Monday, 4 May 2026

अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा, बदनापूर येथे प्रवेशासाठी 20 जुन 2026 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 


 

        जालना, दि.4 (जिमाका):-  महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांर्तत सहायक आयुक्त, समाजकल्याण यांच्या अधिनस्त अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा, बदनापूर येथील इच्छुक व पात्र लाभार्थ्यांना प्रवर्ग एसी 80 टक्के, प्रवर्ग एसटी 10 टक्के, प्रवर्ग विजेएनटी 5 टक्के, प्रवर्ग एसबीसी 2 टक्के, पीएच 3 टक्के याप्रमाणे रिक्त जागा आरक्षित आहेत. 

वरीलप्रमाणे इयत्ता 6 वी साठी 40 जागा व इयत्ता 7 वी ते  10 वी वर्गामध्ये रिकत असलेल्या संवर्गानुसार रिक्त जागेसाठी प्रवेश पात्र व 6 वी ते 10 वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग व दिव्यांग प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी  दि. 20 जून 2026 पर्यंत प्रवेश अर्ज भरुन द्यावेत त्यानंतर आलेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. जालना जिल्ह्यातील वरील प्रवर्गातील इच्छुक व पात्र लाभार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरण्याचे आवाहज सहायक आयुक्त राजु एडके तसेच मुख्याध्यापक डॉ. दिलीप गिरी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-

जालना ‘सुपर 50 एआय फार्मर्स’ प्रकल्पाचा शुभारंभ; ऊस शेतीत तंत्रज्ञानाची नवी क्रांती

 



जालना दि.4 (जिमाका): जालना जिल्ह्यात ऊस शेतीत तंत्रज्ञानाची नवी क्रांती घडवून आणण्याच्या दिशेने ‘सुपर 50 एआय फार्मर्स’ या अभिनव पायलट प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, महाराष्ट्र कृषी विभाग आणि फाईंडेबिलिटी सायन्सेस (Findability Sciences) यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत असून, आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शेती अधिक सक्षम करण्याचा यामागचा उद्देश आहे.

जालना जिल्ह्याच्या 45 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ‘रायझिंग जालना’ या विशेष सोहळ्यात या प्रकल्पाच्या सामंजस्य कराराची (MoU) घोषणा करण्यात आली. या कार्यक्रमाला पालकमंत्री पंकजा मुंडे, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, निवडलेले शेतकरी, कृषी विभागाचे अधिकारी तसेच फाईंडेबिलिटी सायन्सेसची टीम उपस्थित होती.

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाअंतर्गत जिल्ह्यातील 50 प्रगतिशील शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या शेतांची सॅटेलाइटच्या माध्यमातून सतत पाहणी केली जाणार असून, गोळा झालेल्या डेटाचे एआय तंत्रज्ञानाद्वारे विश्लेषण केले जाणार आहे. या विश्लेषणाच्या आधारे शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईल अॅपवर अचूक, वेळेवर आणि शेतानुरूप सूचना मिळणार आहेत.

या अॅपमध्ये पीक आरोग्य स्कोअर, शेतातील विविध भागांतील वाढीचा अभ्यास, पाणी व खत व्यवस्थापनासाठी शिफारसी, तण ओळख आणि कापणी नियोजन यांसारखी महत्त्वपूर्ण माहिती उपलब्ध होणार आहे. विशेष बाब म्हणजे, या संपूर्ण प्रक्रियेसाठी कोणत्याही प्रकारच्या अतिरिक्त सेन्सर्स किंवा उपकरणांची गरज भासणार नाही, ज्यामुळे खर्चात बचत होऊन अधिकाधिक शेतकरी या तंत्रज्ञानाचा लाभ घेऊ शकतील.

‘सुपर 50 एआय फार्मर्स’ प्रकल्पामुळे जालना जिल्ह्यातील ऊस शेती अधिक कार्यक्षम, उत्पादक आणि तंत्रज्ञानाधिष्ठित बनण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. भविष्यात हा पायलट प्रकल्प यशस्वी ठरल्यास, राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही अशा प्रकारच्या उपक्रमांचा विस्तार होण्याची शक्यता आहे.

 

Friday, 1 May 2026

जालना जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची आवश्यकता-पालकमंत्री पंकजा मुंडे • ‘रायझिंग जालना 2026’ला नागरिकांचा उस्फूर्त प्रसिसाद

 





जालना दि.1 (जिमाका) : जालना जिल्ह्याचा इतिहास समृध्द असुन, विकसनशील जिल्हा म्हणुन आपल्या जिल्ह्याची ओळख आहे. स्टिल-सिल्क-सिड्स या क्षेत्रातील विकासामुळे जालना जिल्ह्याचे नाव जगभर प्रसिध्द आहे. आशाचप्रकारे आपल्या जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी सर्वांनी एकत्रिक काम करण्याची आवश्यकता असल्याचे  प्रतिपादन राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे यांनी केले.

येथील अग्रेसन भवन येथे जालना जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित ‘रायझिंग जालना 2026’ कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी श्रीमती मुंडे या बोलत होत्या. यावेळी  महापौर श्रीमती वंदना मगरे, खासदार डॉ. कल्याण काळे,  आमदार राजेश राठोड, अर्जून खोतकर, उपमहापौर राजेश राऊत, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णकांत कंवरिया, मनपा आयुक्त अंजली शर्मा, अपर पोलिस अधिक्षक आयुष नोपाणी, अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ, यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी पालकमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, आज ‘रायझिंग जालना 2026’ या उपक्रमाच्या निमित्ताने आपण सर्व एकत्रीत आलो आहोत, ही अत्यंत अभिमानाची आणि प्रेरणादायी गोष्ट आहे. जालना जिल्हा हा केवळ मराठवाड्याचा नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राचा औद्योगिक, कृषी आणि सांस्कृतिक विकासाचा महत्त्वाचा केंद्रबिंदू बनत आहे. यासाठी आपण सर्वांनी केलेल्या प्रयत्नामुळेच हा विकास झालेला आहे. माझ्यासाठी, पालकमंत्री म्हणून, हा केवळ एक प्रकल्प नाही. तर जालन्याच्या उज्ज्वल भविष्यासाठीचा एक ठोस संकल्प आहे. आज आपण ‘रायझिंग जालना 2026’ द्वारे उद्योग, शेती, शिक्षण आणि पायाभूत सुविधांमध्ये मोठी झेप घेण्याचा निर्धार करण्यात आला आहे. स्वत:ची ओळख विसरुन जो काम करतो, तोच विकासाची कामे करु शकतो. कोणत्याही विकासाचा जन्म हा, अस्तित्वात नसलेल्या गोष्टीपासुनच होत असतो.  

आपल्या जिल्ह्याची ओळख ही स्टील उद्योग, बियाणे उद्योग आणि प्रगतिशील शेतीमुळे आहे. आता वेळ आली आहे की, आपण या ओळखीला नव्या उंचीवर घेऊन जाऊया. नवीन गुंतवणूक आकर्षित करून, तरुणांसाठी रोजगारनिर्मिती करून आणि तंत्रज्ञानाचा वापर करून विकासाला गती देऊ. राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून आपण जालना जिल्ह्यात रस्ते, पाणीपुरवठा, औद्योगिक वसाहती आणि डिजिटल सुविधा यामध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा करत आहोत. ‘Ease of Doing Business’ साठी जालना हा एक आदर्श जिल्हा बनवण्यासाठी आपण एकत्रित येऊन काम करुया, असेही पालकमंत्री श्रीमती मुंडे यावेळी म्हणाल्या.

यावेळी आमदार श्री. खोतकर म्हणाले की, कोणत्याही जिल्ह्याचा विकास हे शासन आणि प्रशासन यांच्या समन्वयानेच होत असतो. आपला जालना जिल्हा विविध क्षेत्रात भरारी घेत असुन, ड्रायपोर्ट, लॉजीस्टीक, रेल्वेचे दुहेरीकरण, रेल्वेचे विद्युतीकरण, वैद्यकीय महाविद्यालय आदी विकास कामाच्या माध्यमातून बदलताना आपणांस दिसत आहे. आपण शहरासाठी पाणीपुरवठा योजना, सौर प्रकल्प, कुंड निर्मिती आदी विकास कामे केलीत. जालना करीता 120 कोटी रुपयाचे विपश्यना केंद्र मंजूर करुन घेतल्याचेही त्यांनी सांगितले.  

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल प्रास्ताविकात म्हणाल्या की, जालना जिल्ह्याच्या स्थापनेला 45 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जिल्हा प्रशासनाच्या वतीने ‘रायझिंग जालना’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रगती, नवोन्मेष, एकता आणि समृद्धीच्या दिशेने वाटचाल दर्शविणारा हा कार्यक्रम जिल्ह्याच्या विकासाचा आढावा घेणारा आणि भविष्यातील दिशा ठरविणारा ठरणार असल्याचे सांगितले. तसेच जालना जिल्ह्याच्या 45 वर्षांच्या वाटचालीतील उल्लेखनीय कामगिरी, विविध विकास प्रकल्प, तसेच आगामी योजनांचे सादरीकरणाद्वारे त्यांनी माहिती सादर केली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी परतुर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांना श्रध्दाजंली अर्पण करण्यात आली. 

मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी विविध स्टॉलला भेटी देवून माहिती जाणुन घेतली. तसेच पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते ‘रायझिंग जालना’ लोगो, ‘ताईचा कट्टा’, ‘माझे गाव आरोग्य संपन्न गाव’ आणि ‘जालना सुपर 50 शेतकरी’ या उपक्रामाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच तिरंदाज तेजल साळवे, प्रतिष्ठित उद्योजक सुनिल रायठ्ठा, रोटरी क्ल्बचे सदस्य, यांचा सत्कार करण्यात आला. तसेच शालेय विद्यार्थ्यांना सिड्स बॉल  वितरीत करण्यात आले. यावेळी कार्यक्रमास जिल्ह्यातील नागरिकांची, विविध विभागातील अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती.


दिव्यांग पुनर्वसन केंद्राद्वारे दिव्यांगांना सुविधा मिळण्यास मदत होणार–पालकमंत्री पंकजा मुंडे • जालना येथे दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे उद्घाटन

 




जालना दि.1 (जिमाका): जालना जिल्ह्यातील दिव्यांगांसाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ, मार्गदर्शन आणि पुनर्वसनासाठीची सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी याकरीता दिव्यांग पुनर्वसन केंद्र उभारण्यात आले असुन, या केंद्राद्वारे जिल्ह्यातील दिव्यांगाना विविध सुविधा मिळण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादन राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसवंर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे यांनी केले.

जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या परिसरात उभारण्यात आलेल्या दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या उद्घाटनाप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी आमदार अर्जुन खोतकर, जिल्हाधिकारी अशिमा मित्तल, महापौर वंदना मगरे, मनपा आयुक्त अंजली शर्मा, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री श्रीमती मुंडे पुढे म्हणाल्या की, दिव्यांग पुनर्वसन केंद्रांमुळे दिव्यांग व्यक्तींना अनेक महत्त्वाच्या सुविधा मिळण्यास मोठी मदत होणर आहे. अशा केंद्रांचा मुख्य उद्देश म्हणजे दिव्यांगांना स्वावलंबी बनवणे आणि त्यांचे जीवनमान सुधारणे आहे. या केंद्रामुळे जिल्ह्यातील दिव्यांगांना मोठा आधार मिळणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून त्यांना योग्य मार्गदर्शन, कागदपत्रांची पूर्तता, वैद्यकीय मदत आणि पुनर्वसनाच्या सुविधा देखील उपलब्ध होणार आहे. जालना येथील हे केंद्र महाराष्ट्रात अग्रस्थानी पोहोचावे यासाठी शासनस्तरावर आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

यावेळी कार्यक्रमास नागरिक, दिव्यांग बांधव, दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी, विविध विभागातील अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती.


पालकमंत्री यांच्या हस्ते मोतीबाग चौपाटी सुशोभीकरणाच्या कामाचे लोकार्पण

 




जालना दि.1 (जिमाका): राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसवंर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे यांच्या हस्ते जालना शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या नवीन चौपाटीचे सुशोभीकरणाच्या कामाचे लोकार्पण करण्यात आले. याठिकाणी नागरिकांसाठी विविध खाद्य पदार्थांचे स्टॉल्स आणि बैठकीची उत्तम सुविधा  उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

यावेळी महापौर श्रीमती वंदना मगरे, खासदार डॉ. कल्याण काळे, आमदार अर्जुन खोतकर, उपमहापौर राजेश राऊत, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णकांत कंवरिया, मनपा आयुक्त अंजली शर्मा, अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

Thursday, 30 April 2026

विकासाच्या प्रक्रियेत महाराष्ट्र राज्य देशात अग्रेसर - पालकमंत्री पंकजा मुंडे · महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिन उत्साहात संपन्न

 










जालना दि.1 (जिमाका): महाराष्ट्राने स्थापने पासूनच सर्वच क्षेत्रामध्ये विकासाच्या प्रक्रियेत मोठी भरारी घेऊन विविध क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. त्यामुळेच आपले महाराष्ट्र राज्य देशातील अग्रेसर राज्य म्हणून ओळखले जाते, असे प्रतिपादन राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे यांनी केले.

महाराष्ट्र दिनाच्या 67 वा स्थापना दिनानिमित्त जालना येथील पोलीस मुख्यालय मैदानावर श्रीमती मुंडे यांच्या हस्ते आज मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी महापौर श्रीमती वंदना मगरे, खासदार डॉ. कल्याण काळे,  आमदार अर्जुन खोतकर, उपमहापौर राजेश राऊत, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णकांत कंवरिया, मनपा आयुक्त अंजली शर्मा, अपर पोलिस अधिक्षक आयुष नोपाणी, अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

पालकमंत्री श्रीमती मुंडे म्हणाल्या की, राज्य शासन विविध कल्‍याणकारी योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे जीवन सुखकर करण्याचा प्रयत्न करत असून, विकासाच्या प्रक्रियेत राज्य शासन शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या पाठिशी सदैव उभे आहे. तसेच सर्वच क्षेत्रात विकासाचा दृष्टीकोन ठेवत, राज्य शासनाची वाटचाल सुरु आहे.

जगातील सर्वात मोठी भारताची 2027 ची जनगणना ही देशाची 16 वी जनगणना पहिल्यांदाच 'डिजिटल’ पध्दतीने राबविण्यात येत आहे. ही जनगणना दोन टप्प्यांत पार पडणार आहे. ही जनगणना अधिक सुलभ, अचूक आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने नागरिकांना स्वगणना (Self Enumeration) करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. या प्रक्रियेमुळे नागरिकांना स्वतःची माहिती स्वतः नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली सर्व नागरिकांनी आपली स्वतःची अचूक माहिती स्वतः नोंदविण्याचे त्यांनी यावेळी आवाहन केले.  

तसेच भारतीय निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिमेचा उल्लेख करत पालकमंत्री श्रीमती मुंडे यांनी नागरिकांना आपल्या मतदार यादीतील माहिती तपासून घेण्याचे आवाहन केले. तसेच ‘मिशन कर्मयोगी’ अंतर्गत राबविण्यात आलेल्या ‘साधना सप्ताह 2026’मध्ये राज्याने देशात प्रथम क्रमांक मिळवून नवा मानदंड आखल्याचे त्यांनी सांगितले.

पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या ‘माझी वसुंधरा 6.0’ मोहिमेचा आढावा देत पालकमंत्री यांनी 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीत जिल्ह्यातील 28 हजारांहून अधिक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये या उपक्रमाची अंमलबजावणी झाल्याचे सांगितले. तसेच पशुसंवर्धन विभागाच्या ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजने’ अंतर्गत ग्रामीण नागरिकांना रोजगार बळकट करून महाराष्ट्राचा ‘आर्थिक कणा’ बनविण्याचा ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले. दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन आणि शेळी-मेंढी पालनासाठी तांत्रिक व आर्थिक मदत देऊन ग्रामीण कुटुंबांचे उत्पन्न वाढवण्याचा हा उपक्रम असल्याचे पालकमंत्री यांनी नमूद केले.

विविध योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे जालना जिल्हा देखील अग्रेसर राहिला आहे. जालना जिल्ह्यासाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण अंतर्गत प्राप्त निधी विविध विकास कामांसाठी शंभर टक्के खर्च झाल्याने पालकमंत्री यांनी जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन केले. जालना ड्रायपोर्ट, जालना-नांदेड समृध्दी महामार्ग आणि जालना–जळगाव रेल्वे मार्ग यासारख्या पायाभूत प्रकल्पांचे काम चांगल्या गतीने सुरू असून, त्यामुळे जिल्हय़ातील उद्योग व अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’ राबविण्यात येत असुन, या अंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यात 47 शिबीरे आयोजन करुन, सुमारे 44 हजाराहून अधिक लाभार्थ्यांना विविध लाभ देण्यात आले. तसेच जलसंपदा विभागाच्यावतीने 15 ते 30 एप्रिल या कालावधीत ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जल व्यवस्थापन कृती पंधरवडा-2026’ ही मोहिम जिल्ह्यात यशस्वीरित्या पार पडली. तसेच कृषी विभागामार्फत महा-डिबीट या पोर्टलद्वारे जिल्ह्यातील 18 हजाराहून अधिक शेतकऱ्यांना  82 कोटी रुपयांचे अनुदान वितरीत करण्यात आले. तसेच प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजने अंतर्गत 153 लाभार्थ्यांना सुमारे 10 कोटी रुपयांचे कर्ज तसेच 4 कोटी रुपयांचे अनुदान वितरीत करण्यात आले आहे. तसेच स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी सानुग्रह योजने अंतर्गत 2025-26 मध्ये अपघातात मृत्यू झालेल्या, तसेच अपंगत्व आलेल्या एकुण 127 शेतकऱ्यांच्या वारसदारांना 2.53 कोटी रुपये सानुग्रह अनुदान मंजूर झाले आहे. राज्याच्या उद्योग विभागातंर्गत राबविण्यात येणाऱ्या महत्वकांक्षी ‘मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम’ योजने अंतर्गत जिल्ह्यात यावर्षी 243 नविन उद्योग उभे राहिल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले.

जिल्ह्यात एलपीजी गॅस आणि पेट्रोलचा मुबलक साठा उपलब्ध असून, नागरिकांनी घाबरून न जाता कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. पाणी टंचाईकरिता आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या असुन, सर्वसामान्य नागरिकांना पाणी टंचाईचा त्रास होणार नाही, याबाबत प्रशासनास सूचना देण्यात आल्याचे सांगितले.

महाराष्ट्र राज्य सेवा हक्क अधिनियम अंतर्गत जालना जिल्हा प्रशासनाने ‘घरपोच शासकीय सेवा’ या नाविन्यपूर्ण उपक्रमाची अंमलबजावणी केल्याने जिल्हाधिकारी कार्यालयास राज्यस्तरीय कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. तसेच जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या ‘जालना मित्र’ या डिजिटल अ‍ॅपद्वारे नागरिकांना घरबसल्या योजनांची माहिती आणि विविध सेवांचा लाभ मिळत असल्याचे सांगितले.

तसेच सद्या राज्यभर तापमानात वाढ झाली असुन, उष्णतेच्या लाटेची शक्यता असल्याचे सांगितले. नागरिकांनी जास्त वेळ बाहेर राहणे, योग्यरीतीने पाणी आणि अन्न घेणे, थंड वस्त्रे वापरणे यासारख्या सावधानता बाळगण्याचे आवाहन पालकमंत्री यांनी केले.

प्रारंभी पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी परेड निरीक्षण केले. त्यानंतर विविध पथकांनी संचलन केले. पोलीस शहर व ग्रामीण यंत्रणेचे पथक, वाहतूक नियंत्रण विभाग, गृह रक्षक दल, शीघ्र प्रतिसाद दल यांच्यासह अग्निशमन दल, श्वान पथक, आपत्ती व्यवस्थापन वाहन, 108 रूग्णवाहिका आदी वाहनांचा संचलनात उत्स्फूर्त सहभाग होता. पोलीस वाद्यवृंद पथकाच्या स्फूर्तीदायक महाराष्ट्र गीताच्या वादनाने कार्यक्रमाची रंगत वाढवली.

यावेळी पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्याहस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. तसेच पोलीस विभागाला वाहनांचे लोकार्पण करण्यात आले. मुख्य ध्वजारोहणाच्या कार्यक्रमास यावेळी स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी-कर्मचारी, पत्रकार व नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

****

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते ध्वजारोहण

 


जालना,दि.1(जिमाका): महाराष्ट्र दिनाच्या 67 वा स्थापना दिनानिमित्त जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. 

यावेळी अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ, प्र. निवासी उपजिल्हाधिकारी मनिषा दांडगे, उपजिल्हाधिकारी मनिषा देशपांडे, उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे, श्रीमती पगारे, जिल्हा नियोजन अधिकारी सुचित कुलकर्णी, यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

****