जालना दि. 4 (जिमाका) :- स्वामी
विवेकानंद हायस्कूलमध्ये आरोग्य विभागाच प्रात्यक्षिकासह किटकजन्य आजारांची
माहिती. पावसाळयात डेंगू, चिकुनगुनिया, हिवताप यांसारख्या कीटकजन्य आजारांचा धोका
वाढतो. याच पार्श्वभूमीवर आज, दिनांक 4 जुलै 2025 रोजी श्री स्वामी विवेकानंद
हायस्कूल, अंबड रोड, जालना येथे जिल्हा हिवताप विभागाच्या वतीने विद्याथ्यांसाठी
जनजागृती व प्रात्यक्षिकात्मक कार्यक्रम घेण्यात आला.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॅा. जयश्री भुसारे आणि सहाय्यक
जिल्हा आरोग्य अधिकारी तथा जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गजानन मस्के सर यांच्या
मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमात विद्याथ्यांना डेंगू,
चिकुनगुनिया, व हिवताप या आजारांबाबत माहिती देण्यात आली. डासांच्या अळया घरातील व
परिसरातील टायर, माठ, ड्रम, हौद, कूलर यांसारख्या ठिकाणी कशा तयार होतात याचे
प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.आठवडयातून एक कोरडा दिवस उपक्रमाचे
महत्त्व, गप्पी मासे टाकण्याची प्रक्रिया व त्याची कार्यपध्दती याचेही
प्रात्यक्षिक करण्यात आले. आरोग्य विभागाचे माहिती प्रसारण अधिकारी श्री बोराडे सर
यांनी विद्याथ्यांचे प्रबोधन करत विद्याथ्यांच्या प्रश्नांचे समाधान केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वामी विवेकानंद हायस्कूलचे मुख्याध्यापक सोनवणे सर
व शिक्षकवृंद यांचे सहकार्य लाभले. याशिवाय जिल्हा हिवताप कार्यालयाचे आरोग्य
निरीक्षक बावणे, देशपांडे, पवार तसेच आरोग्य कर्मचारी तुपे, नरवाडे, काईतवाड, रितेश
तोर आदींनी परिसर व वैयक्तिक स्वच्छतेविषयी मार्गदर्शन करत कीटकजन्य आजारांपासून
बचावासाठी प्रतिबंधात्मक उपाय सांगितले
-*-*-*-*-*-

No comments:
Post a Comment