Wednesday, 21 January 2026

‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमाच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय बैठक संपन्न

 



 

जालना, दि.21(जिमाका) : ‘हिंद-दी-चादर’ म्हणून इतिहासात अजरामर झालेले शीख धर्माचे गुरु, श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहिदी स्मृती वर्षानिमित्त नांदेड येथे 24 व 25 जानेवारी, 2026 होणाऱ्या भव्य कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रम व उपक्रमांचा जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी सविस्तर आढावा घेतला.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, जिपच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पी एम मिन्नू, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधर यांच्यासह उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गट विकास अधिकारी, मुख्याधिकारी आदींची उपस्थिती होती.

यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती मित्तल म्हणाल्या की, श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांनी धर्म स्वातंत्र्य, मानवी हक्क, सहिष्णुता आणि आत्मबलिदानाचे जे मूल्य समाजाला दिले, ती मूल्ये आजच्या काळात अधिकच प्रेरणादायी आहेत. त्यामुळे त्यांच्या जीवनकार्याचा संदेश नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे ही केवळ धार्मिक जबाबदारी नसून, आपले सामाजिक व प्रशासकीय कर्तव्य आहे. 'हिंद-दी-चादर' कार्यक्रमासाठी जालना जिल्हा प्रशासनाकडून आरोग्य सेवा, वाहतूक व्यवस्था आणि स्वयंसेवक आदींची मदत करण्यासाठी प्रत्येक तालूकास्तरावर नियोजन करावे. तसेच आरोग्य तपासणी शिबिरे, जनजागृती, वाहतुकीचे नियोजन आणि सामाजिक संस्थांना यामध्ये सहभागी करुन घ्यावे. जेणेकरून हा ऐतिहासिक सोहळा यशस्वी होईल या दृष्टीने सर्व शासकीय विभाग, शैक्षणिक संस्था व सामाजिक घटकांनी एकत्रितपणे यासाठी काम करणे आवश्यक आहे. तसेच जिल्ह्यातून सहभागी होणारे भाविक, प्रतिनिधी व विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सुविधा, मार्गदर्शन व समन्वय उपलब्ध करून देण्यासाठी परिवहन विभागासह संबंधित यंत्रणांनी पूर्वतयारी करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

-*-*-*-*-*-

 

No comments:

Post a Comment