जालना,
दि. 27 (जिमाका) : बालविवाहाला प्रतिबंध घालून मुलींचे शिक्षण, सुरक्षितता आणि
सर्वांगीण विकास सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र शासन, जालना जिल्हा प्रशासन,
पोलीस यंत्रणा, सामाजिक संस्था आणि स्थानिक नागरिकांनी एकत्रितपणे पुढाकार घेतला
आहे. बालविवाह रोखण्यासोबतच मुलींना शिक्षण आणि कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध
करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचा निर्धार आंतरराष्ट्रीय बालविवाह
प्रतिबंध दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात करण्यात आला.
महिला व बालविकास विभाग, जालना जिल्हा
प्रशासन आणि युनिसेफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आज (दि. 27) जिल्हाधिकारी
कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी महिला व बालविकास विभागाच्या आयुक्त वर्षा मुकुंद लड्डा, अपर पोलीस
महासंचालक अश्वती दोरजे, जिल्हाधिकारी अशिमा मित्तल, पोलीस अधीक्षक तेघबीर सिंग
संधू यांची उपस्थिती होती.
राष्ट्रीय कुटुंब आरोग्य
सर्वेक्षणाच्या (NFHS-6) आकडेवारीनुसार, महाराष्ट्रातील 17 जिल्ह्यांमध्ये
बालविवाहाचे प्रमाण अधिक असून, त्यामध्ये मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांचा समावेश
आहे. या पार्श्वभूमीवर बालविवाह प्रतिबंधासाठी प्रशासन आणि समाजातील सर्व घटकांनी
समन्वयाने काम करण्याची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जालना
जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तेघबीर सिंग संधू यांनी बालविवाह रोखण्यासाठी
प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर दिला. मुलींना केवळ सहानुभूती दाखविण्याऐवजी
त्यांना सक्षम बनविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांनी
बालविवाहाची माहिती वेळेत मिळणे आणि त्यावर तातडीने कारवाई होणे महत्त्वाचे
असल्याचे सांगितले. बालविवाह रोखण्यासाठी केवळ कायद्याची अंमलबजावणी पुरेशी नाही,
तर मुलींचे शिक्षण सुरू राहणे, आर्थिक अडचणीच्या काळात तसेच हंगामी स्थलांतराच्या
वेळी त्यांच्या कुटुंबांना आवश्यक सहकार्य मिळणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
प्रत्येक मुलीचे हक्क आणि आकांक्षा लक्षात घेऊन समाजाने तिला संधी उपलब्ध करून
द्याव्यात, असे आवाहन त्यांनी केले.
महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास
विभागाच्या आयुक्त वर्षा मुकुंद लड्डा यांनी स्थलांतर करणाऱ्या कुटुंबांतील
मुलींकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता व्यक्त केली. जालना जिल्ह्यात
बालविवाहाच्या घटनांचे प्रमाण अधिक असले, तरी अशा घटनांची नोंद होण्याचे प्रमाणही
अधिक आहे, ही सकारात्मक बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. मुलींना शिक्षण, कौशल्य
विकास आणि सर्वांगीण प्रगतीसाठी सातत्याने पाठबळ देणे गरजेचे असल्याचे त्यांनी
सांगितले.
महाराष्ट्रातील महिला व बालकांवरील
गुन्हे प्रतिबंध विभागाच्या अपर पोलीस महासंचालक अश्वती दोरजे यांनी बालविवाह
प्रतिबंधासाठी पोलीस, बाल संरक्षण पथके, प्रशासन, शिक्षक आणि स्थानिक नागरिकांनी
एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले. मुली आणि त्यांच्या कुटुंबांना सातत्याने
सहकार्य मिळणे आवश्यक असल्याचे सांगून, बालविवाहाबाबत जनजागृती करण्यासाठी 'पोलीस
दीदी' आणि 'पोलीस काका' या उपक्रमांचा विस्तार करण्यात येणार असल्याचे त्यांनी
स्पष्ट केले. तसेच बालविवाहाच्या नोंदविलेल्या प्रकरणांमध्ये वेळेत आणि प्रभावी
प्रतिसाद मिळण्यासाठी चाइल्ड हेल्पलाइन सेवांशी समन्वय अधिक मजबूत करण्यावर
त्यांनी भर दिला.
मुलींच्या
अनुभवांना मिळाला व्यासपीठ
या कार्यक्रमातील विशेष बाब म्हणजे
बालविवाह रोखण्यासाठी आणि आपले शिक्षण सुरू ठेवण्यासाठी प्रशासनाकडून मिळालेल्या
सहकार्याचे अनुभव सहा मुलींनी उपस्थितांसमोर मांडले. त्यांच्या अनुभवातून
मुलींच्या शिक्षणासाठी आणि संरक्षणासाठी प्रशासनाच्या मदतीचे महत्त्व अधोरेखित
झाले. यावेळी जालना जिल्हा प्रशासन आणि रोटरी क्लब ऑफ इंडिया यांच्या संयुक्त
विद्यमाने तयार करण्यात आलेली 'शुभ मंगल सावधान' ही जनजागृतीपर चित्रफीत प्रदर्शित
करण्यात आली.
हंगामी
स्थलांतरित कुटुंबांतील बालकांच्या संरक्षणासाठी मार्गदर्शिका
बालविवाह आणि हंगामी स्थलांतर
यांच्यातील परस्परसंबंध लक्षात घेऊन 'स्टेइंग बॅक, मूव्हिंग फॉरवर्ड : प्रोटेक्शन
ऑफ चिल्ड्रन अफेक्टेड बाय सिझनल मायग्रेशन, अ किनशिप अँड कम्युनिटी केअर मॉडेल' या
मार्गदर्शिकेचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. हंगामी स्थलांतरामुळे बालकांसमोर
निर्माण होणाऱ्या असुरक्षिततेवर उपाययोजना सुचविणारे प्रतिबंधात्मक मॉडेल या
मार्गदर्शिकेत मांडण्यात आले आहे. महिला व बालविकास विभाग, जालना जिल्हा प्रशासन
आणि युनिसेफ यांनी स्वराज व सेक्रेड या संस्थांच्या भागीदारीत ही मार्गदर्शिका
तयार केली आहे.
बालगृहांना
भेट; विभागीय कामकाजाचा आढावा
कार्यक्रमानंतर मान्यवरांनी शासकीय
बालगृह, निरीक्षण गृह आणि शासकीय महिला राज्यगृहाला भेट देऊन तेथील कामकाज व
उपलब्ध सुविधांची माहिती घेतली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित
विभागांची आढावा बैठक घेण्यात आली. महिला व बालविकासाशी संबंधित विविध विभागांमार्फत
सुरू असलेले उपक्रम, आतापर्यंतचे कामकाज आणि भविष्यातील नियोजन यांचा आढावा
घेण्यात आला. बालकांच्या संरक्षणासाठी विविध विभागांमधील समन्वय अधिक प्रभावी
करण्याबाबतही चर्चा करण्यात आली.
दिवसभरातील कार्यक्रमांचा समारोप
मोतीबाग येथे आयोजित युवक सहभाग उपक्रमाने झाला. या उपक्रमातून युवकांचा बालविवाह
निर्मूलन चळवळीतील सक्रिय सहभाग वाढविणे, बालहक्क, मुलींचे शिक्षण आणि लैंगिक
समानता याबाबत जनजागृती करण्यावर भर देण्यात आला.
या कार्यक्रमाला सुमारे 250 शासकीय
अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, बाल संरक्षण यंत्रणेतील कर्मचारी, स्थानिक नागरिक
आणि बालविवाह निर्मूलनासाठी कार्यरत चॅम्पियन्स उपस्थित होते. बालहक्क आणि
बालविवाह निर्मूलनासाठी राज्यभर आठवडाभर राबविण्यात आलेल्या जनजागृती मोहिमेचा
समारोपही यावेळी करण्यात आला.
-*-*-*-*-*-*-*-*-
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment