Tuesday, 13 January 2026

हिंद-दी-चादर : श्री गुरु तेगबहादर जी

 

 

शीख धर्माचा इतिहास खूप विस्तृत असा आहे. पंथाच्या जवळपास 240 वर्षाच्या इतिहासात दहा देहधारी गुरु अवतरले. तसेच अकरावे व अटल गुरु म्हणून श्री गुरु ग्रंथसाहिब यांचा उदय वरील कालावधीत झाला. शीख पंथाने आज पर्यंत अनेक शताब्दी पर्व साजरे केलेले आहेत. सोबतच गुरपुरब, ऐतिहासिक संस्मरण आणि  विशेष सप्ताह सारखे प्रसंग श्रद्धाभावाने पाळले आहेत. आज आपण श्री गुरु तेगबहादर जी यांचा 350 व्या शहीदी संस्मरणाला सामोरे जात आहोत. तसेच श्री गुरु गोबिंद सिंघजी महाराज यांना गुरुगादीवर विराजमान होण्याचा देखील 350 वा गुरपुरब साजरा करत आहोत.

पूर्वी शीख धर्माच्या विविध शताब्दी पर्वाचे किंवा विविध संस्मरणाचा संबंध फक्त शीख धर्मापुरता मर्यादित होता. पण श्री गुरु तेगबहादरजी यांच्या शहीदीची साढे तीन शताब्दी शीख धर्मापर्यंत मर्यादित नसून भारत भूमिवर वावरत असलेल्या अनेक जाती धर्मापर्यंत विस्तृत आहे. म्हणून संपूर्ण देशात आणी विदेशात देखील या शताब्दी दिवसा विषयी मोठी श्रद्धा निर्माण झालेली आहे.

मुघल बादशाह औरंगजेब याच्या शासनकाळात, 11 नोव्हेंबर, 1675 रोजी दिल्लीच्या चांदनी चौक येथे श्री गुरु तेगबहादरजी यांनी हौतात्म्य स्वीकारले होते. त्या घटनेची आपण सर्वजण तिथिनुसार 24 नोव्हेंबर रोजी, 350 वे शताब्दी वर्ष साजरा करीत आहोत. या 350 शताब्दीला एवढे महत्व मिळण्याचे कारण हेच की श्री गुरु तेगबहादरजी यांनी हिंदू धर्मरक्षणार्थ (भारतातील मूळ धर्म) आपली शहीदी दिली होती. म्हणून गुरु तेगबहादरजी यांना मानणारा विशाल मानव समूह आज हा शताब्दी सोहळा श्रद्धाभावाने साजरा करत आहे.

गुरु तेगबहादरजी यांचा जन्म अमृतसर (पंजाब) मध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गुरु हरगोबिंद साहिब (सहावे गुरु) होते तर आईचे नाव नानकी असे होते. गुरु तेगबहादरजी यांना वयाने चार मोठे भाऊ होते बाबा गुरदित्ताजी, बाबा सूरजमलजी, बाबा अनीरायजी आणि बाबा अटलरायजी तर बहिणीचे नाव बीबी वीरोजी असे होते. गुरु तेग बहादरजी यांचे जन्मनाम त्यागमल होते. पण वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांनी मोघल साम्राज्या विरोधात युद्धात भाग घेत पराक्रम गाजवले होते. त्यांनी युद्धात तेग (तलवार) वापरुन विजय मिळवल्यामुळे त्यांना गुरु हरगोबिंद साहिब यांनी "तेगबहादर" अशी उपाधी प्रदान केली होती. त्यानंतर ते तेगबहादर नावानेच ओळखले जावू लागले.

गुरु तेगबहादरजी यांच्या 54 वर्षाच्या जीवनात अनेक ऐतहासिक घडामोडी घडल्या. त्यांचे समर्पित जीवन, परमेश्वर भक्ति, साधना, वैराग्य, धर्माचे प्रचार-प्रसार आणि विस्तार, धर्मासाठी बलिदान सारख्या असंख्य घटनानी त्यांचे जीवन प्रेरणादायक बनले आहे. गुरु तेगबहादरजी यांच्या कुळातच हौतात्म्य आणि बलिदान करण्याची मोठी परंपरा आहे. त्यांचे आजोबा आणि शीख धर्माचे पाचवे गुरु श्री अर्जनदेवजी हे शीख धर्मातील पहिले शहीद आहेत. तत्कालीन मोघल बादशाह शाहजहाँ याने गुरु अर्जनदेवजी यांना यातना देऊन शहीद केले होते. त्यामुळेच शीख धर्माचे सहावे गुरु श्री हरगोबिंद साहिबजी यांना शास्त्र धारण करावे लागले. गुरु हरगोबिंद साहिबजी यांनी "मीरी" आणी "पीरी" अशा दोन तलवारी धारण केल्या होत्या. संतांची रक्षा आणि प्रजेवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रतिकार म्हणुन त्यांनी मीरी आणी पीरी शस्त्रांचा उपयोग केला. त्यांनी श्री अकाल तखतची रचना केली आणि मोघल साम्राज्याला आव्हान दिले.

गुरु तेगबहादरजी यांच्या हौतात्म्याची परंपरा पुढे दहावे गुरु श्री गुरु गोबिंद सिंघजी महाराज यांच्या कुटूंबीयांनी पार पाडली. गुरु तेगबहादरजी यांच्या पत्नी व गुरु गोबिंद सिंघजी यांच्या आई माता गुजरीजी या सरहिंद फतेहगढ साहिब येथे शहीद झाले. गुरु गोबिंद सिंघजी यांचे चारी पुत्र (साहिबजादा) शहीद झालेत. एका कुटूंबातील चार पिढ्या मोघल साम्राज्याच्या आन्याय-अत्याचारांविरुद्ध प्रतिकार करण्यात शहीद झालेत. असे उदहारण इतरत्र कुठे पाहावयास मिळत नाही.

गुरु तेगबहादरजी यांच्या हौतात्म्याची कथा तर खूप प्रेरणादायी अशी आहे. गुरु तेगबहादरजी यांनी त्यांच्या गुरु काळात श्री आनंदपुर साहिबजी या नगराची रचना व बांधणी केली होती. हे नगर आजही विद्यमान आहे. तत्कालीन मोघल बादशाह औरंगजेब याने काश्मिर राज्य अधिपत्यात घेतल्यानंतर तेथील बहुसंख्य रहिवाशी विरुद्ध अत्याचार सुरु केलेत. इस्लाम धर्म स्वीकारावा अन्यथा जीवन गमवावा लागेल असा फतवाच औरंगजेब याने काढला. हिंदू धर्मियांवर आलेले हे संकट भयावह असे होते. काश्मिरमध्ये राहणाऱ्या हिंदू पंडितांनी सरळ आनंदपुरसाहिबजी गाठून आपली कैफियत गुरु तेग बहादरजी यांच्या पुढे मांडली. हिंदू पंडितांचे नेते कृपाराम यांनी निवेदन केले की हिंदू धर्माच्या रक्षणार्थ आपण काही मार्ग काढावा. गुरु तेग बहादरजी हे सर्व प्रसंग ऐकून चिंतेत पडले. त्यांना चिंतातुर आवस्थेत पाहून बाल गोबिंद राय (गुरु गोबिंद सिंघजी) यांनी चिंतेचे कारण विचारले. आपल्या मुलाचे प्रश्न ऐकून गुरु तेगबहादरजी म्हणाले, हिंदू धर्मावर मोठे संकट आलेले आहे. त्यावर उपाय सापडत नाही. बाल गोबिंदराय म्हणाले, आपल्याकडे उपाय नाही हे शक्यच नाही.

गुरु तेगबहादरजी यांनी खरी समस्या सांगितली आणि म्हणाले, आज वेळ आली आहे की कोणी  थोर महापुरुषाने बलिदान दिले तर समस्त हिंदूची रक्षा होईल शिवाय धर्म ही सुरक्षित राहील. यावर बाल गोबिंद राय चटकन म्हणाले, आपल्यापेक्षा थोर महापुरुष जगात आणखीन कोण आहेत ? आपल्या मुलाचे हे उत्तर ऐकून गुरु तेगबहादरजी प्रसन्न झाले आणी म्हणाले की, आता मला आपल्या पंथाची चिंता राहिली नाही, तु सक्षमपणे पंथ सांभाळू शकतो.

गुरु तेगबहादरजी पंडित कृपाराम यांना म्हणाले, तुम्ही जा आणि औरंगजेबला संदेश पोहचवा की, जर गुरु तेगबहादरजी यांनी इस्लाम धर्म स्विकार केला तर आम्ही सर्वजण 'इस्लाम' स्वीकार करू. पंडित कृपाराम समाधानी होऊन काश्मिरला परतले. त्यांनी तशी घोषणा करुन टाकली. औरंगजेब भयंकर चिडला. त्याने आदेश जारी केले की गुरु तेगबहादर यांना त्वरित अटक करुन माझ्यासमोर उपस्थित करावे.

गुरु तेगबहादरजी यांना आग्रा शहरात अटक झाली. त्यांना दिल्लीत बादशाह औरंगजेब पुढे उपस्थित करण्यात आले. औरंगजेब याने गुरु तेगबहादरजी यांच्या पुढे अट ठेवली की एखादा चमत्कार दाखवा किंवा इस्लाम धर्म स्वीकार करा. गुरुजींनी त्या अटी अमान्य केलेत. चिढलेल्या औरंगजेब याने गुरु तेगबहादर आणि त्यांच्या शिष्यांना भयंकर यातना देण्यास सुरुवात केली. गुरुजींचे शिष्य भाई मतिदास, भाई दयाला आणी भाई सतिदास यांना यातना देऊन गुरूजी समोर हौतात्म्य करण्यात आले. नंतर चांदनी चौक ठिकाणी गुरुजींचे शीरविच्छेद करण्यात आले. भाई जैताजी यांनी दोन साथिदारांसोबत मिळून गुरुजींचे शीश उचलून गुरु गोबिंदसिंघजी यांच्याकडे सोपविण्यात आले. गुरु गोबिंदसिंघजी यांनी वडिलांच्या शीशचे संस्कार केले. दूसरीकडे भाई लक्खीशाह यांनी गुरुजींचे शरीर उचलून रायसीना ठिकाणी स्वताच्या घरी नेण्यात आले. लक्खीशाह याने गुरुजींच्या शरीराचे संस्कार करण्यासाठी स्वतःच्या घराला आग लाऊन टाकली.

गुरु तेगबहादरजी यांच्या बलिदानाच्या घटनेचा वर्णन गुरु गोबिंद सिंघजी यांनी स्वतः रचित वाणी बचित्र नाटक मध्ये केला आहे. अशा बलिदानी गुरु तेगबहादर यांच्या बलिदानास त्रिवार शत शत वंदन आहे. तसेच गुरु तेग बहादर जी यांची इहलोक यात्रा संपल्यानंतर गुरु गोबिंद सिंघजी यांनी बालपणी गुरुगादी सांभाळली. पुढे 33 वर्षे त्यांनी धर्म आणी पंथाचा सांभाळ केला.

 

                                                                                 स. रविंद्रसिंघ मोदी

                                                                                          नांदेड

                                                                                मो. नं. 9420654574

00000

No comments:

Post a Comment