जालना, दि.16(जिमाका): विधान परिषदेच्या उपसभापती श्रीमती
डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज येथील शासकीय विश्रागृहात आयोजित आढावा बैठकीत जालना जिल्ह्यातील
विविध विषयांचा आढावा घेवून प्रशासनाला महत्त्वाचे निर्देश दिले.
उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी अवकाळी पाऊस, महिला अत्याचार, पाणी
टंचाई व ऊसतोड आणि घरकाम कामगार आदी विषयांचा संबंधीत विभाग प्रमुखांकडून आढावा घेतला.
यावेळी बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण
पांचाळ, प्र. पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, जिपचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष
बनसोडे, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडीक, महिला बालविकास अधिकारी कोमल कोरे, सार्वजनीक बांधकाम
विभागाच्या कार्यकारी अभियंता श्रीमती पवार, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री. कापसे
आदींची उपस्थिती होती.
ऊसतोड कामगार महिलांसाठीच्या योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतांना
श्रीमती डॉ गोऱ्हे म्हणाल्या की, ऊसतोड महिला कामगारांच्या आरोग्य विषयक सर्वेक्षणाची
आवश्यकता असल्याचे सांगितले. नोंदणी झालेल्या ऊसतोड कामगारांना नोंदणी कार्डचे वितरण
करावेत. तसेच शासनाच्या योजनेचा लाभ देण्यासाठी जिल्ह्यातील घरकाम करणाऱ्या कामगारांचे
सर्वेक्षण करुन त्यांची माहिती संकलीत करावी. केवळ मुलींची माता असल्याने नाकारण्यात
येणाऱ्या मातांना मदत करण्याचा प्रयत्न करावा. जिल्ह्यात बालविवाहाच्या बाबतील चांगले
काम झाले आहे. परंतू हे प्रमाण कमी करण्यासाठी गावपातळीवर जनजागृती होणे आवश्यक आहे.
जिल्हा प्रशासनाने समाजसेवी संस्थांना या मोहिमेत सहभागी करून घ्यावे. तसेच पॉक्सो
कायद्यांतर्गत येणाऱ्या प्रकरणांतील पीडित मुलींना महिला विषयक योजनांची माहिती मिळण्यासाठी
प्रयत्न करावेत. तसेच या मुलींचे पुनर्वसन व सशक्तीकरणांवर भर देण्यात यावा. पोलीस
विभागाने तयार केलेल्या मुलांसाठी जागरुकता पुस्तीकांचे समाज माध्यम आणि बचत गटांमार्फत
जनजागृती करावी. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना अंतर्गत महिलांचे ग्रुप तयार करुन त्यांच्यामार्फत
महिलां विषयक कायद्यांचा प्रसार करावा. जिल्ह्यातील बेपत्ता मुलींबाबत तपास वेगाने
पूर्ण करावा. तसेच अशा घटना टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आदेश त्यांनी
प्रशासनाला दिले. जिल्ह्यातील रिक्त पोलीस पाटलांची पदे भरण्याची कार्यवाही लवकरात
लवकर करावी. तसेच जिल्ह्यात बालस्नेही पोलीस स्टेशन सुरु करवायचे असल्यास त्याचा प्रस्ताव
सादर करण्याच्या सूचना ही यावेळी उपसभापती श्रीमती डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी दिल्या.
मागील काही दिवसात राज्यातील विविध भागात अवकाळी पाऊस झाला असून,
जालना जिल्ह्यात देखील अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाने सर्व नुकसानींचे तात्काळ पंचनामे करुन
शेतकऱ्यांना मदत मिळेल यासाठी प्रयत्न करावे. तसेच पावसाळ्यात वीज पडून अनेक नागरिकांचा
मृत्यू होतो. याकरीता जिल्ह्यात महत्वाच्या ठिकाणांवर वीज नियंत्रक उभारण्याचे निर्देश
श्रीमती डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी दिले.
जालना जिल्ह्यातील पाणी टंचाईचा आढावा घेतांना श्रीमती डॉ. गोऱ्हे
म्हणाल्या की, पिण्याच्या पाण्याची समस्या मोठी असून, नागरिकांची मागणी येताच पिण्याचे
पाणी उपलब्ध होण्यासाठी तात्काळ योग्य नियोजन व उपाय योजना करण्याचे निर्देश ही उपसभापती
श्रीमती डॉ. गोऱ्हे यांनी दिले.
यावेळी बैठकीत जिल्हाधिकारी
डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, प्र. पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी आणि महिला बालविकास अधिकारी
कोमल कोरे यांनी सादरीकरणांद्वारे माहिती सादर केली. बैठकीस सर्व संबंधित विभागांचे अधिकारी आणि इतर मान्यवरांची उपस्थिती होती.
****



No comments:
Post a Comment