जालना, दि.१३ (जिमाका):
जालना शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर शहरात आदर्श आचारसंहितेची कडक अंमलबजावणी सुरू असतानाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील सावरकर चौक, सिंधी बाजार भागात कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आधार कार्ड, पॅन कार्ड आणि मतदान ओळखपत्रे बेवारस अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची निवडणूक प्रशासनाने गंभीर दखल घेत संबधितांविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
*घटना आणि प्रशासकीय कारवाई*
दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी आचारसंहिता कक्षाकडे सावरकर चौक परिसरात महत्त्वपूर्ण शासकीय ओळखपत्रे कचऱ्यात टाकण्यात आल्याची तक्रार प्राप्त झाली होती. अतिरिक्त आयुक्त अर्जुन गिराम यांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तातडीने भरारी पथकास (FST) घटनास्थळाची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. भरारी पथकाचे प्रमुख डी. एन. हिवराळे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता, तक्रारीत तथ्य असल्याचे निष्पन्न झाले.
*पोलीस तक्रार आणि कलमे*
अतिरिक्त आयुक्तांच्या लेखी आदेशानुसार (जा.क्र. १११), पथक प्रमुख हिवराळे यांनी पोलीस प्रशासनाकडे रीतसर तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी खालील कलमान्वये गुन्हा (FIR No. 0026/2026) नोंदवला आहे:
भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ - कलम २२३
लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५०, १९५१ व १९८९ - कलम १२३
*प्रशासनामार्फत दोषींवर होणार कारवाई*
आचारसंहिता नोडल अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांनी सांगितले की, निवडणूक प्रक्रियेशी संबंधित कागदपत्रे किंवा मतदारांच्या ओळखपत्रांबाबत निष्काळजीपणा करणे किंवा त्यांचा गैरवापर करणे हा गंभीर फौजदारी गुन्हा आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल रामकिसन पांडुरंग वाघमारे करत आहेत.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा आयुक्त श्रीमती आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक यंत्रणा अशा प्रकारच्या प्रत्येक तक्रारीवर २४ तासांच्या आत कार्यवाही करत आहे.
No comments:
Post a Comment