रोजगार मेळाव्यात
110 तरुणांना मिळाली नोकरी;
धूत ट्रान्समिशनकडून
27 जणांना जागीच नियुक्तीपत्रे
जालना, दि. 27 (जिमाका) :- जिल्ह्यातील
बेरोजगार तरुण-तरुणींसाठी रोजगाराची मोठी संधी उपलब्ध करून देत, जिल्हा कौशल्य विकास,
रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि हुतात्मा जनार्दनमामा नागापूरकर शासकीय औद्योगिक
प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार
मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्यात विविध नामांकित कंपन्यांनी 110 उमेदवारांची
निवड केली असून, त्यांच्या करिअरला नवी दिशा मिळाली आहे. या मेळाव्याचे मुख्य आकर्षण
ठरले ते छत्रपती संभाजीनगर येथील धूत ट्रान्समिशन प्रा. लि. हे औद्योगिक गृह. या कंपनीने
27 पात्र उमेदवारांना निवडीनंतर तात्काळ नियुक्तीपत्रे देऊन त्यांच्या उत्साहात भर
घातली.
शुक्रवार दि.27 मार्च रोजी शासकीय आयटीआय जालना येथे हा
मेळावा पार पडला. सहायक आयुक्त गणेश चिमणकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला.
यावेळी शासकीय आयटीआयच्या प्राचार्या श्रीमती तृप्ती भोपे आणि उपप्राचार्या श्रीमती
रजनी शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती.
या मेळाव्यात इयत्ता पाचवी ते दहावी, बारावी आणि आयटीआय
(सर्व ट्रेड्स) उत्तीर्ण असलेल्या शेकडो उमेदवारांनी हजेरी लावली होती. मेळाव्यात एकूण
9 नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यामध्ये असिस्टंट मॅनेजर, ब्रांच मॅनेजर,
कॅशियर, टेक्निशियन, ऑपरेटर, फील्ड एक्झिक्युटिव्ह, हेल्पर आणि ए.सी.सी. मशीन ऑपरेटर
अशा विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. एकूण 110 उमेदवारांना या माध्यमातून
रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल परिहार यांनी केले, तर आभार
प्रदर्शन एस. जी. चव्हाण यांनी केले. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी आयटीआयचे गटनिदेशक
एस. एस. कापसे, ए. एस. धाबे, बी. डी. वाणी यांच्यासह कौशल्य विकास विभागातील भुजंग
रिठे, अमोल बोरकर, आत्माराम दळवी, प्रदीप डोळे, योगेश बहुरे, नितीन लोकडे, कैलास काळे,
रवींद्र पाड्मुख, विशाल जगरवाल, दीपक पालवे आणि गणेश सुपारकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
असेही कळविले आहे.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment