जालना,
दि. 27 (जिमाका) :भारतीय संविधान दिनानिमित्त समाजकल्याण विभागाच्या वतीने
गुरुवारी (दि. २६) सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, जालना कार्यालयाच्या प्रांगणात
विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी संविधानाचे महत्त्व, संविधानिक
मूल्ये आणि नागरिकांच्या हक्क व कर्तव्यांबाबत जनजागृती करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सकाळी 8
वाजता सहाय्यक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांच्या हस्ते संविधान रॅलीला हिरवी झेंडी
दाखवून सुरुवात करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन
करून विद्यार्थ्यांनी संविधानिक मूल्यांचा जागर केला.
त्यानंतर सकाळी 10.30 वाजता सामाजिक
न्याय भवन येथे मुख्य कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक
आयुक्त डॉ. अनिता राठोड होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून एस.एस.एस. विधी
महाविद्यालयाचे प्रा. संदीप पटेकर उपस्थित होते. विशेष अधिकारी स्नेहल मोटाळे
यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी संविधानाच्या उद्देशिकेचे
सामूहिक वाचन करण्यात आले. तसेच नशामुक्ती अभियानांतर्गत उपस्थित कर्मचारी आणि
विद्यार्थ्यांनी नशामुक्तीची शपथ घेतली. अध्यक्षीय भाषणात डॉ. अनिता राठोड यांनी
संविधान उद्देशिकेतील समान संधी या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
संविधानातील मूल्ये दैनंदिन जीवनात अंगीकारण्याचे आवाहनही त्यांनी केले. संविधान दिनानिमित्त
विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत त्यांनी संविधानातील मूलभूत तत्त्वांचे महत्त्व
स्पष्ट केले.
प्रमुख वक्ते प्रा. संदीप पटेकर यांनी
संविधानातील मूलभूत मूल्यांवर प्रभावी विचार मांडले. यावेळी लोककलावंत कातुरे व
मंच, जालना यांच्या वतीने संविधानावर आधारित पथनाट्य सादर करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. दिलीप
गिरी, मुख्याध्यापक, मुलांची शासकीय निवासी शाळा, बदनापूर यांनी केले. कार्यक्रमास
समाजकल्याण कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी तसेच जिल्ह्यातील शासकीय वसतिगृहे आणि
शासकीय निवासी शाळांमधील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष अधिकारी
स्नेहल मोटाळे यांनी आभार प्रदर्शन केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
-*-*-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment