Wednesday, 30 July 2025

जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या जालना जिल्हा कार्यालयाचे उदघाटन संपन्न


 जालना दि. 30 (जिमाका) :- जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) तथा राज्य अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य ललित गांधी  यांच्या हस्ते जालना येथील पाठक मंगल कार्यालयाजवळील इमारतीमधील जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाचे बुधवार दि.30 जुलै 2025 रोजी दुपारी 2.50 वाजता उदघाटन केले. यावेळी मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे संचालक शाह आलम खान, जिल्हा व्यवस्थापक एकनाथ कांबळे, घनश्याम गोयल, विष्णू चेचाणी, सुदेश सकलेचा, चेतन देसरडा, संजयकुमार लवांडे, ॲड. निखिल जैन, नरेंद्र जोगड आदिंची उपस्थिती होती.

-*-*-*-*-

जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी घेतला आढावा

  

 जालना दि. 30 (जिमाका) :- जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) तथा राज्य अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य ललित गांधी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी 3 वाजता जिल्हा प्रशासनासोबत बैठक घेऊन जिल्ह्यातील अल्पसंख्याक बहुल ग्रामीण व नागरी क्षेत्रविकास कार्यक्रमासह अल्पसंख्याकांना देण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेतला.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम., अपर पोलिस अधिक्षक आयुष नोपाणी, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल सुर्यवंशी, जिल्हा व्यवस्थापक एकनाथ कांबळे, सा. बां. कार्यकारी अभियंता स्मिता पवार यांच्यासह संबंधित यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.

जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी म्हणाले की, अल्पसंख्याक समुदायाची लोकसंख्या विचारात घेवून जिल्ह्यात एकुण 122 मदरसे व शाळा असून त्यापैकी अल्पसंख्याक जैन समाजाच्या 4 शाळा आहेत त्यांना पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. अल्पसंख्याक समुदायाच्या भागातील रस्ते, गटारी, सभागृहाची राहिलेली अपूर्ण कामे वेळेत पार पाडावी.  जालना शहरातील गुरु गणेश भवनाला ब वर्ग तिर्थक्षेत्र दर्जा मिळण्यासाठीचा प्रस्ताव लवकर पाठविण्यात यावा. तसेच इतर चारही जैन समाजाच्या प्राचिन मंदिरांना क वर्ग तिर्थक्षेत्र दर्जा मिळण्यासाठी देखील तात्काळ प्रस्ताव सादर करावेत. असे निर्देशही त्यांनी दिले. जालना शहरातील सदर बाजार जैन मंदिरासमोरील रस्ता करण्याची प्रक्रिया सुरु करावी तसेच तिथे वाहतुक जास्त परंतू रस्ता रुंदीकरण कमी असल्याने तो मार्ग वन वे करावा. जिल्हा उद्योग केंद्राकडील अल्पसंख्याक समुदायासाठी 3 टक्के राखीव असलेली कर्ज प्रकरणे तातडीने मार्गी लावावी. तसेच व्‍यवसाय कोणत्या पध्दतीने केला पाहिजे यासाठी जिल्हा उद्योग केंद्र आणि बँकांनी शिबीरे घेवून गरजवंतांना कर्ज मंजूर करावेत. अशी  सुचनाही केली. जालना जिल्ह्याला अल्पसंख्याक  समाजाच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी देण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

-*-*-*-*-

आरोग्य सेवक (पुरुष) सरळसेवा भरती प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना आवाहन

  

जालना दि. 30 (जिमाका) :-  जालना जिल्हा परिषद अंतर्गत गट-क मधील आरोग्य सेवक (पुरुष) 40% व 50% या कोट्यातील सरळसेवा भरती प्रक्रियेबाबत प्रतिक्षा यादीवरील उमेदवारांच्या मोठया प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारीच्या अनुषंगाने भरती प्रकियेची पारदर्शक इन कॅमेरा प्रसारमाध्यमांसमोर तक्रारदाराच्या समक्ष सखोल चौकशी करण्यासाठी दि. 1 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11  ते 5  या दरम्यान कै.यशवंतराव चव्हाण सभागृह जि.प.जालना येथे तक्रार निवारण करण्यात येणार आहे. सदरील दिवशी विहित वेळेत तक्रारदारांनी, उमेदवारांनी आवश्यक कागदपत्राच्या पुराव्यानिशी उपस्थित रहावे, असे अवाहन जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम. यांनी केले आहे.

-*-*-*-*-

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या विविध कर्ज योजनेसाठी अर्ज सादर करावेत

 लना दि. 30 (जिमाका) :- जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) तथा राज्य अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य ललित गांधी हे जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

बुधवार दि.30 जुलै 2025 रोजी पहाटे 5 वाजता जालना येथे आगमन व शासकीय विश्रामगृहा कडे रवाना. सकाळी 9 ते 10 वाजेपर्यंत जैन मंदिर स्थानक दर्शनार्थ भेटीसाठी रवाना. सकाळी 11 वाजता तारा फाऊंडेशन आयोजित पुरस्कार वितरण समारोहास हॉटेल विजय विलास येथे उपस्थिती. दुपारी 3 वाजता जिल्हाधिकारी व जिल्हा प्रशासनातील सर्व प्रमुखांच्या समवेत आढावा बैठकीस जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थिती. दुपारी 4.30 वाजता भगवान महावीर निर्वाण कलयाणक निबंध स्पर्धा पुरस्कार वितरण समारंभ व जैन समाज पदाधिकारी संवाद बैठकीस नियोजन भवन सभागृहात उपस्थिती. सायंकाळी 6 वाजता जालना येथून बुलढाणाकडे वाहनाने प्रयाण करतील.

-*-*-*-*-

 

            

Tuesday, 29 July 2025

आणीबाणी काळात कारावास भोगलेल्या व्यक्तींना आवाहन


 

 जालना दि. 29 (जिमाका) :- आणीबाणीच्या काळात कारावास भोगलेली व्यक्ती दि. 2 जानेवारी 2018 पूर्वी हयात नसल्यास त्यांच्या पक्षात हयात जोडीदार पती, पत्नी केवळ अशा व्यक्तीनी अनुज्ञेय असलेले मानधन मिळण्याकरीता दि. 15 सप्टेंबर 2018 रोजीच्या शासन पुरक  पत्रासोबतच्या परिशिष्ट "ब" मधील  शपथपत्र अर्जासोबत जोडून जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथे दि.25 सप्टेंबर 2025 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांनी केले आहे.

            शासन पुरक पत्रासोबतच्या परिशिष्ट "अ" मधील अ.क्र. 12 मध्ये नमूद केल्याप्रमाणे  डी. आय. आर (आणीबाणी) खाली राजनैतिक अथवा सामाजिक कारणासाठी अटक झालेल्या  संबधितांनी  जिल्हा पोलीस अधिक्षक, कारागृह अधिक्षक यांचे प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करावेत.  अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिनांक हा शासन निर्णय निर्गमीत झाल्याच्या दिनांकापासून 90 दिवसापर्यंत राहील. कोणत्याही परिस्थितीत दि.25 सप्टेंबर 2025 नंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. याची आणीबाणीच्या काळात कारावास भोगलेली व्यक्ती दि.2 जानेवारी 2018 पूर्वी हयात नसल्यास त्याच्या पश्चात हयात जोडीदार पती, पत्नी अशा व्यक्तींनी नोंद घ्यावी. असेही कळविले आहे.

-*-*-*-*-

                                                         दि. 29 जुलै, 2025

नागरिकांना आयुष्मान कार्ड, वय वंदना कार्डाची ई-केवायसी करण्याचे आवाहन

  

            जालना दि. 29 (जिमाका) :- जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयात आरोग्यमित्रामार्फत आयुष्मान भारत कार्ड आणि वय वंदना कार्डचा ई-के.वाय.सी करून देण्यात येणार आहे. तसेच आपल्या भागातील आशा सेविका, स्वस्त धान्य दुकानदार, आपले सरकार सेवा केंद्र आणि योजने अंतर्गत अंगिकृत रुग्णालय येथे आरोग्यमित्र यांनी भेटुन सर्व जनतेने आयुष्मान कार्ड आणि वय वंदना कार्ड ई-के.वाय.सी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी, जालना यांनी केले आहे.

आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे दि. 25 जुलै 2025 रोजी जिल्ह्यातील गोल्डन कार्ड पात्र लाभार्थी संख्या 18 लाख 34 हजार इतकी असुन त्यापैकी 6 लाख 34 हजार एवढे कार्ड तयार करण्यात आलेले आहे. उर्वरीत एकुण 11 लाख 96 हजार लाभार्थ्यांचे ई के.वाय.सी करणे बाकी आहे. तसेच वय वर्ष 70 वरील सर्व व्यक्ती हे वय वंदना योजनेचे लाभार्थी आहेत.
जालना जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच सर्व तहसील कार्यालये व सर्व पंचायत समिती कार्यालयात दर बुधवार, गुरुवार आणि शुक्रवारी आरोग्य मित्र उपस्थित राहून आयुष्यमान भारत कार्ड व वय वंदना कार्डची ई-केवायसी करुन देणार आहेत.  

आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही भारत सरकारची प्रमुख योजना असून दि. 23 सप्टेंबर 2018 पासून राज्यात महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसोबत एकत्रितपणे राबविण्यात येत आहे. सदर योजने अतंर्गत लाभार्थी रुग्णांना अंगीकृत रुग्णालयामध्ये रुपये 1 लाख पर्यंतचे मोफत उपचार देण्यात येतात.  तसेच वय वर्ष 70 वरील सर्व व्यक्ती हे वय वंदना कार्डचे लाभार्थी आहेत. वय वंदना योजने अतंर्गत लाभार्थी रुग्णांना अंगीकृत रुग्णालयामध्ये रुपये 5 लाख पर्यंतचा मोफत उपचार देण्यात येतो. असेही कळविले आहे.

-*-*-*-*-

विधी स्वयंसेवकासाठी अर्ज करावेत


 

            जालना दि. 29 (जिमाका) :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जालना व या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या तालुका विधी सेव समिती अंबड, परतूर, भोकरदन, जाफ्राबाद, बदनापूर, मंठा व घनसावंगी येथे विधी स्वयंसेवकांची नेमणूक करावयाची आहे. विधी स्वयंसेवक म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीस कोणताही पगार, वेतन किंवा मोबदला दिला जाणार नाही. तरी व्यक्ती, विद्यार्थी, महिलांनी आपला अर्ज जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जालना व तालुकास्तरावरील तालुका विधी सेवा समिती येथे कार्यालयास प्रत्यक्ष भेट देवून दि.6 ऑगस्ट 2025 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-

लोकशाही दिनाचे आयोजन

 

       जालना दि.29 (जिमाका) : जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार दि. 4 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी (सामान्य) यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

लोकशाही दिनात अर्जदाराने विहित नमुन्यातील अर्ज 15 दिवस अगोदर दोन प्रतीत सादर करणे आवश्यक आहे.  लोकशाही दिनासाठी अर्ज देताना संबंधित तालुक्यातील तिसऱ्या सोमवारी तालुकास्तरीय लोकशाही दिनामध्ये अर्ज दिलेला असावा व तालुकास्तरीय लोकशाही दिनात एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी होऊनदेखील कोणतीही कार्यवाही झालेली नसावी अशाच अर्जदारांनी टोकन क्रमांकाच्या पावतीसह अर्ज दोन प्रतीत सादर करावा. लोकशाही दिनामध्ये न्यायप्रविष्ट प्रकरणे, राजस्वी, अपील, सेवाविषयक, आस्थापनाविषयक बाबी, विहित नमुन्यात नसणारे व आवश्यक ती कागदपत्रे न जोडलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. तसेच तालुकास्तरीय लोकशाही दिनातील टोकन क्रमांकाची तहसिलदार यांच्या स्वाक्षरीची पोहोच पावती व त्यासाठी दिलेल्या मुदतीत व नमुन्यात ज्यांनी यापूर्वीच्या आवश्यक कागदपत्रासह अर्ज केले असतील त्यांना तक्रार मांडता येईल.  ज्यांनी यापूर्वी जिल्हास्तरावरील लोकशाही दिनी तक्रार अर्ज दिलेला आहे परंतु अद्याप कार्यवाही झालेली नाही, अशा तक्रारदारांनी पुन्हा अर्ज करु नयेत.  तसेच लोकशाही दिनात द्यावयाच्या अर्जाचा विहित नमुना http://jalna.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

-*-*-*-*-

जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांचा जालना जिल्हा दौरा

 

 

            जालना दि. 29 (जिमाका) :- जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) तथा राज्य अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य ललित गांधी हे जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

बुधवार दि.30 जुलै 2025 रोजी पहाटे 5 वाजता जालना येथे आगमन व शासकीय विश्रामगृहा कडे रवाना. सकाळी 9 ते 10 वाजेपर्यंत जैन मंदिर स्थानक दर्शनार्थ भेटीसाठी रवाना. सकाळी 11 वाजता तारा फाऊंडेशन आयोजित पुरस्कार वितरण समारोहास हॉटेल विजय विलास येथे उपस्थिती. दुपारी 3 वाजता जिल्हाधिकारी व जिल्हा प्रशासनातील सर्व प्रमुखांच्या समवेत आढावा बैठकीस जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थिती. दुपारी 4.30 वाजता भगवान महावीर निर्वाण कलयाणक निबंध स्पर्धा पुरस्कार वितरण समारंभ व जैन समाज पदाधिकारी संवाद बैठकीस नियोजन भवन सभागृहात उपस्थिती. सायंकाळी 6 वाजता जालना येथून बुलढाणाकडे वाहनाने प्रयाण करतील.

-*-*-*-

जालना शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सोलार टेक्निशियन व्यवसाय तुकडीस मान्यता

 

 

            जालना दि. 29 (जिमाका) :- केंद्र शासनाने हुतात्मा जनार्दन मामा नागपूरकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जालना येथे सोलार टेक्निशियन (इलेक्ट्रीकल) या व्यवसायाच्या एका तुकडीस मान्यता दिली आहे.  सध्या आयटीआयची प्रवेश प्रक्रिया चालु असून जिल्ह्यातील युवकांना चालु शैक्षणिक वर्षातच प्रचंड मागणी असणाऱ्या व मोठ्या प्रमाणावर नौकरीची चांगली संधी असणाऱ्या या न्यु एज कोर्सला प्रवेश घेणे शक्य होणार आहे. तरी या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी युवक, पालकांनी संपर्क साधावा. असे आवाहन प्राचार्य, हुतात्मा जनार्दन मामा नागपूरकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

 जालना, दि. 29 (जिमाका) :- जिल्ह्यात आगामी कालावधीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन आदी सण, उत्सव तसेच शहरातील मिरवणुका व विविध कार्यक्रम आणि आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था, सार्वजनिक शांतता व सुरक्षितता राखण्यासाठी मुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1) (3) अन्वये जालना जिल्ह्याच्या संपूर्ण हद्दीत दि. 30 जुलै  ते 12 ऑगस्ट 2025 पर्यंत शस्त्रबंदी व  जमावबंदी  करण्यात आली आहे, असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी  गणेश महाडिक यांनी जारी केले आहेत.   

           संपूर्ण जालना जिल्ह्याच्या हद्दीत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश  दि. 30 जुलै 2025 रोजीच्या 24 वाजेपर्यंत लागू राहील. या आदेशान्वये शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या, लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल, अशी कोणतीही वस्तू सोबत बाळगता येणार नाही. व्यक्तीचे प्रेते, आकृत्या व प्रतिमा यांचे प्रदर्शन करता येणार नाही. जाहीरपणे घोषणा, गाणे म्हणणे, वाद्य वाजविणे यास प्रतिबंध राहील. तसेच कोणत्याही रस्त्यांवर किंवा कोणत्याही एका ठिकाणी पाच किंवा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास किंवा मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आली आहे. हा आदेश अधिकारी- कर्मचाऱ्यांना तसेच उपविभागातील पोलिस अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणूका, सभा, मोर्चा यांना लागू राहणार नाही, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.


Monday, 28 July 2025

अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांनी परदेशी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करावेत

 


 

 जालना दि. 28 (जिमाका) :-    वर्ष 2025-26 मध्ये राज्यातील अल्पसंख्यांक समुदायातील विदयार्थ्यांसाठी परदेशात पदव्युत्तर पदवी व पीएचडी अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांकडुन अर्ज मागविण्यासाठी शासनाच्या अल्पसंख्यांक विभागाने मंजुरी दिली आहे. या योजनेअंतर्गत 2025-26 या वर्षासाठी जागा भरणेसाठी विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्षरित्या व ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. याबाबत महाराष्ट्र शासनाच्या  www.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर प्रसिध्दी करण्यात आली आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि. 1 ऑगस्ट 2025 अशी असुन सदरील योजनेचे अर्ज आयुक्त, समाज कल्याण, महाराष्ट्र राज्य, 03 चर्च पथ, पुणे-01 या कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन  जालना समाज कल्याणचे  सहायक आयुक्त राजु एडके यांनी केले प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-

जागतिक काविळ दिनानिमित्त रॅली उत्साहात साजरी

 


 

 

            जालना दि. 28 (जिमाका) :-     जागतिक काविळ दिनानिमित्त आरोग्य विभाग जालनाच्या वतीने सोमवार दि. 28 जुलै 2025 रोजी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.जयश्री भुसारे यांच्या मार्गदर्शनाखाली जालना शहरातील नूतन वसाहत येथून रॅलीला सुरुवात करुन जिल्हा रुग्णालय जालना येथे समारोप करण्यात आला. यावेळी काविळ आजाराबद्दल जनजागृतीसाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते, या रॅलीमध्ये परिचर्या प्रशिक्षण केंद्राचे सर्व विद्यार्थी तसेच ऑक्सफर्ड हायस्कूलचे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

 याप्रसंगी जालना रोटरी क्लब ऑफ सेंट्रल व सनराईज शुद्ध शाकाहारी रेस्टॉरंट जालना यांच्या सौजन्याने रॅली काढण्यात आली होती. याप्रसंगी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजेंद्र गाडेकर , सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गजानन मस्के, निवासी बाह्य संपर्क अधिकारी डॉ. शितल सोनी ,काविळ नियंत्रण कार्यक्रम प्रमुख डॉ.प्रशांत बादल, रक्त संक्रमण अधिकारी डॉ. राजेंद्र शेजुळे, सनराईज रेस्टॉरंटचे मोहन इंगळे, रोटरी क्लब सेंट्रलचे डॉ. आशुतोष सोनी,  सचिव सचिन लोहिया, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी दादाराव बोराडे, आर बी एस के समन्वयक विद्या मस्के, औषध निर्माण अधिकारी मनिष जाधव प्रयोगशाळा तंत्रज्ञ संदीप लुखे, संतोष इंगळे , सोनाजी भुतेकर, अमोल पेरकर, विजय पवार, प्रदीप वाघ, जिल्हा एड्स नियंत्रण विभागाचे सर्व कर्मचारी परिचर्या केंद्राचे सर्व अधिकारी / कर्मचारी तसेच जिल्हा रुग्णालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचा सहभाग होता.

-*-*-*-*-

 

 

Tuesday, 22 July 2025

पत्रकारांनी बदलत्या तंत्रज्ञानाचा उपयोग करणे आवश्यक - जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ · जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते पत्रकार कार्यशाळेचे उद्घाटन

 









जालना, दि.22(जिमाका) : आजच्या स्पर्धेच्या युगात पत्रकारांनी बदलत्या तंत्रज्ञानाचा आपल्या दैनंदिन कामकाजात उपयोग करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील महसुल सभागृहात आज जिल्हास्तरीय पत्रकार कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ हे बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणुन  जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिन्नू पी.एम. पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर जिल्हाधिकारी रिता मेत्रेवार  तर प्रमुख मार्गदर्शक जालना येथील शासकिय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे संगणक विभागाचे वरिष्ठ श्रेणी प्राध्यापक प्रा. संदिप काळे, जिल्हाधिकारी कार्यालयातील (संगायो) विभागाच्या तहसिलदार श्रीमती प्रणाली तायडे आणि जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी  यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ म्हणाले की, आज प्रत्येक क्षेत्रात एआयचा मोठ्या प्रमणात वापर होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे पत्रकारांनी देखील नवीन येणारे तंत्रज्ञान आत्मसात करणे ही आज काळाची गरज बनली आहे. प्रत्येकाला आज बातमी लवकरात-लवकर हवी असते. परंतू कोणतीही बातमी प्रसिध्द करण्यापुर्वी पत्रकारांना त्याची सत्यता देखील पडताळून पाहणे आवश्यक आहे. आज मोबाईल आणि एआयच्या युगामध्ये प्रत्येकाकडे बातमी असून, प्रत्येक व्यक्ती हा बातमीचा कन्टेंट तयार करु शकतो. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात पत्रकारांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) वापर करणे आवश्यक आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) पत्रकारितेवर अनेक प्रमुख मार्गांनी परिणाम करत आहे. त्यामुळे एआयचा वापर कशा प्रकारे करावा हे पत्रकारांनी समजावून घेणे आवश्यक आहे.

तसेच आजच्या बदलत्या जीवनशैलीमध्ये आपणा सर्वांना विविध ताण-तणावांना सामोरे जावे लागत आहे. याकरीता आज आपणास जिल्हा माहिती कार्यालयाने आयोजित केलेल्या कार्यशाळेच्या माध्यमातून दोन महत्वाच्या विषयावर तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून मार्गदर्शन मिळणार असुन, या प्रशिक्षणाचा आपणास नक्कीच आपल्या दैनंदिन जीवनात उपयोग होणार असल्याचे ही डॉ. पांचाळ यावेळी म्हणाले.

पोलीस अधिक्षक श्री. बन्सल मार्गदर्शन करतांना म्हणाले की, एआयचा वापर चांगल्यारितीने केल्यास त्यांना त्यांच्या दैनंदिन कामकाजात निश्चितच फायदा होणार आहे. सध्या पत्रकारितेमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर हा पैसा आणि वेळ वाचविण्यासाठी होत असून, वेग आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी देखील त्याचा उपयोग केला जात आहे. नियमित रिपोर्टिंग स्वयंचलित करून, येणाऱ्या समस्या जलद गतीने कमी करून कृत्रिम बुद्धिमत्ता सद्याच्या पत्रकारितेवर परिणाम करत आहे. परंतु एआयचा वापर करतांना पत्रकारांनी बातमीची खात्री करुन घेणे देखील आवश्यक आहे .

 

कार्यशाळेत प्रा. संदीप काळे आणि श्रीमती प्रणाली तायडे यांचे बहुमुल्य मार्गदर्शन

 

माहिती आणि महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने आयोजीत पत्रकार कार्यशाळेत तज्ज्ञ मार्गदर्शक जालना येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे संगणक विभागाचे वरिष्ठ श्रेणी प्राध्यापक प्रा. संदीप काळे यांनी पत्रकारांना कृत्रिम बुद्धिमत्ता आणि पत्रकारीता, सायबर सुरक्षा या विषयावर मार्गदर्शन केले. तर तहसिलदार (संगायो) श्रीमती प्रणाली तायडे यांनी ताणतणाव व्यवस्थापन या विषयावर पत्रकारांना बहुमुल्य मार्गदर्शन केले.

प्रा. काळे यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा पत्रकारीतेमध्ये कशा पध्दतीने वापर करावा. तसेच सायबर सुरक्षा, डिपफेक, व्हिडिओ एडिटींग करणे, व्हिडिओ-ऑडीओ मजकूर रुपांतरीत करणे, भाषांतर, सादरीकरण तयार करणे, विविध अहवाल तयार करणे, ग्राफिक्स डिझाईन, विविध भाषेचा योग्य वापर आणि सायबर सुरक्षा आदी बाबत यावेळी मार्गदर्शन केले.

तसेच तहसिलदार प्रणाली तायडे ताणतणाव व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करतांना म्हणाल्या की, आजच्या बदलत्या जीवनशैलीमध्ये आपणास विविध ताण-तणावांना सामोरे जावे लागते. बदलते कामाचे स्वरूप, बदलती कुटूंब रचना, समाजामध्ये वावरण्याचे बदलेले नियम आणि सोशल मिडिया या सर्वांचा परिणाम आपल्या शारीरिक तसेच मानसिक आरोग्यावर होत आहेत. या वाढत्या ताण-तणावावर आपण नियंत्रण आणणे आवश्यक आहे. त्यासाठी ताण-तणावांचे योग्य व्यवस्थापन करुन आपल्या जीवनशैलीत योग्य बदल घडविल्यास आयुष्य आनंदाने जगता येते.

जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी यांनी यावेळी माहिती जनसंपर्क महासंचालनालय विभागामार्फत पत्रकारांसाठी राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. यामध्ये अधिस्वीकृती नियमावली, आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना आणि शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी या योजनेचे पात्रता, निकष आणि आवश्यक कागदपत्रे याविषयी माहिती दिली.

कार्यशाळेचे प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी यांनी केले. तर मिलींद तुपसमिंद्रे यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. तसेच उपस्थितांचे आभार मानले. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयातील विष्णु जायभाये, संतोष पाखरे, श्रीमती प्रतिभा इंगळे, ज्ञानोबा पांचाळ यांनी सहकार्य केले. यावेळी कार्यशाळेस जिल्ह्यातील सर्व पत्रकार, वृत्तपत्र प्रतिनिधी, संपादक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

-*-*-*-*-*-*-

 


रुग्णांना उच्च दर्जाची आरोग्य सेवा देण्यासाठी प्रयत्नशिल -सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे -बोर्डीकर

 








 

           जालना दि.22 (जिमाका):-  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. मोतीबिंदू आजारावर मात करण्यासाठी या अभियानाचा प्रचार, प्रसार झाला पाहिजे. त्यासाठी सर्व आरोग्य विभाग तत्पर राहील. रुग्णांना उच्चतम दर्जाची आरोग्य सुविधा देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे -बोर्डीकर यांनी  केले.

        मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र अभियानाअंतर्गत मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवार दि.22 जुलै 2025 रोजी करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. याप्रसंगी आमदार अर्जुन खोतकर, आमदार नारायण कुचे, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ,  जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम., पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, आरोग्य उपसंचालक डॉ. कांचन कानोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी जयश्री भुसारे, जिल्हा शल्य चिकित्सक राजेंद्र पाटील आदि उपस्थित होते.

        राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर म्हणाल्या की, जिल्हा सामान्य रुग्णालयात मोतीबिंदू कक्षाचे उद्घाटन माझ्या हस्ते करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त दि.22 जुलै ते 22 ऑगस्ट दरम्यान राज्यभरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर राबविण्यात येणार आहे.

जिल्ह्यात मनोरुग्णालयाचे काम प्रगतीपथावर असून ते लवकरच कार्यान्वित होईल.प्रत्येक रुग्णाला उच्चतम सुविधा देण्यासाठी आरोग्य विभाग तत्पर राहील. असेही त्यांनी सांगितले.या कार्यक्रमास आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

****

          

 

Wednesday, 16 July 2025

21 जुलै रोजी पेंशन अदालत

 


            जालना दि. 16 (जिमाका) :-   छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयातील आस्थापना उपायुक्त यांनी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या तक्रारी निकाली काढण्याबाबत निर्देश दिले आहेत.  त्यानूसार पेंशन अदालत दि.21 जुलै 2025 रोजी सकाळी 11 वाजता जालना जिल्हा परिषदेतील उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य यांच्या दालनात आयोजित करण्यात आली आहे.

आपली प्रकरणे पेंशन अदालतीमध्ये ठेवण्यासाठी सेवानिवृत्तांनी प्रलंबित प्रश्न, अर्ज, पोस्टाने, ई-मेल किंवा हस्तपोच जिल्हा परिषदेतील सामान्य प्रशासन विभागात दि.18 जुलै 2025 पर्यंत सादर करावेत. तरी पेंशन अदालतीसाठी सेवानिवृत्तांनी, कुटुंबनिवृत्ती वेतन धारकांनी प्रकरणाच्या माहितीसह उपस्थित रहावे, असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

 


 

जालना, दि. 16 (जिमाका) :- जिल्ह्यात आगामी कालावधीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मृतिदिन, श्री संत गजानन महाराज पायी दिंडी, श्रावण मासारंभ आणि नागपंचमी आदी सण, उत्सव तसेच शहरातील मिरवणुका व विविध कार्यक्रम आणि आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था, सार्वजनिक शांतता व सुरक्षितता राखण्यासाठी मुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1) (3) अन्वये जालना जिल्ह्याच्या संपूर्ण हद्दीत दि. 29 जुलै 2025 पर्यंत शस्त्रबंदी व  जमावबंदी  करण्यात आली आहे, असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी  गणेश महाडिक यांनी जारी केले आहेत.   

           संपूर्ण जालना जिल्ह्याच्या हद्दीत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश  दि. 29 जुलै 2025 रोजीच्या 24 वाजेपर्यंत लागू राहील. या आदेशान्वये शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या, लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल, अशी कोणतीही वस्तू सोबत बाळगता येणार नाही. व्यक्तीचे प्रेते, आकृत्या व प्रतिमा यांचे प्रदर्शन करता येणार नाही. जाहीरपणे घोषणा, गाणे म्हणणे, वाद्य वाजविणे यास प्रतिबंध राहील. तसेच कोणत्याही रस्त्यांवर किंवा कोणत्याही एका ठिकाणी पाच किंवा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास किंवा मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आली आहे. हा आदेश अधिकारी- कर्मचाऱ्यांना तसेच उपविभागातील पोलिस अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणूका, सभा, मोर्चा यांना लागू राहणार नाही, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

विशेष बाल पोलीस पथकांचे बाल अधिकार विषयावर एक दिवसीय प्रशिक्षण संपन्न

 


 

          जालना दि. 16 (जिमाका) :- बाल न्याय मुलांची काळजी आणि संरक्षण अधिनियम 2015 च्या प्रस्तावनेत नमुद केल्यानुसार बालकांसोबत काम करणाऱ्या सर्वच यंत्रणा बालस्नेही असणे गरजेचे आहे. या बाबीची अंमलबजावणी होण्यासाठी काळजी व संरक्षणाची गरज असणारी बालके व विधी संघर्षग्रस्त बालके यांच्या सामाजिक पुर्नएकात्मिकीकरण करण्याची प्रक्रिया बाल स्नेही वातावरणात व्हावी, या उद्देशपूर्तीकरीता पोलीस अधिकारी- कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल यांनी केले.

          जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय आणि होप फॉर दी चिल्ड्रेन फाऊंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दि.15 जुलै 2025 रोजी विशेष बाल पोलीस पथक, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड हेल्पलाईन 1098, बाल कल्याण समिती, बाल न्याय मंडळ आदि सर्व यंत्रणांचे एक दिवसीय प्रशिक्षण पोलिस अधिक्षक कार्यालयात घेण्यात आले. प्रशिक्षणासाठी पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधिक्षक आयुष नोपाणी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कोमल कोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

            प्रशिक्षणात बाल न्याय अधिनियम 2015 नुसार विधी संघर्षग्रस्त बालके व काळजी व संरक्षणाची गरज असणारी बालके यांच्या सोबत अनुसरावयाची कार्यपध्दती तसेच लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण 2012 या कायद्याबाबत प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणासाठी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणेमधील विशेष बाल पोलीस पथकातील अधिकारी-कर्मचारी, बाल न्याय मंडळाचे सदस्य, बाल कल्याण समिती सदस्य, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड हेल्पलाईन 1098 कक्षातील  अधिकारी व  कर्मचारी उपस्थित होते.

          प्रशिक्षण होप फॉर दि चिल्ड्रेन फाऊंडेशनचे व्यवस्थापक ॲङ परम आनंद,  वसीम शेख, सहाय्यक व्यवस्थापक सचिन करंजुले यांनी दिले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी गजानन इंगळे  यांनी केले. असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-