Friday, 3 October 2025

अभिजात मराठी भाषा सप्ताहाचे उत्साहात उदघाटन संपन्न

 


 

जालना, दि. 3 (जिमाका) :- जिल्ह्यात दि.3 ऑक्टोबर हा दिवस अभिजात मराठी भाषा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.  तरी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनानूसार दि.3 ते 9 ऑक्टोबर 2025 या कालावधीत अभिजात मराठी भाषा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाचे उदघाटन जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल सभागृहात शुक्रवार दि.3 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता उत्साहात संपन्न झाले. यावेळी अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे, प्रा.राजेंद्र सोनवणे, प्रा.सुहास सदावर्ते, कविवर्य कैलास भाले यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी प्रा.सुहास सदावर्ते यांनी बहारदार कवितांचे सादरीकरण करुन आपल्या कवितांनी उपस्थितांची मने जिंकली. कविवर्य कैलास भाले यांनी आपल्या स्वलिखित अस्वस्थ नावाच्या काव्यसंग्राहातील कविता सादर करुन उपस्थितांच्या मनावर वास्तवतेची छाप सोडली.

प्रा.राजेंद्र सोनवणे यांनी सांगितले की, केंद्र शासनाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देवून मराठीची मान उंचावली आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा देताना मराठी भाषेला गेल्या सुमारे  2500 वर्षाची परंपरा गृहीत धरण्यात आली आहे. प्राचिन ग्रंथातील विविध लिपीतील भाषा, व्यवहारातील व विविध कला प्रकारातील भाषेच्या इतिहातील गौरवशाली परंपरा विविध समाजघटकासमोर येण्यासाठी मराठी भाषेचे वैभव जपण्यासाठी , भाषेचे संवर्धन होण्यासाठी जनजागृती होणे गरजेचे आहे. असे सांगून आपल्याला मराठी भाषेचा दर्जा कसा मिळाला, त्याची एकुण प्रक्रिया कशी होते आणि अभिजात भाषेची उत्पत्ती आणि अभिजातता यावर आपले विचार  सर्वांसमोर मांडले. प्रास्ताविक उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे यांनी केले. तर सुत्रसंचालन श्री.बारगजे यांनी करुन आभार मानले. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-*-*-*-*-

वृत्त क्र.                                                                              दि. 3 ऑक्टोबर, 2025

 

शासनमान्य ग्रंथांच्या यादीसाठी अर्ज सादर करावेत

 

जालना, दि. 3 (जिमाका) :- ग्रंथालय संचालनालयाकडून शासनमान्य ग्रंथांच्या  यादीसाठी वर्ष 2024 या इंग्रजी वर्षात प्रकाशित झालेल्या मराठी भाषेतील ग्रंथांची निवड करण्यासाठी आणि शासनमान्य ग्रंथाच्या यादीत समावेश होण्याच्या दृष्टीने अर्ज दि.15 ऑक्टोबर 2025 पर्यंत सादर करावेत. प्रथम आवृत्ती असलेल्या ग्रंथाची एक प्रत विनामुल्य ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, नगर भवन, टाऊन हॉल, मुंबई-4000001  यांच्याकडे पाठविण्यात यावी. असे आवाहन ग्रंथालय संचालक यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

वृत्त क्र.                                                                              दि. 3 ऑक्टोबर, 2025

 

राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान योजनेतंर्गत

 ग्रंथभेट योजनेसाठी निवड झालेला ग्रंथांची यादी प्रसिध्द

 

जालना, दि. 3 (जिमाका) :- राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान कोलकाता व राज्य शासनाच्या संयुक्त निधीतून 50 व्या ग्रंथभेट योजनेतंर्गत सन 2023 मध्ये प्रकाशित व संचालनालयास प्राप्त झालेल्या ग्रंथापैकी राज्य ग्रंथालय नियोजन समितीच्या उपसमिती सदस्यांनी निवड केलेल्या 1388 ग्रंथांची यादी ग्रंथालय संचालनालयाच्या www.dol.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर दि.15 ऑक्टोबर 2025 पर्यंत अवलोकनार्थ खुल ठेवण्यात आली आहे. या ग्रंथ यादीतील ग्रंथ किमान 25 टक्के सुट दराने वितरीत करणे बंधनकारक आहे. या यादीत ग्रंथाचे नाव, लेखक, प्रकाशक व किंमत यामध्ये काही बदल असल्याचे निदर्शनास आणून द्यावे, असे आवाहन ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-

वृत्त क्र.                                                                              दि. 3 ऑक्टोबर, 2025

समाज कल्याण कार्यालयाकडून

जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस साजरा

 

जालना, दि. 3 (जिमाका) :-  जालना समाजकल्याण कार्यालयाकडून  जागतिक ज्येष्ठ नागरीक दिन 1 ऑक्टोबर 2025 साजरा करण्यात आला.  सदर कार्यक्रमास प्रमुख व्याख्याते म्हणून रेणूका बडवणे (भावसार) समाजकार्य महाविद्यालय, जालना यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या मानसीक आरोग्याबाबत ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच ॲड संजय काळबंडे यांनी आई-वडील व ज्येष्ठ नागरीक यांच्या चरितार्थ व कल्याणासाठी नियम- 2010 बाबत मार्गदर्शन केले.

 कार्यक्रमास जिल्हा ज्येष्ठ नागरिक समितीचे अशासकीय सदस्य प्रा. रावसाहेब ढवळे, ज्येष्ठ नागरीक मंचाचे लक्ष्मीकांत  कंकाळ, आर. आर. खडके, तुळशीराम शेळके, धर्मा खिल्लारे, महासचिव प्रा एम. जी. जोशी, तसेच सामाजिक क्षेत्रावरती काम करणारे ज्येष्ठ नागरिक हे मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंचावर विशेष अधिकारी स्नेहल मोदाळे, सहायक संचालक मैरू दत्तात्रय क्षीरसागर, अविनाश अंकूश बहीर हे उपस्थित होते.

कार्यक्रमाची सूरूवात महापुरूषांच्या प्रतिमेचे  पुजन व उपस्थितांचे स्वागत करून झाली. यानंतर कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात स्नेहल मोदाळे  यांनी ज्येष्ठ नागरिक अधिनियम 2010 व ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाविषयी माहिती दिली. 

प्रा. रावसाहेब ढवळे यांनी ज्येष्ठ नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या विषयी माहिती सांगून त्याबाबत समाजामध्ये जनजागृती करून ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे नमुद केले. लक्ष्मीकांत कंकाळ यांनी आपल्या भाषणामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी शहरामध्ये विरंगुळा केंद्र उभारण्याबाबत नगरपालिका प्रशासन यांना आवाहन केले.  त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याता ॲड. संजय काळबंडे यांनी यांनी ज्येष्ठ नागरिकांविषयी असणाऱ्या कायद्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करुन वृध्दाश्रमाची व्याख्या नष्ट करण्याचे आवाहन केले.  तसेच प्रा. रेणूका बडवणे यांनी आपल्या भाषणामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी शासन राबवित असलेल्या विविध योजनाची माहिती सांगून ज्येष्ठ नागरिक दिन याविषयी समाजातील तरूण-तरुणीमध्ये आपल्या वडीलधाऱ्या ज्येष्ठ नागरिकांविषयी सहानभुती, त्यांच्या समस्याविषयी जनजागृती करून देण्याच्या उद्देशाने साजरा केला जात असल्याचे नमुद केले. या कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने हजर होते.

-*-*-*-*-

 

 

वृत्त क्र.                                                                              दि. 3 ऑक्टोबर, 2025

 

आधार कार्डसाठी सुधारित दर लागू

 

जालना, दि. 3 (जिमाका) :-  आधार सेवांबाबत भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण यांच्याकडून सुधारित दर लागू करण्यात आले आहेत. दि.19 सप्टेंबर 2025 रोजी प्रसिध्द कार्यालयीन पत्रानूसार आधार नोंदणी, बायोमेट्रीक अद्ययावत व इतर सेवा यासाठी नवे दर निश्चित करण्यात आले आहेत. हे दर             दि.1 ऑक्टोबर 2025 पासून 30 सप्टेंबर 2028 पर्यंत लागू राहतील, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

सुधारित दरानूसार 0 ते 5 वर्षे वयोगटातील मुलांची आधार निर्मिती पुर्णपणे मोफत असून नोंदणी केंद्रास 75 रुपये आर्थिक सहाय्य देण्यात येईल. 5 वर्षापेक्षा जास्त वयोगटातील नवीन आधार नोंदणीसाठी कोणतेही शुल्क लागणार नाही, मात्र नोंदणी केंद्रास 125 रुपये आर्थिक सहाय्य दिले जाईल. मॅडेटरी बायोमेट्रीक अपडेट 5 ते 7 आणि 15 ते 17 वर्षे वयोगटासाठी पुर्णपणे मोफत राहील. इतर बायोमेट्रीक अपडेटसाठी नागरिकांना 125 रुपये व डेमोग्राफिक अपडेटसाठी 75 रुपये शुल्क आकारले जाईल. घरपोच आधार नोंदणी, अद्ययावत सेवेसाठी 700 रुपये जीएसटी शुल्कासह आकारले जातील. त्याच पत्यावर दुसऱ्या  व्यक्तीसाठी 350 रुपये शुल्क आकारले जाईल. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण यांच्या सुचनेनूसार जिल्ह्यातील सर्व आधार नोंदणी केंद्रांना सुधारित दरानूसार सेवा देण्याचे निर्देश आहेत. त्यानूसार नागरिकांना नव्या सुधारित दर व सुविधा यांचा लाभ घेण्यासाठी आपल्या जवळच्या आधार सेवा केंद्राशी संपर्क साधावा.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment