जालना
दि.15 (जिमाका) :-
महिला आरोग्य हे कुंटुंब आणि सामाजिक आरोग्याशी निगडीत आहे. याच उद्देशाने केंद्र
व राज्य शासनाच्या मार्गदर्शनाखाली दि.१७ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोंबर २०२५ या
कालावधीत ’ स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ हे विशेष राबविण्यांत येणार आहे. जिल्ह्यातील
प्राथमिक आरोग्य केंद्रे, आयुष्यमान आरोग्य मंदिरे, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा
रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय येथे या अभियाना अंतर्गत
महिलांसाठी आरोग्य शिबीरे आयोजित केली जाणार आहे. या शिबीरामध्ये महिलांच्या
आरोग्याच्या दृष्टीकोनातुन आरोग्य तपासणी व उपचारात्मक सेवा देण्यांत येणार आहे.
मधुमेह, रक्तदाब, गर्भाशय मुखाचा कर्करोग, तोंडाचा कर्करोग या सारख्या असंसर्गजन्य
रोगांची तपासणी, ऑनेमिया, गर्भवती महिलांची प्रसुतीपुर्व व प्रसुती पश्चात तपासणी,
माता व बाल संरक्षण कार्ड वितरण, रक्तदान शिबीरे, आयुष्यमान भारत कार्ड तसेच
महिलांसाठी पोषण आहार, मासिक पाळी स्वच्छता, मानसिक आरोग्य व निरोगी जीवनशैली
याविषयी मार्गदर्शन करुन जनजागृती व समुपदेशन करण्यांत येणार आहे. जागरुकता
वाढविण्यासाठी शिबीरांच्या आयोजनामध्ये लोकप्रतिनिधींचा सक्रिय सहभाग घेतला जाणार
आहे. कुटुंब प्रमुखांनी आपल्या घरातील सर्व महिलांना आरोग्य तपासणीसाठी प्रोत्साहन
द्यावे. या अभियानामुळे गंभीर आजारांचे लवकरात लवकर निदान झाल्यामुळे योग्य वेळी
उपचार सुरु होतील. असे जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, जालना यांनी
प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment