Tuesday, 14 January 2025

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करावेत

 


 

जालना, दि. 14 (जिमाका) :-   महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाद्वारा राज्यातील सर्वोत्कृष्ट क्रीडापट्टूंना व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. तरी क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळाडू यांनी विहित मुदतीत क्रीडा विभागाच्या https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर दि. 26 जानेवारी 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

क्रीडा क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जेष्ठ  क्रीडा महर्षीसाठी जीवन गौरव पुरस्कार, क्रीडा मार्गदर्शकांसाठी उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक, जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार ( महिला क्रीडा मार्गदर्शक), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू ), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार ( साहसी उपक्रम), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार ( दिव्यांग खेळाडू) असे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. शासन निर्णय दि. 29 डिसेंबर 2023 अन्वये व दि. 25 जानेवारी 2024 नुसार शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सुधारित नियमावली 2023 विहीत केली आहे. या नियमावलीनुसार सन 2023-24 या वर्षाच्या पुरस्कारासाठी राज्यातील क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळाडू व साहसी उपक्रमात सहभागी झालेले खेळाडू,  व्यक्ती यांच्याकडून दि. 14 जानेवारी ते 26 जानेवारी 2025 या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

 

No comments:

Post a Comment