Wednesday, 8 October 2025

राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान स्पर्धा

 


अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रशासनात गतिमानता व लोकाभिमुखता

आणण्यासाठी अभियानात सक्रीय सहभाग घ्यावा

-        जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

 

 जालना, दि.8 (जिमाका) :- राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान स्पर्धेत उत्कृष्ट काम करणाऱ्या कार्यालयांना व कर्मचाऱ्यांच्या कामाची नोंद त्यांच्या गोपनीय अहवालामध्ये घेतली जाणार आहे. तरी जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये, संस्था आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रशासनात गतिमानता व लोकाभिमुखता आणण्यासाठी या अभियानात सक्रीय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केले आहे.

राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान स्पर्धेविषयी जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवार दि.8 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता बैठक घेण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांच्यासह संबंधित यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.

राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा या अभियानाचा कृती कालावधी प्रतिवर्षी दि.20 ऑगस्ट ते 2 ऑक्टोबर  असा  असतो. योजनेअंतर्गत घेण्यात येणाऱ्या स्पर्धेसाठी दि.16 ऑक्टोबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज स्विकारण्यात येणार आहेत. या योजनेचे अर्ज स्विकारण्यासाठी राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा पोर्टल विकसीत करण्यात आले असून या संकेतस्थळाची लिंक pragatiabhiyan.maharashtra.gov.in अशी आहे.स्पर्धेसाठी ऑनलाईन अर्ज स्विकारण्याची मुदत दि.16 ते 31 ऑक्टोबर 2025 अशी असून वेळापत्रक शासन निर्णयातील परिशिष्ट क मध्ये दर्शविण्यात आले आहे. प्रस्ताव तपासणीसाठी तालुका, जिल्हा, विभागीय आणि राज्य अशा चार स्तरावर निवड समित्या असतील. तालुकास्तरील प्रस्ताव जिल्हा समितीकडे, जिल्हास्तरावरील प्रस्ताव विभागीय समितीकडे आ णि विभागीय स्तरावरील प्रस्ताव राज्य समितीकडे पाठविले जातील.   कार्यालयीन व्यवस्थापन, सेवांची गुणवत्ता, लोकाभिमुखता, ई-गव्हर्नस,संसाधनाचा प्रभावी वापर, तंटा व तक्रार मुक्त कार्यालय आणि नाविण्यपूर्ण संकल्पना, उपक्रम अशा सात प्रमुख कार्यक्षेत्रावर ही स्पर्धा आधारीत असणार आहे. तरी शासकीय संस्था, अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रशासकीय सुधारणाबाबत आपले प्रस्ताव शासन निर्णयात नमुदप्रमाणे कार्यवाही करुन पाठवावेत, असे निर्देशही जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिले आहेत.

 

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment