Monday, 19 January 2026

जिल्ह्यात 'हिंद-दी-चादर’ कार्यक्रमाची व्यापक जनजागृती करावी - अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे

 



जालना, दि.19 (जिमाका) : 'हिंद दी चादर’ श्री गुरू तेग बहादूर जी यांच्या 350 व्या शहिदी समागम वर्षानिमित्त देशभर विविध प्रबोधनपर कार्यक्रमाचे 24 व 25 जानेवारी, 2026 रोजी नांदेड येथे भव्य आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमास जिल्ह्यातील भाविकांना उपस्थित राहता यावे, यासाठी विविध माध्यमातून व्यापक जनजागृती करण्यात यावी असे निर्देश जिपचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे यांनी दिले आहे. 

जिल्हा परिषदेत 'हिंद दी चादर’ या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आयोजित प्रचार प्रसिध्दी नियोजन आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा क्रिडा अधिकारी नरेंद्र पवार, शिक्षणाधिकारी बी. आर. खरात, जिल्हा समाज कल्याण अधिकारी लिंबाजी बारगिरे आणि उपशिक्षणाधिकारी संजय कायंदे  यांची उपस्थिती होती.

श्री. बनसोडे म्हणाले की, श्री गुरू तेग बहादूर जी यांच्या महान कार्याचा आणि हौतात्म्याचा इतिहास विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वत्र पोहोचविण्यासाठी हिंद दी चादर या ऐतिहासिक कार्यक्रमाचे नांदेड येथे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास देश-विदेशातील भाविकांची उपस्थिती राहणार आहे.या ऐतिहासिक कार्यक्रमाची माहिती जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांना व्हावी यासाठी विविध माध्यमातून व्यापक जनजागृती करण्यात यावी. जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयामध्ये प्रभात फेरीचे आयोजन करुन, सतिंदर सरताज यांचे भक्ती गीत गायन स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, चित्रकला स्पर्धांचे आयोजन करुन या माध्यमातून श्री गुरु तेग बहादूर जी यांचे महान कार्य आणि हौतात्म्याचा इतिहासाची माहिती विद्यार्थी-विद्यार्थीना देण्यात यावी. तसेच या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडिया, सोशल मिडिया, होर्डिग्स, फ्लेक्स, प्रसिध्दी पत्रके, चित्ररथ, शासकीय-निमशासकीय कार्यालये, चित्रपट गृहे, बस स्थानक, रेल्वे स्टेशन, मुख्य चौक व मुख्य रस्त्यांवर फ्लेक्स, बॅनर, होर्डिग्स् आदीच्या माध्यमातून व्यापक जनजागृती करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने, जिल्हा, तालूका आणि ग्रामस्तरीय समितीच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येक गावातील घरा-घरात श्री गुरू तेग बहादूर जी यांच्या हौतात्म्याचा इतिहास पोहोचविला जाणार आहे. तसेच शीख, सिकलीगर, बंजारा, लबाना, मोहयाल, सिंधी  आदी समाजातील समन्वय समितीच्या माध्यमातून देखील या कार्यक्रमाचा प्रचार व प्रसार करण्यात येत आहे.

शीख, सिकलीगर, बंजारा,लबाना, सिंधी, मोहयाल, वाल्मिकी, उदासीन आणि वारकरी संप्रदायातील भगत नामदेव समाजामार्फत देखील जिल्ह्यात श्री गुरू तेग बहादूर जी  यांचे विचार विविध माध्यमातून घरा-घरात पोहचवून या कार्यक्रमाची व्यापक जनजागृती करण्यात येणार आहे.

-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment