धर्म, सत्य आणि मानवतेसाठी आपले सर्वस्व अर्पण करणारे नववे शीख गुरु श्री गुरु तेग बहादूर सिंह जी यांचे बलिदान भारतीय इतिहासात अजरामर आहे. “हिंद की चादर” म्हणून ओळखले जाणारे गुरु तेग बहादूर जी हे केवळ शीख समाजाचेच नव्हे, तर संपूर्ण भारतवर्षातील धर्मस्वातंत्र्याचे महान रक्षक होते. त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि त्यांच्या विचारांचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शीख समाज, सिंधी समाज, बंजारा समाज आणि लुबाणा समाज यांच्या संयुक्त विद्यमाने, नांदेड येथे येणाऱ्या 24 व 25 जानेवारी, 2026 रोजी भव्य “हिंद की चादर” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
गुरु तेग बहादूर जी : धर्मस्वातंत्र्याचे महान रक्षक
गुरु तेग बहादूर सिंह जी (1621–1675) हे शीख धर्माचे नववे गुरु होते. त्यांनी जबरदस्तीने धर्मांतराच्या विरोधात उभे राहत काश्मिरी पंडितांच्या धर्मरक्षणासाठी आपले प्राण अर्पण केले. त्यांनी कोणत्याही एका धर्मासाठी नव्हे, तर सर्व धर्मांच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले. दिल्लीतील चांदणी चौक येथे त्यांनी दिलेले बलिदान आजही मानवतेचा, सहिष्णुतेचा आणि धैर्याचा सर्वोच्च आदर्श मानले जाते.
शासनाची दूरदृष्टी आणि सहकार्य
“हिंद की चादर” हा उपक्रम केवळ एक कार्यक्रम नसून, तो समाजात ऐक्य, सहिष्णुता आणि इतिहासाबद्दलची जाणीव निर्माण करणारा व्यापक प्रयत्न आहे. या उपक्रमासाठी महाराष्ट्र शासन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या पुढाकाराचे विशेष कौतुक करावे लागेल. नांदेड येथे होणाऱ्या “हिंद की चादर” कार्यक्रमासाठी विविध समन्वय बैठकांचे आयोजन करून प्रशासन व समाज यांच्यात उत्कृष्ट समन्वय साधुन या भव्य कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येत आहे.
“हिंद की चादर” कार्यक्रमाने गुरु तेग बहादूर जी यांच्या विचारांनी भाविकांना नवसंजीवनी मिळणार आहे. धर्मस्वातंत्र्य, मानवता आणि सत्यासाठी उभे राहण्याची प्रेरणा देखील या कार्यक्रमातून जनतेला मिळणार आहे. विविध समाजघटकांचा सहभाग आणि महाराष्ट्र शासनाचे सक्रिय सहकार्या मुळे हा भव्य उपक्रम भाविकांसाठी ऐतिहासिक आणि प्रेरणादायी पर्व ठरणार आहे. गुरु तेग बहादूर जी यांनी दिलेला संदेश आजही तितकाच समर्पक आहे - “सर्व धर्मांचा सन्मान करा, अन्यायाविरुद्ध उभे रहा आणि मानवतेचे रक्षण करा.”
या भव्य ऐतिहासिक कार्यक्रमात मोठ्या संख्येन सहभागी व्हा…!
**
अरुण सुर्यवंशी
जिल्हा माहिती अधिकारी
जालना

No comments:
Post a Comment