जालना दि. 29 (जिमाका) :- जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयात आरोग्यमित्रामार्फत आयुष्मान भारत कार्ड आणि वय वंदना कार्डचा ई-के.वाय.सी करून देण्यात येणार आहे. तसेच आपल्या भागातील आशा सेविका, स्वस्त धान्य दुकानदार, आपले सरकार सेवा केंद्र आणि योजने अंतर्गत अंगिकृत रुग्णालय येथे आरोग्यमित्र यांनी भेटुन सर्व जनतेने आयुष्मान कार्ड आणि वय वंदना कार्ड ई-के.वाय.सी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी, जालना यांनी केले आहे.
आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे दि. 25 जुलै 2025 रोजी जिल्ह्यातील गोल्डन कार्ड पात्र लाभार्थी संख्या 18 लाख 34 हजार इतकी असुन त्यापैकी 6 लाख 34 हजार एवढे कार्ड तयार करण्यात आलेले आहे. उर्वरीत एकुण 11 लाख 96 हजार लाभार्थ्यांचे ई के.वाय.सी करणे बाकी आहे. तसेच वय वर्ष 70 वरील सर्व व्यक्ती हे वय वंदना योजनेचे लाभार्थी आहेत.
जालना जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच सर्व तहसील कार्यालये व सर्व पंचायत समिती कार्यालयात दर बुधवार, गुरुवार आणि शुक्रवारी आरोग्य मित्र उपस्थित राहून आयुष्यमान भारत कार्ड व वय वंदना कार्डची ई-केवायसी करुन देणार आहेत.
आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही भारत सरकारची प्रमुख योजना असून दि. 23 सप्टेंबर 2018 पासून राज्यात महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसोबत एकत्रितपणे राबविण्यात येत आहे. सदर योजने अतंर्गत लाभार्थी रुग्णांना अंगीकृत रुग्णालयामध्ये रुपये 1 लाख पर्यंतचे मोफत उपचार देण्यात येतात. तसेच वय वर्ष 70 वरील सर्व व्यक्ती हे वय वंदना कार्डचे लाभार्थी आहेत. वय वंदना योजने अतंर्गत लाभार्थी रुग्णांना अंगीकृत रुग्णालयामध्ये रुपये 5 लाख पर्यंतचा मोफत उपचार देण्यात येतो. असेही कळविले आहे.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment