जालना, दि.9(जिमाका) :
‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर यांच्या 350व्या शहीदी समागम वर्षानिमित्त
नांदेड येथे 24 व 25 जानेवारी रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या
कार्यक्रमास देशासह आंतरराष्ट्रीयस्तरावरून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहणार
असून, या कार्यक्रमास जालना जिल्ह्यातील भाविकांना
उपस्थित राहता यावे यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात यावी. तसेच विविध
माध्यमातुन शक्य तेवढी मदत पोहचविण्यात यावी यासाठी नियोजन करावे अशा सूचना
जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात नांदेड येथे
24 व 25 जानेवारी रोजी आयोजित होणाऱ्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आयोजित
पूर्वतयारीच्या आढावा बैठकीत श्रीमती मित्तल बोलत होत्या. यावेळी बैठकीस निवासी
उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, सुचित कुलकर्णी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी
चंद्रमोहन चिंतल, शिक्षणाधिकारी बी. आर. खरात यांची उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती मित्तल
म्हणाल्या की, नांदेड येथे होणाऱ्या शहीदी समागम वर्षानिमित्त राज्य, देश तसेच
आंतरराष्ट्रीय स्तरावरून श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांना मानणारे लाखो भाविक
नांदेडमध्ये येणार आहेत. जालना जिल्ह्यात देखील श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांना
मानणारे शीख, सिकलीगर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहयाल, वाल्मिकी, भगत नामदेव व
उदासीन असे नऊ समाज-संप्रदायातील भाविक मोठ्या प्रमाणात आहेत. त्या अनुषंगाने या
नागरिकांना या कार्यक्रमास उपस्थित राहाता यावे यासाठी आपल्या जिल्ह्यातील सर्व
तालूके आणि ग्रामीण भागात विविध माध्यमातून व्यापक जनजागृती करण्यात यावी. यासाठी
शिक्षण विभागाने युवकांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्यासाठी शाळा व
महाविद्यालयांमध्ये निबंध, वकृत्व, रिल्स स्पर्धा आयोजित कराव्यात. तसेच
सीएसआरच्या माध्यमातून किंवा दानशुर व्यक्तीकडून अन्न-धान्य, पाणी आदी मदत करता
येईल का याचे नियोजन करावे. तसेच जालना जिल्ह्यातून नांदेड येथे येणाऱ्या
भाविकांना वैद्यकीय सेवा देण्यासाठी वैद्यकीय कॅम्प उभारण्यासाठीचे नियोजन करावे.
तसेच
शीख, सिकलीगर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहयाल, वाल्मिकी, भगत नामदेव व उदासीन
असे नऊ समाज-संप्रदायातील मान्यवरांची बैठक आयोजित करुन व्यापक जनजागृती आणि विविध
माध्यमातून कोणती मदत करता येईल याची माहिती घेवून त्यानुसार नियोजन करावे.
यावेळी बैठकीस मुख्याधिकारी, गट शिक्षणाधिकारी आदींची उपस्थिती होती.
****


No comments:
Post a Comment