Friday, 13 March 2026

16 मार्चला महिला लोकशाही दिनाचे आयोजन

 


 

          जालना दि. 13 (जिमाका) :-  महिला व बाल विकास विभागाने, समस्या व पीडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळण्यासाठी त्यांच्या हक्कांचे संरक्षण होऊन न्याय मिळावा या हेतूने  जिल्हा तसेच तालुकास्तरावर महिलांसाठी विशेष लोकशाही दिन पाळण्यात येतो. तालुकास्तरावर प्रत्येक तहसिल कार्यालयात महिन्याचे चौथ्या सोमवार आणि जिल्हाधिकारी कार्यालयात दर महिन्याच्या तिस-या सोमवारी महिला लोकशाही दिनाचे आयोजन  करण्यासाठी दि. 16 मार्च 2026 रोजी सकाळी 11 ते 12 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.  या महिला लोकशाही दिनात तक्रार दाख करु इच्छिणाऱ्या महिलांनी आपली तक्रार दोन प्रतित  महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय जालना येथे दाखल करण्याचे आवाहन केले आहे.

            अर्ज स्वीकृतीचे निकष पुढीलप्रमाणे तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे असावे, तक्रार निवेदन दोन प्रतित सादर करावे, सदरील प्रकरण न्याय प्रविष्ठ नसावे, अर्ज विहित नमुन्यात व आवश्यक त्या कागदपत्रासह सादर करावा, सेवा व आस्थापना विषयक बाबी विचारात घेतल्या जाणार नाहीत. निवडणुक आचार संहिता काळात त्या त्या स्तरावर, विधीमंडळ अधिवेशन काळात राज्यस्तर महिला लोकशाही दिन पाळण्यात येत नाही.

        महिलांनी प्रथम संबंधीत तहसिलदार यांच्याकडे महिला लोकशाही दिनाच्या पंधरा दिवस आधी दोन प्रतीत तक्रार दाखल करावी. तालुका  महिला  लोकशाही दिनात एका महिन्यांचे आत कार्यवाही न झाल्यास संबंधीत महिला जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनात तक्रार दाखल करु शकतील. तालुकास्तरावरील लोकशाही दिनांत अर्जदार महिलेस अंतिम उत्तर  शक्य तितक्या लकर जास्तीत जास्त एक महिन्याच्या आत देण्याचे बंधन संबंधित अध्यक्ष तथा तहसिलदार व सदस्य सचिव तथा बाल विकास प्रकल्प अधिकारी यांची राहील. महिलांनी तक्रार अर्ज दाखल करण्यासाठी तालुकास्तरावर तहसिल कार्यालय व जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याशी संपर्क करुन या उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-

वृत्त क्र. 114                                                                       दि. 13 मार्च, 2026

 

15 हजारांचे अर्थसहायासाठी दिव्यांग सहाय्यक

 पोर्टलवर ऑनलाइन अर्जांचे आवाहन

 

            जालना दि. 13 (जिमाका) :-  दिव्यांग हक्क अधिनियम 2016 आणि दिव्यांग धोरण 2018 मधील उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून, विज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगात दिव्यांगांना स्वावलंबी करण्यासाठी राज्य शासनाने पाऊल उचलले आहे. 28 फेब्रुवारी 2026 च्या शासन निर्णयानुसार, प्रशिक्षित दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी लागणारी साधनसामग्री (टूल किट) खरेदी करण्यासाठी 15 हजार रुपयांपर्यंतचे वित्तीय सहाय्य देण्यात येणार आहे. तरी पात्र लाभार्थ्यांनी या योजनेसाठी दिव्यांग सहायक पोर्टलवर अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम. यांनी केले आहे.

            सध्याच्या काळात नवनवीन कौशल्ये आत्मसात करणे काळाची गरज बनली आहे. शासकीय किंवा शासनमान्य प्रशिक्षण संस्थांमधून, तसेच कौशल्य व उद्योजकता विकास केंद्रातून प्रशिक्षण पूर्ण केलेल्या दिव्यांग प्रशिक्षणार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. आपल्या कौशल्यानुसार स्थानिक पातळीवर लघुउद्योग किंवा सेवा व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारी उपकरणे खरेदी करण्यास यामुळे मदत होणार आहे. या योजनेची अंमलबजावणी पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी दिव्यांग सहाय्यक या पोर्टलवर आपले अर्ज सादर करावेत. ऑफलाइन पद्धतीने आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.  प्राप्त अर्जांची छाननी जिल्हा कार्यालयामार्फत केली जाईल आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समिती पात्र लाभार्थ्यांची निवड करेल. असेही  प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

वृत्त क्र. 114                                                                       दि. 13 मार्च, 2026

 

‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अभियानाचे आयोजन

· मार्च ते मे 2026 दरम्यान विविध मंडळांत शिबिरे

· नागरिकांच्या महसुली तक्रारींचे तातडीने निराकरण

 

जालना, दि.13 (जिमाका) :- राज्य शासनाच्या आदेशानुसार जालना तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा क्र. 1 राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांच्या महसुली संबंधित अडचणी व तक्रारींचे तातडीने निवारण करण्यासह विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे. या शिबिरांमध्ये महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे, महाराष्ट्र जमीन महसूल संहितेअंतर्गत नोंदी अद्ययावत करणे, डिजिटल सेवा पोर्टलवरील प्रकरणांचा निपटारा तसेच सिंगल डे सर्व्हिस डिलिव्हरी अंतर्गत सेवा देण्यात येणार आहेत. मार्च ते मे 2026 या कालावधीत तालुक्यातील विविध मंडळांमध्ये ही शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत.

कार्यक्रमानुसार 14 मार्च रोजी जालना तालुक्यातील सावंगी तलाव मंडळात निरखेडा रामेश्वर मंदीर येथे, बदनापूर तालुक्यात रोशेगाव मंडळात शिवाजी विद्यालय रोशेगाव येथे, अंबड तालुक्यातील धनगरपिंप्री मंडळात मंगल कार्यालय धनगरपिंप्री येथे, घनसावंगी तालुक्यात राणीउंचेगाव मंडळात शारदा मंगल कार्यालय राणी उंचेगाव येथे, परतूर तालुक्यात श्रीष्टी मंडळात जि.प.शाळा श्रीष्टी येथे, मंठा तालुक्यात तळणी मंडळात जि.प.शाळा तळणी येथे, भोकरदन तालुक्यात जानेफळ दाभाडी मंडळात महादेव मंदीर जानेफळ दाभाडी येथे, आणि जाफ्राबाद तालुक्यातील कोळेगाव मंडळात जि.प.शाळा भारत बु. येथे हे शिबिर सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी संबंधित कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-

 

No comments:

Post a Comment