Wednesday, 30 July 2025

जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी घेतला आढावा

  

 जालना दि. 30 (जिमाका) :- जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) तथा राज्य अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य ललित गांधी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी 3 वाजता जिल्हा प्रशासनासोबत बैठक घेऊन जिल्ह्यातील अल्पसंख्याक बहुल ग्रामीण व नागरी क्षेत्रविकास कार्यक्रमासह अल्पसंख्याकांना देण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेतला.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम., अपर पोलिस अधिक्षक आयुष नोपाणी, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल सुर्यवंशी, जिल्हा व्यवस्थापक एकनाथ कांबळे, सा. बां. कार्यकारी अभियंता स्मिता पवार यांच्यासह संबंधित यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.

जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी म्हणाले की, अल्पसंख्याक समुदायाची लोकसंख्या विचारात घेवून जिल्ह्यात एकुण 122 मदरसे व शाळा असून त्यापैकी अल्पसंख्याक जैन समाजाच्या 4 शाळा आहेत त्यांना पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. अल्पसंख्याक समुदायाच्या भागातील रस्ते, गटारी, सभागृहाची राहिलेली अपूर्ण कामे वेळेत पार पाडावी.  जालना शहरातील गुरु गणेश भवनाला ब वर्ग तिर्थक्षेत्र दर्जा मिळण्यासाठीचा प्रस्ताव लवकर पाठविण्यात यावा. तसेच इतर चारही जैन समाजाच्या प्राचिन मंदिरांना क वर्ग तिर्थक्षेत्र दर्जा मिळण्यासाठी देखील तात्काळ प्रस्ताव सादर करावेत. असे निर्देशही त्यांनी दिले. जालना शहरातील सदर बाजार जैन मंदिरासमोरील रस्ता करण्याची प्रक्रिया सुरु करावी तसेच तिथे वाहतुक जास्त परंतू रस्ता रुंदीकरण कमी असल्याने तो मार्ग वन वे करावा. जिल्हा उद्योग केंद्राकडील अल्पसंख्याक समुदायासाठी 3 टक्के राखीव असलेली कर्ज प्रकरणे तातडीने मार्गी लावावी. तसेच व्‍यवसाय कोणत्या पध्दतीने केला पाहिजे यासाठी जिल्हा उद्योग केंद्र आणि बँकांनी शिबीरे घेवून गरजवंतांना कर्ज मंजूर करावेत. अशी  सुचनाही केली. जालना जिल्ह्याला अल्पसंख्याक  समाजाच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी देण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment