Thursday, 16 October 2025

मिशन शक्ती आणि मिशन वात्सल्य योजनाची आढावा बैठक संपन्न • चाईल्ड हेल्पलाईन 1098 • वुमन हेल्पलाईन 181

 





जालना, दि.16 (जिमाका) : महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना तसेच सर्व क्षेत्रातील महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी ‘मिशन शक्ती’ व ‘मिशन वात्सल्य’ अंतर्गत सर्वसमावेशक एकत्र गठीत जिल्हा सनियंत्रण समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षेत आज संपन्न झाली. यावेळी जिपच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पी.एम. मिन्नु, जिपचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी आर. बी. कड, जिपच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी कोमल कोरे, बाल विकास प्रकल्प अधिकारी एन.डी. वामन  यांची प्रमुख उपस्थिती होती.  


यावेळी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल म्हणाल्या की, जिल्ह्यात कोठेही बालकामगार व बालभिक्षेकरी दिसणार नाही. आपणांस बालकांसाठी काम करण्याची संधी प्राप्त झाली असुन, या अनुषंगाने आपण बालकांसाठी असलेल्या सर्व योजना त्यांच्यापर्यंत पोहचविण्यासाठी सर्वोतोपरी    प्रयत्न करावा. बालकांना त्यांचे अधिकार माहिती नसल्याने अनेक बालके हे विविध लाभापासून वंचित राहातात त्यांचे अधिकार त्यांना माहित होण्यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती करुन त्यांना लाभ देण्यात यावा. तसेच महिला आणि बालकांचे आरोग्य व हित लक्षात घेता त्यांना तात्काळ लाभ देण्यात यावा.   तसेच सार्वजनीक बांधकाम विभागाने जालना येथील शासकीय बालगृह व निरिक्षण गृह, येथील देखभाल दूरुस्तीची कामे तात्काळ पूर्ण करावीत. तसेच महिला भवन आणि वन स्टॉप सेंटरच्या नविन इमारतीचे कामे वेळेत व दर्जेदार करावेत. जिल्ह्यात मुलींसाठी बालगृह उपलब्ध नाही याकरीता जिल्ह्यात बालगृह सुरु करण्यासाठी  तात्काळ प्रस्ताव तयार करुन शासनाकडे सादर करावा. तसेच याकरीता पाठपूरावा करण्यात यावा. ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’ जनजागृती अनुषंगाने सर्व विभागांना आराखडा तयार करुन व्यापक प्रसिध्दी करावी. जिल्ह्यात कोठेही बालविवाह होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. बालविवाह थांबविण्यात आल्यानंतर संबंधीत बालिकाचा पुन्हा बालविवाह होवू नये तसेच तिच्या शिक्षणामध्ये खंड पडू नये यासाठी तिचे वय वर्ष 18 पूर्ण होईपर्यंत पाठपूरावा करण्यात यावा. तसेच चाईल्ड हेल्पलाईनद्वारे प्राप्त होणाऱ्या तक्रारीची दखल घेवून तात्काळ कार्यवाही करण्यात यावी. तसेच महिला व बालविकास विभागा अंतर्गत महिला आणि बालकांसाठी असलेल्या सर्व कल्याणकारी योजनांची व्यापक प्रसिध्दी करण्याच्या सूचना यावेळी श्रीमती मित्तल यांनी यावेळी दिल्या. 


जिपच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पी.एम. मिन्नु म्हणाल्या की, जिल्ह्यात कोठेही बालविवाह होणार नाही यासाठी यंत्रणेने ग्रामपातळीवर जाऊन ग्रामसभेच्या माध्यमातून जनजागृती करावी.      


यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती मित्तल यांनी जिल्हा बाल संरक्षण कक्ष्, बाल कल्याण समिती, बाल न्याय मंडळ, चाईल्ड हेल्पलाईन 1098, वन स्टॉप सेंटर, महिला हेल्पलाईन, कौटूंबीक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005, महिला सक्षमीकरण, महिलांसाठीच्या वैयक्तीक व सामहिक योजना, बेटी बचाव, बेटी पढाओ आदी योजनांचा आढावा घेण्यात आला. 


यावेळी उपशिक्षणाधिकारी विनया वडजे यांच्यासह बाल कल्याण समितीचे सदस्य, बाल न्याय मंडळ, युनिसेफचे प्रतिनिधी, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, चाईल्ड हेल्पलाईन, वन्स स्टॉप सेंटर, अशासकीय सदस्य आणि जिल्हा महिला बाल विकास कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती.


No comments:

Post a Comment