Wednesday, 21 May 2025

माय भारत योजनेद्वारे नागरी संरक्षण स्वयंसेवक नोंदणी सुरु

 


  जालना दि.21 (जिमाका) :  माय भारत, भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, (नवी दिल्ली ) अंतर्गत नागरी संरक्षण स्वयंसेवक म्हणून नोंदणी करण्यासाठी देशभरातील तरुणांना सक्रियपणे एकत्रित केले जात आहे. हा देशव्यापी उपक्रम तरुण नागरिकांना राष्ट्रीय कार्यात सहभागी करून घेण्याचा आणि विशेषतः आणीबाणी व संकटाच्या वेळी महत्त्वाची भूमिका पार पाडण्यासाठी सक्षम करण्याचा प्रयत्न करत आहे. नैसर्गिक आपत्ती, अपघात, सार्वजनिक आणीबाणी आणि इतर अनपेक्षित परिस्थितीत नागरी प्रशासनास सहकार्य करू शकणारे एक प्रशिक्षित, प्रतिसादक्षम व लवचिक स्वयंसेवक दल तयार करणे, हे या मोहिमेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. सद्याची परिस्थिती आणि वाढत्या सुरक्षा चिंता लक्षात घेता, एक मजबूत समुदायाधारित प्रतिसाद यंत्रणा उभारण्याची निकड आहे. नागरी संरक्षण स्वयंसेवक स्थानिक प्रशासनाला बचाव व निर्वासन, प्रथमोपचार अशा विविध सेवा देण्यामध्ये मोलाची मदत करतात. नोंदणीसाठी अधिकृत संकेतस्थळः https://mybharat.gov.in नोंदणी प्रक्रिया सोपी आणि सर्वांसाठी खुली आहे. तरुणांनी पुढे येऊन या राष्ट्रीय कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा युवा अधिकारी प्रणीत सांगवीकर यांनी केले आहे.

-*-*-*-*-

लेख पावसाळयात विजांपासून रक्षण

 

                                                                

 


 

भारतात जून महिन्यात मान्सुन ऋतूचे आगमन होते. यावेळी शेतकरी आपल्या शेतीच्या मशागतीला सुरुवात करतात. शेतमजूरही शेतीच्या विविध कामात व्यस्त होतात. या कालावधीत वादळ आणि वीजेच्या कडकडाटसह पावसाला सुरुवात झाल्यास शेतावर काम करणारे शेतकरी-शेत मजूर आणि इतरांना नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागते. दरवर्षी वीज पडून शेकडो नागरिकांना आपले प्राण गमवावे लागत होते. विशेषतः शेतकरी, मेंढपाळ यांना शेतात, जंगलात उघड्यावर वीज, वारा यांचा सामना करावा लागतो.  या पावसाळ्यात पडणाऱ्या वीजेपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सूचविलेल्या गोष्टींची खबरदारी घेतल्यास विजेच्या आपत्तीला तोंड देता येऊ शकते. तसेच विजेपासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी सुरक्षितता कशी  बाळगली पाहिजे हे आपण बघू या.

शेतात काम करीत असतांना वीजा कडाडत असल्यास शेतातील घराचा आसरा घ्यावा. पाण्यात असल्यास तात्काळ पाण्याबाहेर यावे. एखाद्या झाडाजवळ असल्यास झाडाच्या उंचीपेक्षा झाडापासून दुप्पट अंतरावर उभे राहावे. ओल्या शेतात रोपे लावण्याचे व अन्य काम करणाऱ्या व्यक्ती किंवा तलावात काम करीत असलेल्या व्यक्तीनी तात्काळ कोरड्या किंवा सुरक्षित स्थळी जावे. शेतामध्ये काम करीत असतांना सुरक्षित ठिकाणी आसरा घेतला नसेल तर शक्यतो जिथे असेल तिथेच रहावे. शक्य झाल्यास पायाखाली लाकूड, प्लॅस्टिक, गोणपाट सारख्या वस्तू अथवा कोरडा पाला पाचोळा ठेवावा. दोन्ही पाय एकत्र करुन गुडघ्यावर दोन्ही हात ठेवून डोके जमिनीकडे झुकवावे मात्र डोके जमिनीवर ठेऊ नये.

            शेतात काम करतांना शेतकरी हे विविध कृषी औजारे हाताळत असतात. अशावेळी धातुपासून बनविलेल्या वस्तू यंत्र इत्यादीपासून दूर रहावे. गावाभोवती किंवा शेत, आवार, बाग-बगीचा आणि घर यांच्याभोवती तारेचे कुंपण घालू नये. कारण ते वीजेला सहजपणे आकर्षित करीत असते. धातूची दांडी असल्यास छत्रीचा उपयोग करु नये. वीजेच्या खांबाजवळ थांबू नये किंवा उभे राहू नये. तसेच झाडाखाली उभे राहू नये. उंच जागेवर झाडावर चढू नये. वीज वाहक असलेल्या रेडियेटर, स्टोव्ह, मेटल, लोखंडी पाईप आदी वस्तूपासून दूर रहावे. वीजा कडाडत असल्यास विद्युत उपकरणे बंद ठेवून शक्यतो घरातच रहावे, बाहेर पडू नये. पाण्याचे नळ, फ्रिज, टेलीफोन आदी वस्तूंना अशावेळी स्पर्श करु नये. तसेच वीजेपासून चालणाऱ्या यंत्रापासूनही दूर रहावे. कपडे वाळविण्यासाठी तारेचा वापर न करता, सुतळी अथवा दोरीचा वापर करावा.

            कोसळणाऱ्या वीजेपासून संरक्षण करण्यासाठी मजबूत असलेले पक्के घर हे सर्वांत सुरक्षित ठिकाण आहे. शक्य असल्यास आपपल्या घरी वीज वाहक यंत्रणा बसवावी. टेलीफोन आणि विजेचे खांब किंवा टेलीफोन/टेलीव्हिजन टावर यापासून दूर रहावे. आपल्या घराशेजारी किंवा शेत जमिनीच्या आसपास कमी उंचीची झाडे लावावी.  

मोठ्या प्रमाणात वीजा चमकत असल्यास किंवा कडकडाट सुरु असल्यास प्लग जोडलेली उपकरणे हाताळू नये. दूरध्वनीचा वापर अशावेळी करु नये. दोन चाकी वाहन, सायकल, ट्रक, ट्रॅक्टर किंवा नौका यावर असल्यास तात्काळ उतरुन सुरक्षित ठिकाणी जावे. अशा परिस्थितीत वाहनातून प्रवास करु नये. एखाद्याच्या शेतावर किंवा घराशेजारी उंच वृक्षाचे खोड अथवा फांदीवर तांब्याची एक तार बांधून तिचे दुसरे टोक जमिनीत खोलवर गाडून ठेवावे. म्हणजे हे झाड सुरक्षित होईल. वाहनातून प्रवास करत असल्यास वाहनातच रहावे. वाहनाच्या बाहेर थांबणे आवश्यक असल्यास धातुचे कोणतेही उपकरण हातात बाळगू नये. जंगलात गेले असल्यास कमी उंचीच्या व दाट झाडांचा आसरा घ्यावा. वृक्ष दलदलीची ठिकाणे अथवा पाण्याचे स्त्रोतापासून शक्यतो दूर रहावे किंवा आकाशाखाली राहण्यापेक्षा लहान झाडाखाली आसरा घ्यावा. मोकळ्या आकाशाखाली राहणे आवश्यक असल्यास खोलगट ठिकाणी रहावे. एकाच वेळी जास्त व्यक्ती एकत्र राहू नये. दोन व्यक्ती असल्यास किमान त्यांचात 10 ते 15 फुट अंतर असणे आवश्यक आहे. पोहणारे किंवा मच्छिमारी करणाऱ्यांनी अशावेळी तात्काळ पाण्यातून बाहेर यावे.

 

विजेबाबत काही काल्पनीक समज आणि वास्तव 

 

समजूत : वीज एकाच ठिकाणी दुस-यांदा कधीही पडत नाही. 

वास्तव : निर्जन स्थळी, उंच इमारतीवरील कळसावर वीज वारंवार कोसळते, जिथे वीज पडण्याची शक्यता जास्त असते, अशा जागा वादळी हवामानात टाळयाव्यात.

समजूत : पाऊस पडत नाही व ढगाळ हवामान नसेल, तर आपल्यावर वीज पडणार नाही.

वास्तव : वीज जवळ जवळ 5 कि. मी. अंतरावर सुध्दा पडू शकते. त्यामुळे हवामान ढगाळ नाही, पाऊस नाही, तरीही वीज पडू शकते, वज्राघात (जास्त ताकदीची वीज) कधी कधी 20-25 किमी अंतरावर सुध्दा पडू शकते. अगदी दुर्मिळ प्रसंगी वीज 80 कि.मी. अंतरावर देखील पडल्याच्या घटना घडलेल्या आहेत.

समजूत : चार चाकी वाहनात असतांना रबर टायरमुळे विजेपासून संरक्षण होते.

वास्तव : वीज टायरपासून 2 इंच दुरच राहते हे खरे आहे. पण खरे पाहता, संरक्षण होण्यास टायर बरोबरच धातूचे छप्पर व बाजूमुळे मदत होते. मोटरसायकल, सायकल, उघड्या टपाची चारचाकी वाहने, फायबर ग्लास, प्लॅस्टीकचे कवच असलेली चारचाकी वाहने यांना विजेपासून तसे संरक्षण मिळत नाही. शेतावरील ट्रॅक्टर ट्रॉली यांना जर छप्पर नसेल, तर त्यांनाही तसे संरक्षण मिळत नाही. पण त्यांना छप्पर असेल, तर ती वाहने सुरक्षित राहतात.

समजूत : ज्याच्या अंगावर वीज पडली आहे, ती व्यक्ती विद्युतभारीत असते आणि तिला स्पर्श केल्यास आपल्याला सुध्दा विजेचा झटका बसतो.

वास्तव : मानवी शरीर वीज साठवून ठेवू शकत नाही. त्यामुळे वीजबाधित व्यक्तीला स्पर्श करणे वा त्या व्यक्तीला प्राथमिक उपचार करणे, यात मदत करणाऱ्या व्यक्तीला कसलाही धोका नसतो. वरील कल्पित समज अत्यंत चुकीचा आहे. अशा अपसमजामुळे सीपीआर किंवा कृत्रिम श्वासोच्छवास असे प्राथमिक उपचार दिले गेलेले नाहीत. तर एखादी व्यक्ती वाचण्याची 90 टक्के शक्यता असूनसुध्दा ती मृत्युमुखी पडू शकते.

समजूत : जर पावसाळी वादळी हवामानात सापडलात, तर झाडाखाली आश्रय घ्यावा.

वास्तव : वीज पडून मृत्युमुखी पडण्याची जी प्रमुख कारणे आहेत, त्यात झाडाखाली थांबलेल्या लोकांचा दुसरा नंबर लागतो.

समजूत : पावसाळी हवामानात मी घरातच राहीलो, तर मी सुरक्षित आहे.

वास्तव : पावसाळी/वादळी हवामानात घरात राहणे हे निश्चितच चांगले आहे, पण पूर्ण सुरक्षित आहे असे नाही. वीज-प्रवाह ज्याच्यातून वाहू शकतो, अशा गोष्टी असुरक्षित आहेत. उदा. बाहेरुन घरात येणारी ओली पाऊलवाट, टेलिफोनच्या-टिव्हिच्या-विजेच्या तारा, विजेची उपकरणे, तसेच नळ (अगदी प्लॅस्टिकचे नळ-ज्यातून पाणी वाहत असते). लोखंडी दारे, खिडक्या इत्यादी, विजेचा कडकडाट होत असताना खिडकीजवळ उभे राहणे धोकादायक असते. त्यापेक्षा खोलीत आतील भागात राहणे जास्त सुरक्षित असते.

समजूत : मैदानी खेळ चालू असतांना विजेचा कडकडाट झाला, पाऊस आला, तरी आसरा घ्यायच्या ऐवजी खेळ संपेपर्यंत खेळत राहिले पाहिजे. धातूनिर्मित वस्तु, अंगावरील धातूचे दागिने, घड्याळ, पाठीवरील पिशव्या विजेला आकर्षित करतात.

वास्तव : मैदानी खेळात वीज पडून मृत्युमुखी पडणे/जखमी होणे ह्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. आयुष्यापेक्षा कुठलाही खेळ महत्त्वाचा नसतो. मैदानी खेळ खेळणाऱ्या व्यक्तीनी कडाडणाऱ्या विजेपासून संरक्षण मिळवण्यासाठी आधीच एक योजना बनवावी आणि ती सर्वांना माहिती करुन द्यावी. त्याप्रमाणे वागणे बंधनकारक करावे. वरील हवामानात विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. तर सुरक्षित जागेत त्वरित आसरा घ्यावा, लहान मुलांचे संरक्षण करणे, ही मोठ्याची जबाबदारी आहे, हे विसरु नये.

समजूत : धातूनिर्मित वस्तु, अंगावरील धातूचे घड्याळ, पाठीवरील पिशव्या विजेला आकर्षित करतात.

वास्तव : उंच, टोकदार आणि एकाकी जागा ह्यांच्यावर वीज पडणे ह्याची शक्यता जास्तीत-जास्त असते. त्यामुळे धातूनिर्मित वस्तू असल्या तरी काही फरक पडत नाही. डोंगर जरी दगडा-मातीचे असले, तरी त्यावर दर वर्षी अनेकदा वीज कोसळते. विजेचा कडकडाट सुरु झाला तर प्रथमतः चांगले संरक्षण मिळेल असा आसरा विनाविलंब घ्यावा. अंगावरील दागिने काढण्यात वेळ घालवू नये किंवा जिथे नीट संरक्षण मिळणार नाही, अशी जागा टाळावी. धातू विजेला जरी आकर्षित करत नसेल, तरी पण ज्यांची लांबी धातूनिर्मित वस्तू (तारेची कुंपणे, कठडे, वाहने इ.) धोकादायक असतात, त्यापासून दूरच राहवे. वीज जर कोसळली, तर अशा वस्तू वीज भारवाहक असल्याने ती प्रवाहित वीज अगदी 100 मीटर अंतरापर्यंत येऊन एखाद्या व्यक्तीला मृत्युदंड देवू शकते.

समजूत : वादळी हवामान, विजा कडकडत असतांना जर एखादी व्यक्ती त्यात अडकली, तर जमिनीवर लोटांगण घालणे हे सुरक्षित. जर वीज पडण्याची शक्ता असेल, तर टोकदार सुळक्याच्या जवळ 45 च्या शंकुक्षेत्रात पोहोचल्याने वीजक्षतीपासून संरक्षण मिळते.

वास्तव : ही अगदी कालबाह्य व पूर्ण चुकीची समजूत आहे. खरे पाहता जमिनीवर बसावे, दोन्ही गुडघे एकत्र करून त्यात डोके खुपसावे आणि दोन्ही हातांनी पायांना मिठी मारून बसावे, जमिनीवर वीजप्रवाह वाहू लागल्यास तो 30 मीटर पर्यंतसुध्दा वाहतो आणि तो धोकादायक असू शकतो. जरी जमिनीवर झोपल्याने पडणाऱ्या विजेपासून संरक्षण मिळण्याचे प्रमाण वाढते, ही गोष्ट चांगली, तरी जमिनीवरुन प्रवाहित विजेचा धोका वाढतो, ही गोष्ट वाईटच. त्यामुळे कमीत-कमी उंचीवर असणे व जमिनीशी कमीत-कमी स्पर्श असणे, ह्याची सांगड घालायची असेल, तर वरील कृती करणे, हेच जास्त सुरक्षित. खरे पाहता, घराबाहेर जाताना वादळी हवामान टाळणे हेच महत्त्वाचे ठरते. हा उपाय अगदी शेवटचा.

समजूत : जर वीज पडण्याची शक्यता असेल, तर टोकदार सुळक्याच्या जवळ 45 च्या शंकूक्षेत्रात पोहोचल्याने वीजक्षमतेपासून संरक्षण मिळते.

वास्तव : "शंकुक्षेत्र संरक्षण" हा समज चुकीचा आहे. उंच इमारती, सुळके ह्यांच्यावर वीज पडण्याची जास्तीत-जास्त शक्यता असते, तरीही त्याच्या जवळपास असणाऱ्या व्यक्ती, वस्तू यावर वीज पडणारच नाही असे नाही. त्यावरही वीज पडू शकते. शिवाय उंच इमारती, सुळके ह्यांच्यावर वीज पडली, तर त्याच्या 30 मीटरच्या परिघात असलेल्या व्यक्तीवर पण त्याचा आघात होऊ शकतो, आणि जर वीज ज्यावर पडली असते, त्या वस्तूला स्पर्श झाला किंवा वीजस्फोटाच्या परिघात जरी एखादी व्यक्ती असेल, तरी मृत्युदंड निश्चितच, त्यामुळे हे लक्षात घ्यावे की, विजेचा कडकडाट होत असतांना बाहेर जाणे टाळणे, हेच इष्ट. वीजप्रपात हा कधीही तथाकथित "शंकुक्षेत्रात" होऊ शकतो.

वीज पडून मृत्यू होण्याची भारतातील आकडेवारी फार मोठी आहे. दरवर्षी शेकडो लोक अशाप्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे आपले प्राण गमावतात. बऱ्याच घटनांमध्ये जागरुकता नसल्यामुळे मृत्यू होतात. अशा वेळी वरील स्वरक्षण पध्दतीचा अवलंब केल्यास वीजेपासून स्वत:चे व इतरांचे संरक्षण करण्यास नक्कीच मदत होईल.

 

 

जिल्हा माहिती कार्यालय

जालना

 

 

Monday, 19 May 2025

निवृत्तीवेतनधारकांनी ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या संदेशास बळी पडू नये

 


जालना, दि.19(जिमाका): निवृत्तीवेतन सुरु करणे, निवृत्तीवेतन बंद करणे, निवृत्तीवेतन फरक अदा करणे अथवा अतिरिक्त रक्कम वसूल करण्याच्या अनुषंगाने राज्यातील कोषागार कार्यालयामार्फत फोनद्वारे/मोबाईलद्वारे निवृत्तीवेतनधारकांना कळविले जात नाही. तसेच व्हॉट्ॲपद्वारे अथवा इतर सोशल मिडियावरुन निवृत्तीवेतन बंद होऊ नये, याकरिता लिंक ओपन करुन फॉर्म भरण्याबाबतही कळविले जात नाही. तसेच कोषागार कार्यालयामार्फत कोणत्याही कर्मचाऱ्यास निवृत्तीवेतनधारकाच्या घरी पाठविले जात नाही. कोषागारमार्फत करण्यात येणाऱ्या सर्व व्यवहारांकरीता पत्रव्यवहार केल्या जातो. सर्व निवृत्तीवेतनधारकांना आवाहन करण्यात येत आहे की, त्यांनी फोन पे/गुगल पे/ ऑनलाईन रक्कम भरण्याचा अथवा ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या संदेशास बळी पडू नये. अशा प्रकारे दुरध्वनीद्वारे /मोबाईलद्वारे संदेश प्राप्त झाल्यास जिल्हा कोषागार कार्यालयाशी तातडीने संपर्क साधाण्याचे आवाहन कोषागार अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-

जिल्ह्यात यलो अलर्ट; सोसाट्याचा वारा, पावसाची शक्यता दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

 


 

जालना दि.19 (जिमाका) : प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, कुलाबा, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार जालना जिल्हयात दि. 19 मे व 22 मे 2025 रोजी यलो  (Yellow) अलर्ट जारी केला असुन तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (ताशी 40-50 कि.मी.प्र.ता. वेगाने) हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच 23 मे 2025 रोजी ढगांच्या गडगडाटासह हलका पाउस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनातर्फे जिल्ह्यातील नागरीकांना खालीलप्रमाणे दक्षता घेणेबाबत आवाहन करण्यात येत आहे.

            मेघगर्जनेच्या वेळी, वीजा चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहू नये. वीजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. गडगडाटीच्या वादळादरम्यान व वीजा चमकतांना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. वीजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा, ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल / सायकल यांचेपासून दूर रहावे,मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्वजांचे खांब, विद्युत/दिव्यांचे खांब, धातुचे कुंपण, विदयुतवाहिनी अथवा ट्रॉन्सफोर्मजवळ थांबू नये. सर्व प्रकारच्या अर्थातरी लटकणा-या / लोंबणा-या तारांपासून दूर रहावे.वीजा चमकत असताना मोकळ्या जागेवर असल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्ही गुडघ्यांच्यामध्ये झाकावे, जमीनीशी कमीतकमी संपर्क असावा.अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी बांधवांनी वेळीच नियोजन करावे. शेतक-यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल किंवा त्याप्रमाणे नियोजन केले असेल, तर सदर मालाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी,जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे.

सर्व नागरीकांनी वादळी वारे, वीज पासून स्वतः सह जनावरांचे संरक्षण होईल याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी, आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना 02482-223132 वर तसेच नजीकचे तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन यांचेशी संपर्क साधाण्याचे आवाहजन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण गणेश महाडिक यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-*-

 

Friday, 16 May 2025

विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी बैठकीत घेतला विविध विषयांचा आढावा

 





जालना, दि.16(जिमाका): विधान परिषदेच्या उपसभापती श्रीमती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज येथील शासकीय विश्रागृहात आयोजित आढावा बैठकीत जालना जिल्ह्यातील विविध विषयांचा आढावा घेवून प्रशासनाला महत्त्वाचे निर्देश दिले.

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी अवकाळी पाऊस, महिला अत्याचार, पाणी टंचाई व ऊसतोड आणि घरकाम कामगार आदी विषयांचा संबंधीत विभाग प्रमुखांकडून आढावा घेतला. यावेळी बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, प्र. पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, जिपचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडीक,  महिला बालविकास अधिकारी कोमल कोरे, सार्वजनीक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता श्रीमती पवार, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री. कापसे आदींची उपस्थिती होती.

ऊसतोड कामगार महिलांसाठीच्या योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतांना श्रीमती डॉ गोऱ्हे म्हणाल्या की, ऊसतोड महिला कामगारांच्या आरोग्य विषयक सर्वेक्षणाची आवश्यकता असल्याचे सांगितले. नोंदणी झालेल्या ऊसतोड कामगारांना नोंदणी कार्डचे वितरण करावेत. तसेच शासनाच्या योजनेचा लाभ देण्यासाठी जिल्ह्यातील घरकाम करणाऱ्या कामगारांचे सर्वेक्षण करुन त्यांची माहिती संकलीत करावी. केवळ मुलींची माता असल्याने नाकारण्यात येणाऱ्या मातांना मदत करण्याचा प्रयत्न करावा. जिल्ह्यात बालविवाहाच्या बाबतील चांगले काम झाले आहे. परंतू हे प्रमाण कमी करण्यासाठी गावपातळीवर जनजागृती होणे आवश्यक आहे. जिल्हा प्रशासनाने समाजसेवी संस्थांना या मोहिमेत सहभागी करून घ्यावे. तसेच पॉक्सो कायद्यांतर्गत येणाऱ्या प्रकरणांतील पीडित मुलींना महिला विषयक योजनांची माहिती मिळण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच या मुलींचे पुनर्वसन व सशक्तीकरणांवर भर देण्यात यावा. पोलीस विभागाने तयार केलेल्या मुलांसाठी जागरुकता पुस्तीकांचे समाज माध्यम आणि बचत गटांमार्फत जनजागृती करावी. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना अंतर्गत महिलांचे ग्रुप तयार करुन त्यांच्यामार्फत महिलां विषयक कायद्यांचा प्रसार करावा. जिल्ह्यातील बेपत्ता मुलींबाबत तपास वेगाने पूर्ण करावा. तसेच अशा घटना टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले. जिल्ह्यातील रिक्त पोलीस पाटलांची पदे भरण्याची कार्यवाही लवकरात लवकर करावी. तसेच जिल्ह्यात बालस्नेही पोलीस स्टेशन सुरु करवायचे असल्यास त्याचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना ही यावेळी उपसभापती श्रीमती डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी दिल्या.

मागील काही दिवसात राज्यातील विविध भागात अवकाळी पाऊस झाला असून, जालना जिल्ह्यात देखील अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे.  प्रशासनाने सर्व नुकसानींचे तात्काळ पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत मिळेल यासाठी प्रयत्न करावे. तसेच पावसाळ्यात वीज पडून अनेक नागरिकांचा मृत्यू होतो. याकरीता जिल्ह्यात महत्वाच्या ठिकाणांवर वीज नियंत्रक उभारण्याचे निर्देश श्रीमती डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी दिले.

जालना जिल्ह्यातील पाणी टंचाईचा आढावा घेतांना श्रीमती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, पिण्याच्या पाण्याची समस्या मोठी असून, नागरिकांची मागणी येताच पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यासाठी तात्काळ योग्य नियोजन व उपाय योजना करण्याचे निर्देश ही उपसभापती श्रीमती डॉ. गोऱ्हे यांनी दिले.

यावेळी बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, प्र. पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी आणि महिला बालविकास अधिकारी कोमल कोरे यांनी सादरीकरणांद्वारे माहिती सादर केली. बैठकीस सर्व संबंधित विभागांचे अधिकारी आणि इतर मान्यवरांची उपस्थिती होती.

 

****

21 मे रोजी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन

 

जालना दि.16 (जिमाका): नोकरीच्या शोधात असलेल्या जालना जिल्ह्यातील युवक-युवतींना विविध खासगी कंपन्या, कारखाने, उद्योग-व्यवसाय आणि आस्थापना यांचेकडील रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याच्या उद्देशाने तसेच रोजगार सहाय्यासाठी विशेष मोहिम सुरू करण्यात आली आहे. याप्रमाणे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,जालना यांचे मार्फत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर, प्रशासकीय इमारत, 2 रा मजला जिल्हाधिकारी कार्यालय जालना 431203 येथे दि. 21 मे, 2025 बुधवार रोजी प्लेसमेंट ड्राईव्ह-जागेवर निवड संधीचे आयोजन सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत करण्यात आले आहे. यासाठी टी.व्ही.एस. सप्लाय चैन सोल्युशन्स प्रा. लि. पुणे दहावी, बारावी, आयटीआय/पदवीधर बी.ए, बी.कॉम, बी.एसी उत्तीर्ण करिता फ्लोअर स्टाफ चे 50 पदे, डाटा एन्ट्री ऑपरेटर पदासाठी कोपा,आयटीआय / MS-CIT कॉम्पुटर ऑपरेटर उत्तीर्ण करिता 10 पदे, टो ऑपरेटर करिता डीझेल मेकेनिकॅल, ट्रक्टर मेकेनिकॅल, मोटार मेकेनिकॅल उत्तीर्ण करिता 50 पदे, तसेच अन्नपूर्णा फायनन्स  प्रा.लि. जालना यांची दहावी, बारावी, पदवीधर उत्तीर्ण करिता फील्ड क्रेडीट एक्झीकेटीव्हसाठीचे 20 पदे, मार्केटींग एक्झीकेटीव्ह करिता कोणतीही पदवी उत्तीर्णकरिता 20 पदे, अशी एकूण 120 रिक्तपदे प्राप्त झालेली आहेत. याकरीता नोकरी इच्छुक पात्रताधारक उपस्थित होणा-या उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येवून जागेवरच निवडीची संधी उपलब्ध आहे. जालना जिल्ह्यातील नोकरी इच्छुकांनी या संधीचा लाभ व अधिक माहिती घेण्यासाठी विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. त्याच प्रमाणे केंद्र शासनाच्या एन.सी.एस. पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्यासाठी देखील www.ncs.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी. यापूर्वी नोंदणी केली नसल्यास प्रथम आपली नोंदणी करावी आणि होम पेज वरील नोकरी साधक (Job Seekar) लॉगिन मधून आपल्या युजर आयडी व पासवर्डच्या आधारे लॉगिन करावे. त्यानंतर डॅसबोर्ड मधील पंडित दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर या बटनावर क्लिक करून जालना जिल्हा निवडून त्यातील [PLECEMENT DRIVE 1 (2025-26) JALNA] याची निवड करावी. उद्योजक/नियोक्तानिहाय त्यांच्या कडील रिक्त पदांची माहिती घ्यावी. याप्रमाणे आवश्यक किमान पात्रता धारण करीत असल्याची खात्री करून उपलब्ध असलेल्या रिक्त पदासाठी ऑनलाईन पद्धतीने आपला पसंती क्रमांक नोंदवावा आणि किमान दोन प्रतीत बायोडाटासह फोटो, शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता, इ. कागदपत्रे कंपनींना देण्यासाठी छायाप्रती संच सोबत ठेवून दिनांक 21 मे, 2025 बुधवार सकाळी 11 ते दुपारी 2 प्रत्यक्ष मुलाखतीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर, प्रशासकीय इमारत, 2 रा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय जालना 431203 येथे उपस्थित राहून या प्लेसमेंट ड्राईव्ह मध्ये सहभागी व्हावे आणि रोजगाराच्या या पर्वणीचा निश्चित लाभ घ्यावा असे आवाहन सहायक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, जालना यांनी केले आहे.

-*-*-*-*-*-

भारतीय सैन्य दलात नौकरीची संधी

 


जालना दि.16 (जिमाका): तांत्रिक पदवीधर शाखेच्या विद्यार्थ्यांना भारतीय सैन्यात अधिकारी होण्याची संधी मिळणार आहे. भारतीय सैन्यात तांत्रिक पदवीधर अभ्यासक्रम (TGC-142) साठी भरती प्रक्रिया होणार आहे. या अभ्यासक्रमासाठी निवड झाल्यास उमेदवारांना इंडियन मिलिटरी अकादमी (IMA), डेहराडून येथे प्रशिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे.

या भरतीसाठी फक्त अविवाहित पुरुष उमेदवार पात्र असणार आहेत. जे अभियांत्रिकी पदवीधर आहेत किंवा अंतिम वर्षात शिकत आहेत. या पदांसाठी वयोमर्यादा ही 20 ते 27 वर्षे (ज्यांचा जन्म 2 जानेवारी, 1999 ते 1 जानेवारी, 2006 दरम्यान झाला आहे.) दरम्यान आहे. बी.ई. मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा बी.टेक पदवी असणे आवश्यक आहे. तसेच, पदवी अधिसूचनेत नमूद केलेल्या अभियांत्रिकी शाखांमध्येच असावी. बी.ई./बी.टेक किंवा शेवटच्या वर्षात असलेले अविवाहित पुरुष उमेदवार अर्ज करु शकतात. 

इच्छुक उमेदवारांनी भारतीय सैन्याच्या अधिकृत वेबसाइट joinindianarmy.nic.in ला भेट देऊन आपलललल ऑनलाइन अर्ज सादर करावा. यासाठी नोंदणीची शेवटची तारीख 29 मे, 2025 पर्यंत आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटची मदत घ्यावी, असे अवाहन सैना भरती कार्यालय, औरंगाबाद यांनी केले आहे.

-*-*-*-*-*-