Friday, 16 May 2025

भारतीय सैन्य दलात नौकरीची संधी

 


जालना दि.16 (जिमाका): तांत्रिक पदवीधर शाखेच्या विद्यार्थ्यांना भारतीय सैन्यात अधिकारी होण्याची संधी मिळणार आहे. भारतीय सैन्यात तांत्रिक पदवीधर अभ्यासक्रम (TGC-142) साठी भरती प्रक्रिया होणार आहे. या अभ्यासक्रमासाठी निवड झाल्यास उमेदवारांना इंडियन मिलिटरी अकादमी (IMA), डेहराडून येथे प्रशिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे.

या भरतीसाठी फक्त अविवाहित पुरुष उमेदवार पात्र असणार आहेत. जे अभियांत्रिकी पदवीधर आहेत किंवा अंतिम वर्षात शिकत आहेत. या पदांसाठी वयोमर्यादा ही 20 ते 27 वर्षे (ज्यांचा जन्म 2 जानेवारी, 1999 ते 1 जानेवारी, 2006 दरम्यान झाला आहे.) दरम्यान आहे. बी.ई. मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा बी.टेक पदवी असणे आवश्यक आहे. तसेच, पदवी अधिसूचनेत नमूद केलेल्या अभियांत्रिकी शाखांमध्येच असावी. बी.ई./बी.टेक किंवा शेवटच्या वर्षात असलेले अविवाहित पुरुष उमेदवार अर्ज करु शकतात. 

इच्छुक उमेदवारांनी भारतीय सैन्याच्या अधिकृत वेबसाइट joinindianarmy.nic.in ला भेट देऊन आपलललल ऑनलाइन अर्ज सादर करावा. यासाठी नोंदणीची शेवटची तारीख 29 मे, 2025 पर्यंत आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटची मदत घ्यावी, असे अवाहन सैना भरती कार्यालय, औरंगाबाद यांनी केले आहे.

-*-*-*-*-*-

भारतीय सशस्त्र सैन्य दलात अधिकारी पदाचे मोफत पूर्व प्रशिक्षण

 


जालना दि.16 (जिमाका):  भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना Combined Defence Service (CDS)  या परीक्षेची पुर्व तयारी करुन घेण्यासाठी छात्रपर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे  कालावधी CDS कोर्स क्र. 65 आयोजित करण्यात येत आहे. कोर्स कालावधीत प्रशिक्षणार्थींना नि:शुल्क प्रशिक्षण, निवास व भोजन दिले जाते.

जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जालना येथे दि. 5 जुन 2025 रोजी सकाळी 11.00 वाजेपर्यंत मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस येतेवेळी त्यांनी  Department of Sainik Welfare,Pune (DSW)  यांच्या वेबसाईटवर सर्च करुन कोर्ससाठी किंवा संबंधीत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन व ते पुर्ण भरुन सोबत घेऊन यावे.

सी.डी.एस. वर्गामध्ये प्रवेश मिळण्यासाठी खाली नमुद कोणतीही एक पात्रता आवश्यक आहे व त्यासंबंधीचे पात्रता प्रमाणपत्र प्रशिक्षण वर्गाला येतांना सोबत घेवून यावेत.

उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.

उमेदवार लोकसंघ आयोग (UPSC) नवी दिल्ली यांचेमार्फत घेण्यात येणाऱ्या सी.डी.एस. या परिक्षेकरीता ऑनलाईनद्वारे अर्ज केलेला असावा.

अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपुर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांच्या ईमेल आय डी व दुरध्वनी क्रमांक 0253 -2451032 किंवा व्हॉट्सॲप क्र. 9156073306 वर कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दुरध्वनीवर संपर्क करावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-

 

19 मे 2025 रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन

 


       जालना दि. 16 (जिमाका) :-महिला व बाल विकास विभागाने, समस्या व पिडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळण्यासाठी त्यांच्या हक्कांचे संरक्षण होऊन न्याय मिळावा या हेतूने  जिल्हा तसेच तालुकास्तरावर महिलांसाठी विशेष लोकशाही दिन पाळण्यात येतो. तालुकास्तरावर प्रत्येक तहसिल कार्यालयात महिन्याचे चौथ्या सोमवार आणि जिल्हाधिकारी कार्यालयात दर महिन्याच्या तिस-या सोमवारी महिला लोकशाही दिनाचे आयोजन  करण्यासाठी दि. 19 मे 2025 रोजी सकाळी 11.00 ते 12.00 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.  या महिला लोकशाही दिनात तक्रार दाख करु इच्छिणा-या महिलांनी आपली तक्रार दोन प्रतित महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय जालना येथे दाखल करण्याचे आवाहन केले आहे.

 अर्ज स्वीकृतीचे निकष पुढीलप्रमाणे तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे असावे, तक्रार निवेदन दोन प्रतित सादर करावे, सदरील प्रकरण न्याय प्रविष्ठ नसावे, अर्ज विहित नमुन्यात व आवश्यक त्या कागदपत्रासह सादर करावा, सेवा व आस्थापना विषयक बाबी विचारात घेतल्या जाणार नाहीत.

    निवडणुक आचार संहिता काळात त्या त्या स्तरावर, विधीमंडळ अधिवेशन काळात राज्यस्तर महिला लोकशाही दिन पाळण्यात येत नाही.

     महिलांनी प्रथम संबंधीत तहसिलदार यांच्याकडे महिला लोकशाही दिनाच्या पंधरा दिवस आधी दोन प्रतीत तक्रार दाखल करावी. तालुका महिला लोकशाही दिनात एका महिन्यांचे आत कार्यवाही न झाल्यास संबंधीत महिला जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनांत तक्रार दाखल करु शकतील. तालुकास्तरावरील लोकशाही दिनांत अर्जदार महिलेस अंतिम उत्तर  शक्य तितक्या लकर जास्तीत जास्त एक महिन्याच्या आत देण्याचे बंधन संबंधित अध्यक्ष तथा तहसिलदार व सदस्य सचिव तथा बाल विकास प्रकल्प अधिकारी यांची राहील. महिलांनी तक्रार अर्ज दाखल करण्यासाठी तालुकास्तरावर तहसिल कार्यालय व जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याशी संपर्क करुन या उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-*-

जेईई परीक्षा केंद्रावर प्रतिबंधात्मक आदेश जारी

 


जालना दि.16 (जिमाका):  Join Entrance Examination & (Advanced) परीक्षा -2025 दि. 18 मे 2025 जिल्हातील जे.ई. एस. महाविद्यालय व इन्सिट्युट ऑफ फार्मसी, पाथ्रीकर कॅम्पस, बदनापूर या  केंद्रावर  घेण्यात येणार आहे.  तरी या केंद्राकरीता परीक्षा उपकेंद्राच्या परिसरात अशांतता निर्माण होऊन परीक्षा कालावधीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने परीक्षा उपकेंद्राच्या 100 मीटर परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश अप्पर जिल्हादंडाधिकारी गणेश महाडीक यांनी जारी केले आहे.

वरील आदेश दि. 18 मे 2025 रोजी सकाळी 6.00 वाजेपासून सायंकाळी 8.00 वाजेपर्यंत अंमलात राहतील.

-*-*-*-*-*-

जिल्ह्यात कलम 37 (1) व (3) अन्वये आदेश जारी

 

     जालना दि. 16 (जिमाका) :-   जिल्ह्यात  दि. 23 मे 2025 रोजी नक्षलबारी क्रांती दिवस, दि. 25 मे 2025 रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती, दि. 29 मे 2025 रोजी महाराणा प्रताप जयंती (तीथीप्रमाणे), दि. 31 मे 2025 रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती व दि. 2 जुन 2025 रोजी शाबुओथ असे सण, उत्सव साजरे होणार असल्याने जिल्ह्यात विविध कार्यक्रम आयोजित होतात. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक एकत्र येत असतात.  तसेच  मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण बचाव व धनगर समाज एस.टी. प्रवर्गात समाविष्ठ करावे या अनुषंगाने जालना जिल्ह्यात विविध प्रकारचे आंदोलन कार्यक्रम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो.

तसेच महाराष्ट्रात राजकीय दृष्ट्या सत्ताधारी व विरोधकात एकमेकाविरुध्द आरोप प्रत्यारोप विविध कारणास्तव सुरु आहे. तसेच शेतक-यांचे विविध मागणीसाठी विविध संघटनांकडून आत्मदहन, उपोषण, धरणे, मोर्चे, निदर्शने, रास्तारोको इत्यादी सर्व प्रकारची आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

        त्यामुळे अपर जिल्हादंडाधिकारी जालना यांना प्राप्त अधिकारानुसार पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) अन्वये शासकीय कर्तव्य पार पाडणा-या कर्मचा-यांच्या व्यतिरिक्त इतर कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी किंवा त्या आसपास शस्त्रे, लाठ्या, सोटे, बंदुके, तलवारी , भाले, चाकु व इतर शरीरास इजा अथवा अपाय करणा-या वस्तु जवळ बाळगणार नाही. तीक्ष्ण पदार्थ अथवा स्फोटके सहज हाताळता येतील अशी घातक वस्तु जवळ बाळगणार नाही. दगड किंवा इतर उपकरणे किंवा प्रवर्तक शस्त्रे गोळा करुन ठेवणार नाही किंवा जवळ बाळगणार नाही. व्यक्तींच्या किंवा समुहाच्या भावना जाणुनबुजुन दुखविण्याचे उद्देशाने असभ्यतेने भाषण म्हणणार नाही, वाद्य वाजविणार नाही, गाणे म्हणणार नाही. व्यक्तींचे किंवा शवाचे किंवा त्याच्या प्रतिकृतीचे प्रदर्शन करणार नाही. आवेषी भाषण, अंगविक्षेप,विडंबनापर नकला करणार नाही  आणि सभ्यता किंवा नितिमत्ता यास बाधा येईल किंवा ज्यामुळे राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा कोणतीही वस्तु बाळगणार नाही.

 

   तसेच  अपर जिल्हादंडाधिकारी जालना यांना प्राप्त अधिकारानुसार पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (3) अन्वये  पाच किंवा अधिक व्यक्तींना जमण्यास किंवा सभा, मिरवणुका, मोर्चा काढण्यास मनाई केली आहे.   

 

हा आदेश कामावरील कोणताही ‍ अधिकारी किंवा कर्मचारी यांना लागु होणार नाही.  तसेच विवाह, अंत्ययात्रा आणि पोलीस अधिक्षक जालना व उपविभागीय पोलीस अधिकारी जालना, अंबड, परतुर, भोकरदन यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुका, सभा, मोर्चा यांना लागु राहणार नाही.

       हा आदेश संपुर्ण जिल्ह्यासाठी दि. 20 मे 2025  रोजीच्या 6.00 वाजेपासुन ते  दि. 2 जून2025  रोजीचे रात्री 12.00 वाजेपर्यंत अंमलात राहील. असे आदेशात नमुद करण्यात आले आहे.

                                                                    -*-*-*-*-*-        

 

Thursday, 15 May 2025

नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी यंत्रणांनी मान्सूनपुर्व कामे वेळेत पूर्ण करावीत - जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ

 



जालना, दि.15(जिमाका): आगामी मान्सून कालावधीत उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी सर्व यंत्रणांनी योग्य नियोजन करुन मान्सून पूर्व करावयाची सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मान्सून पूर्व तयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ बोलत होते. यावेळी बैठकीस प्र. पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश महाडीक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी दिपक काजळकर यांची प्रमुख उपस्थिी होती.

जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ म्हणाले की, मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पर्जन्यमान चांगले राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असून, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांनी परस्पर समन्वय साधून काम करावे. तसेच  मान्सुनपूर्व काळात आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांनी सतर्क राहावे. अनुचित घटना टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. कुठे अशी घटना घडल्याचे कळताच तात्काळ मदत पोहोचेल या पध्दतीने नियोजन करावे. घटनेचा पंचनामा तातडीने करुन त्याचा अहवाल प्रशासनाकडे वेळेत सादर करावा, जेणेकरुन वेळेत आर्थिक मदत देणे शक्य होईल. धरणातून पाणी सोडण्यापूर्वी जिल्ह्यातील संबंधित यंत्रणा व नागरिकांना पूर्वसूचना द्यावी. मान्सुन काळात जबाबदारी असलेल्या यंत्रणांनी आपत्तीच्या कामात निष्काजीपणा करु नये. यात दोषी आढळल्यास संबंधिताविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायद्यातंर्गत कारवाई करण्यात येईल अशा सूचनाही डॉ. पांचाळ यांनी यावेळी दिल्या. 

मान्सुन कालावधीत सर्व यंत्रणा आणि नागरिकांना दामिनी ॲपचा वापर करण्याचे आवाहन करत डॉ. पांचाळ म्हणाले की, मान्सून काळात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी संबंधित यंत्रणांच्या विभाग प्रमुखांनी योग्य ती खबरदारी घेवून मान्सून पूर्व कामे वेळेच्या आत पूर्ण करावीत. सर्व संबंधित विभागप्रमुखांनी आपले अधिनस्त अधिकारी, कर्मचारी यांची बैठक घेवून त्यांना योग्य त्या सूचना द्याव्यात. जिल्ह्यातील मोठे व मध्यम तसेच सर्वच प्रकल्पाची तातडीने दुरुस्ती करावी. पावसाळ्याच्या दिवसात संपर्क तुटणाऱ्या गावांना पुरेशा प्रमाणात औषधीसाठा, धान्य पुरवठा करण्यासाठी नियोजन करावे. जिल्ह्यातील गोदावरी, दुधना, केळणा, पुर्णा, गिरजासह इतर लहान-मोठ्या नद्या लक्षात घेता गावांना पुरांचा धोका उद्भवू शकतो.याकरीता नदीकाठावरील गावांत धोकादायक ठिकाणी पुर रेषा आखणीचे काम तात्काळ करावे. जिल्ह्यात संभाव्य पूर प्रवण 47 गावे आहेत. पूर परिस्थितीमध्ये काय करावे व काय करू नये याची जनजागृती करावी. तसेच आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्व यंत्रणाची आवश्यक साहित्यांची तपासणी करून घ्यावी. 24 तास नियंत्रण कक्षाची स्थापना करुन कक्षातील संपर्क क्रमांक अद्ययावत करावेत.  तसेच तालुका स्तरावर देखील 24 तास नियंत्रण कक्ष सुरू करावेत. नगरपालिका, अग्नीशामक, पंचायत, आरोग्य, शिक्षण, पोलीस, कृषी, वाहतूक आदी संबंधीत विभागांनी नियंत्रण कक्ष कार्यान्वित करावेत. हवामान खात्याकडून वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या सूचना सर्वांना तात्काळ पोहचेल याची नियोजन करावे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कृती आराखडा अद्ययावत करण्यासाठी प्रत्येक विभागाने आपला आराखडा दि. 20 मे, 2025 पूर्वी सादर करावा. आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने मदतीसाठी निर्माण करण्यात आलेली यंत्रणा आवश्यक त्या साधनांनी अद्ययावत असल्याची खातरजमा करावी. पावसाळ्यातील संभाव्य साथीचे व जलजन्य आजार नियंत्रणात ठेवण्यासाठी आरोग्य व पशुसंवर्धन विभागाने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. आरोग्य विभागाने वैद्यकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना मुख्यालयी उपस्थित राहण्याच्या सूचना द्याव्यात. पावसाळ्यात उत्पन्न होणाऱ्या साथीच्या रोगराईंना थांबविण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधी व रक्तसाठा उपलब्ध ठेवावा. आरोग्याच्या सुविधा नागरिकांना वेळेत उपलब्ध होण्यासाठी आरोग्य पथकांची नियुक्ती करावी. नदी काठावरील गावात बचाव पथक, यांत्रिकी बोट, लाईफ जॅकेट, लाईफ रिंग, लाईफ बोयाज पोहणारे व्यक्तींची यादीसह इतर साधन सामुग्रीची उपलब्धता व सुस्थिती तपासुन ठेवावी. पुरपरिस्थितीमध्ये नागरिकांना तात्पुरता निवारा, मुलभुत सुविधा वेळेत उपलबध होण्यासाठी पालिका व तहसील विभागानी सुरक्षीत स्थळांची निवड करता आतापासूनच नियोजन करुन ठेवावे. वीजपुरवठा सुरळीत राहण्यासाठी महावितरणाने पूर्व नियोजन करावे. नागरी भागातील नाल्याची स्वच्छता करुन घ्यावी. तसेच नागरी व ग्रामीण भागातील धोकादायक इमारती व घरांची पाहणी करुन संबंधीतांना पूर्व सूचना देण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांनी यावेळी दिले.

प्रारंभी मान्सून पूर्वतयारीच्या अनुषंगाने निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडीक यांनी सादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती दिली. नागरिकांनी कोणत्याही आपत्तीत जिल्हा नियंत्रण कक्षाचा टोल फ्रि क्र. 1077 आणि कार्यालयाचा 02482-223132 या क्रमांकावर मदतीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन केले. यावेळी पूरस्थितीबाबत पूर्व सूचना, मोठे व मध्यम पाटबंधारे प्रकल्प, संभाव्य पूरपरिस्थितीमध्ये बाधित होणारी गावे, तसेच पाण्याचा विसर्ग याबाबतही आढावा घेण्यात आला.

यावेळी बैठकीस उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, नगरपालिकेचे मुख्याधिकारी, आरोग्य विभाग, पुरवठा विभाग, महावितरण, कृषी, पाटबंधारे, जलसंधारण, बीएसएनएल आदी विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.


**

विधान परिषदेच्या उप सभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचा जालना जिल्हा दौरा


 

    जालना दि.15 (जिमाका):- महाराष्ट्र विधान परिषदेच्या उप सभापती श्रीमती डॉ. नीलम गोऱ्हे या जालना जिल्ह्याच्या   दौऱ्यावर येत असून, त्यांच्या दौऱ्याचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे असणार आहे. श्रीमती डॉ. गोऱ्हे या शुक्रवार दि. 16 मे, 2025 रोजी दुपारी 3.30 वा. शासकीय विश्रामगृह, जालना येथे आगमन व राखीव. दुपारी 4 वाजता अवकाळी पाऊस, महिला अत्याचार, पाणी व ऊसतोड कामगार व इतर विषयांवर शासकीय अधिकारी यांचे समवेत बैठकीस उपस्थिती राहतील. सायं. 6.30 वा. शासकीय विश्रामगृह, जालना येथून सोईनुसार परभणीकडे प्रयाण करतील.