कुंभेफळ
येथील प्रादेशिक मनोरुग्णालय दहा जिल्ह्यांतील रुग्णांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. मनोरुग्णांना
आवश्यक उपचार व आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम
निर्धारित कालावधीत पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यामुळे बांधकामाचा वेग दुप्पट करून वर्षभरात
इमारत पूर्ण करण्याच्या सूचना मंत्री आबिटकर यांनी संबंधित कंत्राटदाराला दिल्या.
रुग्णालयासाठी
आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी पदमान्यतेचे प्रस्ताव तातडीने सादर करावेत, असे
निर्देश त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील यांना दिले. रुग्णालयाच्या
बांधकामासह आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया वेळेत पूर्ण करून आरोग्य सुविधांच्या विस्ताराला
गती देण्यावर त्यांनी भर दिला.
-*-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment