Friday, 11 October 2024

देवी मुर्ती विसर्जन कालावधीत घाणेवाडी तलावाजवळ प्रतिबंधात्मक आदेश लागु

 


      जालना, दि.11 (जिमाका) : जालना जिल्ह्यात व शहरात दि. 3 ऑक्टोबर, 2024 ते दि. 12 ऑक्टोबर, 2024 पासून नवरात्र उत्सव साजरा होत असून, दि. 11 ऑक्टोबर, 2024 व दि. 12 ऑक्टोबर, 2024 रोजी देवी मुर्ती विसर्जनाकरीता मोतीबाग तलाव येथे व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी विसर्जनासाठी गर्दी असल्यास काही देवी मुर्ती विसर्जनाकरीता घाणेवाडी तलाव येथे विसर्जनासाठी जाण्याची शक्यता आहे. घाणेवाडी तलावातून पिण्याचे पाणी जालना शहरात येत असल्याने तेथे देवी मुर्ती विसर्जनासाठी गेल्यास गावकरी त्यास विरोध करु शकतात, त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दि. 11 ऑक्टोबर, 2024 व दि. 12 ऑक्टोबर, 2024 रोजी देवी मुर्ती विसर्जन कालावधीत व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने भारतीय नागरीक सुरक्षासंहिता 2023 चे कलम 163 अंतर्गत घाणेवाडी तलावाच्या 200 मीटर परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश लागु करीत आहे.

     अपर जिल्हादंडाधिकारी यांच्या आदेशानुसार भारतीय नागरिक सुरक्षासंहिता 2023 चे कलम 163  अन्वये घाणेवाडी  तलावाच्या 200 मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू राहणार आहेत. हा आदेश दि. 11 ऑक्टोबर 2024 रोजीच्या 6.00 वाजेपासून ते दि. 13 ऑक्‍टोबर 2024 रोजीच्या 6.00 वाजेपर्यंत अंमलात राहणार असल्याचे अपर जिल्हादंडाधिकारी यांनी कळविले आहे.

-*-*-*-*-

कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध अधिनियमांतर्गत गठीत तक्रार समितीचा फलक आस्थापनेच्या दर्शनी भागात लावणे अनिवार्य

 


जालना, दि.11 (जिमाका) : कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम2013 अनुषंगाने शासन निर्णय, महिला व बाल विकास विभाग दि. 19.06.2014 अन्वये प्रत्येक शासकीय / निमशासकीय कार्यालये, महामंडळे, मंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था, रुग्णालये, खाजगी क्षेत्र, संघटना, एन्टरप्राईजेस, अशासकीय संघटना, सोसायटी, ट्रस्ट, उत्पादक, पुरवठा वितरण, विक्री, यासह वाणिज्य, व्यवसाईक, शैक्षणिक, करमणूक, औद्योगिक, आरोग्य इत्यादी सेवा किंवा वित्तीय कामकाज पार पाडणारे युनीट किंवा सेवा पुरवठादार, रुग्णालये, सुश्रुषागृहे, क्रिडा संस्था, प्रेक्षागृहे इत्यादी ठिकाणी सदर अधिनियमाचे कलम 6 (1) अन्वये अंतर्गत तक्रार समिती गठीत करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच अंतर्गत तक्रार समिती स्थापन नसेल तर रक्कम रुपये पन्नास हजार इतक्या दंडास पात्र आहेत. महिला व बाल विकास विभागाच्या शासन निर्णय दि. 19 जुन, 2014 प्रमाणे अंतर्गत तक्रार समिती गठीत करणे अनिवार्य आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व आस्थापनांनी अंतर्गत तक्रार समितीची स्थापना करून अधिनियमाचे कलम 19 (b) अन्वये सदरील समितीचा फलक कार्यालयाच्या दर्शनी भागात लावावा. दर्शनी भागात लावण्यात येणाऱ्या फलकावर पुढील बाबींची समावेश असणे आवश्यक आहे. यामध्ये कार्यालयाचे नाव, सदरील अधिनियमांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या समितीचा आदेश क्रमांक व दिनांक, अंतर्गत तक्रार समितीचे अध्यक्ष व सदस्यांची नावे, पत्ता व संपर्क क्रं. कायद्यातील तरतुदीचा भंग केल्यानंतर कलमानुसार असलेला दंड व शिक्षा, Women Helpline Number-181, Emergency Response Support System Number- 112,कार्यालयाचा दुरध्वनी क्रं., नोडल अधिकारी यांचा संपर्क क्रं. इत्यादी असणे आवश्यक आहे.

वरील बाबींचा दर्शनी भागात लावण्यात आलेल्या फलकामध्ये समावेश असणे आवश्यक आहे. सदरील फलक लावण्यात आल्याबाबतचा अहवाल फोटोसह जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, तळ मजला, प्रशासकीय इमारत, जालना यांचे कार्यालयास अहवाल सादर करावेत, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-

 

कोजागिरी पोर्णिमानिमित्त अंबड हद्दीतील वाहतुक मार्गात बदल

 


जालना, दि.11 (जिमाका) : जालना जिल्ह्यातील अंबड येथे दि. 16 ऑक्टोबर, रोजी कोजागिरी पोर्णिमा मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येते. त्याअनुषंगाने अंबड हद्दीतील मत्सोदरी देवी मंदीर येथे कोजागिरी पोर्णिमेच्या दिवशी  दर्शनी यात्रा भरुन मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असते. मंदीरात दर्शन घेण्याकरीता मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होते. अवजड वाहनांच्या रहदारीमुळे क्षुल्लक बाबीवरुन विवादीत परिस्थिती निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याअनुषंगाने भाविकांच्या व जनतेच्या सुरक्षिततेसाठी व वाहतुकीच्या सुनियमानासाठी सदर मार्गावरील अवजड वाहनांना पर्यायी मार्गाने वळविण्यात येत आहे.

पोलीस अधिक्षक अजय कुमार बन्सल यांना प्राप्त अधिकारान्वये त्यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 ची कलम 36 अन्वये, जालनाकडे येणारी अवजड वाहनांना दि. 15 ऑक्टोबर, 2024 रोजी 23.00 वाजता ते दि. 16 ऑक्टोबर, 2024 रोजीच्या 24.00 वाजेपर्यंत खालील नमुद पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेशीत केले आहे.

यात बीडकडून अंबडमार्गे जालनाकडे येणारी अवजड वाहने ही (शहागड, हरीओम हॉटेल वडीगोद्रीसमोरील उड्डाणपुलाचे खालुन, पाचोड, अंबड, गोलापांगरीमार्गे जालनाकडे जातील.) तसेच जालनाकडुन अंबडमार्गे बीडकडे जाणारी अवजड वाहने ही याच पर्यायी मार्गाचा अवलंब करतील.

तसेच घनसावंगीकडुन अंबडमार्गे जालनाकडे जाणारी अवजड वाहने ही (सुतगिरीणी चौफूली  घनसावंगी, गुरुपिंपरी, राणीउंचेगाव, राणीउंचेगाव फाटा, अंबड येथील महालक्ष्मी पेट्रोल पंप समोरुन, गोलापांगरी मार्गे जालनाकडे जातील.) जालनाकडून अंबडमार्गे घनसावंगीकडे जाणारी अवजड वाहने ही याच पर्यायी मार्गाचा अवलंब करतील.

तर घनसावंगीकडून अंबडमार्गे शहागडकडे जाणारी अवजड वाहने ही (सुतगिरणी चौफुली घनसावंगी, तिर्थपुरी, सुखापुरी, सुखापुरी फाटा, वडीगोद्री, यामार्गे शहागडकडे जातील.) शहागडकडून अंबडमार्गे घनसावंगीकडे जाणारी वाहने ही याच पर्यायी मार्गाचा अवलंब करतील.

वरील मार्गाचे अवजड वाहतूकीमध्ये दि. 15 ऑक्टोबर, 2024 रोजी 23.00 वाजता ते दि. 16 ऑक्टोबर, 2024 रोजीच्या 24.00 वाजेपर्यंत बदल करण्यात आला असून सर्व वाहन धारकांनी याची नोंद घ्यावी असे पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

Tuesday, 8 October 2024

सस्नेह निमंत्रण

 


सस्नेह निमंत्रण

राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांचा जालना जिल्हा दौरा कार्यक्रम


 

जालना, दि.8 (जिमाका) :- महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन हे जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

            बुधवार दि.9 ऑक्टोबर, 2024 रोजी दुपारी 2.45 वाजता हेलिकॉप्टरने जालना येथील पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर आगमन व राखीव.  दुपारी 2.50 वाजता पोलिस मुख्यालय येथून शासकीय विश्रामगृह जालनाकडे प्रयाण करतील. दुपारी 2.55 वाजता शासकीय विश्रामगृह जालना येथे आगमन व राखीव. दुपारी 3 ते 5 या वेळेत शासकीय विश्रामगृह जालना येथे संवाद, भेटीसाठी राखीव. सोईनूसार रात्रीचे जेवण व मुक्कामासाठी राखीव राहतील.

            गुरुवार दि.10 ऑक्टोबर रोजी सकाळी 9.40 वाजता शासकीय विश्रामगृह येथून पोलिस मुख्यालयाच्या मैदानावरील हेलिपॅडकडे प्रयाण. सकाळी 9.45 वाजता पोलिस मुख्यालय मैदानावरील हेलिपॅड येथे आगमन व राखीव. सकाळी 9.55 वाजता हेलिकॉप्टरने हिंगोलीकडे प्रयाण करतील.

-*-*-*-*-

जवाहर नवोदय विद्यालयातील प्रवेशासाठी आवाहन

 

 

जालना, दि.8 (जिमाका) :- जवाहर नवोदय विद्यालयातील वर्ग नववी व अकरावीसाठी प्रवेश परीक्षा शनिवार दि.25 फेब्रुवारी, 2025 रोजी आयोजित करण्यात आली आहे. जालना जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या व इयत्ता आठवीच्या वर्गात 2024-25 या वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी सेवा केंद्रावरुन किंवा इतर ठिकाणावरुन ऑनलाईन अर्ज https://cbseitms.nic.in/ या संकेतस्थळावर बुधवार दि.30 ऑक्टोबर, 2024 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन अंबा-परतूर जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य एस.जी. पवार यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी-2025 लॅटरल इंन्ट्रीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी प्रमाणपत्र, छायाचित्र, स्वाक्षरी 10 ते 100 केबीमध्ये स्कॅन करुन भरावेत. विद्यार्थ्यांचा जन्म  दि. 1 मे, 2010 ते 31 जुलै, 2012 या कालावधीत झालेला असावा. तरी जिल्ह्यातील मुख्याध्यापकांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेशासाठी अर्ज वेळेत भरावेत. असेही  प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील पात्र बचत गटांना उपस्थित राहण्याचे आवाहन

 

 

जालना, दि.8 (जिमाका):- अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचत गटांना 9 ते 18 अश्वशक्तीचे मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने 90 टक्के अनुदानावर वाटप करण्यात येतात. तरी बुधवार दि. 9 ऑक्टोंबर, 2024 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील भारतरत्न          डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथील सांस्कृतिक सभागृहामध्ये पात्र बचतगटातील अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिव यांनी लॉटरी पध्दतीने बचतगटांची निवड करण्यासाठी उपस्थित रहावे. असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त अनंत कदम यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

सन 2023-24 या आर्थिक वर्षातील सदर योजनेंतर्गत एकुण दहा मिनी ट्रॅक्टरचे उद्दिष्ट प्राप्त झाले होते. त्यानुषंगाने अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील स्वयंसहाय्यता बचतगटांकडुन अर्ज मागविण्यात आले. पात्र असलेल्या बचतगटांपैकी उद्दीष्टाच्या अनुषंगाने दहा बचतगटांची निवड करावयाची आहे. बचतगटांची लॉटरी पध्दतीने निवड करण्यात येणार आहे. सदर बचतगटांची अंतिम पात्र व अपात्र यादी कार्यालयाच्या सुचनाफलकावर डकविण्यात आलेली आहे. मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने या योजनेंतर्गत लॉटरी पध्दतीने स्वयंसहाय्यता बचतगटांची निवड करण्यात येणार आहे. असेही प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-