जालना, दि. 31 (जिमाका) : जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत विविध विभागांकडून राबविण्यात येणाऱ्या कामांचा मासिक आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत जिल्हाधिकारी मित्तल यांनी राज्यस्तरीय यंत्रणांचे विभाग प्रमुखांनी फेब्रुवारी 2026 पर्यंत प्रस्तावित कामांचे सविस्तर नियोजन करून प्रत्यक्ष अंमलबजावणीस सुरुवात करण्याचे निर्देश दिले.
आज दिनांक 31 जानेवारी 2026 रोजी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात राज्यस्तरीय यंत्रणांचे विभाग प्रमुखांची जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2025-2026 मासिक प्रगती अहवाल आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी त्या बोलत होत्या.
या बैठकीस जिल्हा नियोजन अधिकारी सुचित कुलकर्णी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ राजेंद्र पाटील, जिल्हा कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे, जिल्हा रेशीम अधिकारी श्री. अजय मोहिते,कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग श्रीमती स्मिता पवार,नियोजन विभागातील अमोल तोंडे,यांच्या सह संबंधित राज्यस्तरीय यंत्रणांचे विभाग प्रमुखांची उपस्थित होती. जिल्हा वार्षिक योजनेतील निधी वेळेत व परिणामकारक पद्धतीने खर्च होणे आवश्यक असून, मंजूर कामांमध्ये अनावश्यक विलंब होऊ नये, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. प्रत्येक विभागाने आपल्या-आपल्या योजनेतील कामांचा कालबद्ध कृती आराखडा तयार करून प्रगती अहवाल सादर करावा, तसेच प्रलंबित कामांबाबत तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
या बैठकीत कृषी, पशुसंवर्धन, आरोग्य, मत्स्य व्यवसाय, बांधकाम विभाग, वनीकरण विभाग, प्रादेशिक परिवहन विभाग, लघु पाटबंधारे, अपारंपरिक उर्जा विभाग, आयटीआय यासह अन्य राज्यस्तरीय यंत्रणांच्या विभागाचा आढावा घेण्यात आला. बैठकीदरम्यान विविध विभागांकडील सुरू असलेल्या व प्रस्तावित कामांचा आढावा घेण्यात आला. कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड न करता नागरिकांना थेट लाभ मिळेल अशा योजनांना प्राधान्य देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिले.

No comments:
Post a Comment