Saturday, 4 October 2025

128 उमेदवारांचे शासकीय नोकरीचे स्वप्न साकारले

 

अनुकंपा व लिपिक भरती नियुक्ती आदेश वितरणाचा राज्यस्तरीय कार्यक्रम उत्साहात


 

जालना, दि. 4 (जिमाका) :- मुख्यमंत्री महोदयांच्या 150 दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत अनुकंपा नियुक्ती प्रक्रियेस गती आणून पात्र उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देणे हा प्रमुख उद्देश आहे. तरी या अंतर्गत अनुकंपा नियुक्ती (गट-क व गट-ड) उमेदवार व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून शिफारस प्राप्त लिपिक-टंकलेखक संवर्गातील एकुण 128 उमेदवारांना नियुक्ती आदेशाचे जिल्हाधिकारी कार्यालयात मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी एकुण 128 उमेदवारांचे शासकीय नोकरीचे स्वप्न साकार झाले, असा सुर कार्यक्रमातून उमटला.

अनुकंपा व लिपीक भरती नियुक्ती आदेश वितरणाच्या राजय्स्तरीय कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री गिरीष महाजन, मंत्री छगन भुजबळ, मंत्री दादाजी भूसे  यांची उपस्थिती होती. तर जिल्हास्तरीय कार्यक्रमात आमदार अर्जुन खोतकर, आमदार बबनराव लोणीकर, आमदार नारायण कुचे, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे, अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार, महापालिका आयुक्त संतोष खांडेकर, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधर, यांची प्रमुख उपस्थिती होती.

राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन  मंत्री   तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी दृकश्राव्य प्रणालीद्वारे हजेरी लावत नियुक्ती आदेशाचे वाटप करण्यात आलेल्या उमेदवारांचे मन:पुर्वक अभिनंदन करुन भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.  तसेच अतिवृष्टीच्या पार्श्वभूमिवर जालना जिल्ह्यात सर्वत्र रेड अलर्ट जाहीर झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने हालचाली करत अधिकाधिक नागरिकांना, पशुधनाला सुरक्षित स्थळी हलवले.  रेड अलर्टमध्ये जिल्हा प्रशासनाने  समन्वय ठेवून खुप छान काम केले. जिल्हा प्रशासनाचा प्रत्येक कामात नेहमी पुढाकार असतो. आपले काम कौतुकास्पद आहे, असेही सांगितले.

राज्यस्तरीय कार्यक्रमात 5187 अनुकंपा व 5122 लिपिक टंकलेखक भरतीतील उमेदवारांना नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आले.  शासकीय सेवेत कार्यरत असतांना अधिकारी व कर्मचाऱ्याचे निधन झाल्यास त्याच्या कुटुंबावर ओढवणाऱ्या आर्थिक आपत्तीतून कुटुंबियांना सावरण्यासाठी कुटुंबातील एका सदस्यास अनुकंपा तत्वावर शासकीय सेवेत नियुक्ती देण्‍याचे सुधारित धोरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राज्य शासनाने पारित केले होते. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात मागील महिन्यात झालेल्या मेळाव्यात उमदेवारांना शासन निर्णय व नियुक्ती प्रकियेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यात अनुकंपा तत्वावर गट-‘क’ आणि गट-‘ड’ पदासाठी प्रतिक्षा यादीतील 79 उमेदवारांची, तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडूनही 49 उमेदवारांची नियुक्तीकरिता शिफारस करण्यात आली आहे. अशी एकुण 128 उमेदवारांना नियुक्तीपत्रे शनिवार दि.4 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11.30 वाजता जालना जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात वाटप करण्यात आले. यावेळी आमदार अर्जुन खोतकर, आमदार बबनराव लोणीकर, आमदार नारायण कुचे यांची समयोचित भाषणे झाली. या कार्यक्रमास नियुक्तीपत्र मिळणारे उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment