Wednesday, 21 January 2026

खेळ व कलेच्या माध्यमातून मुलांच्या सृजनशीलतेला चालना मिळते – जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

 



जालना, दि.21 (जिमाका) : खेळ व कलेच्या माध्यमातून मुलांच्या सृजनशीलतेला चालना मिळते तसेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास घडतो, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केले. महिला व बालविकास विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय चाचा नेहरू बालमहोत्सवाचा समारोप व बक्षीस वितरण कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या.

           यावेळी व्यासपीठावर प्रभारी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीमती कोमल कोरे, बाल विकास प्रकल्प अधिकारी शहरी एन. डी. वामन यांची उपस्थिती होती.

             यावेळी पुढे बोलतांना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल म्हणाल्या की, अभ्यासासोबतच खेळ, चित्रकला, संगीत, नृत्य, नाट्यकला यांसारख्या उपक्रमांमुळे मुलांमध्ये कल्पकता, आत्मविश्वास, संघभावना व नेतृत्वगुण विकसित होतात. खेळांमधून शिस्त, संयम व सहकार्याची भावना रुजते, तर कलेतून भावना व्यक्त करण्याची क्षमता वाढते.आजच्या स्पर्धात्मक युगात मुलांचा ताण कमी करण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधिक असल्याचे त्यांनी नमूद केले. पालक व शिक्षकांनी मुलांच्या आवडीनिवडी ओळखून त्यांना खेळ व कलेच्या माध्यमातून स्वतःला व्यक्त करण्यासाठी संधी द्यावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी मित्तल यांनी केले.

            पोलीस मुख्यालयाच्या मैदावर दिनांक 19 ते 21 जानेवारी या दरम्यान चाचा नेहरु बाल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात जिल्हयातील शासकीय व स्वयंसेवी बालगृहातील मुलांनी सहभाग घेतला होता. या तीन दिवसीय महोत्सवामध्ये मैदानी खेळामधे कब्बडी, 100 मी. धावणे, गोळा फेक, थाळी फेक, लिंबु-चमचा, पोत्यामधुन चालने तसेच इनडोअर खेळामध्ये - कॅरम, बुध्दीबळ, चित्रकला, निबंध लेखन स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच आज दिनाक 21 जानेवारी रोजी मुलांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा म्हणुन सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये विद्याथ्यांने एकल गायन, समूह गायन, नृत्या कला मध्ये सहभाग घेतला. या कार्यक्रमामध्ये सर्व विजेत्यांना व सहभागी विद्याथ्यांना  जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते बक्षीस व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

-*-*-*-*-*-

 

No comments:

Post a Comment