Wednesday, 11 March 2026

दोन दिवसीय जालना ग्रंथोत्सव उत्साहात लोकसेवेचे ध्येय आणि मूलभूत संकल्पनांचे ज्ञान यशासाठी आवश्यक - उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे

 


* जालना ग्रंथोत्सव-2025 : ‘मी धर्मवीर’ नाटिकेने शिवकालीन इतिहास जिवंत…

 

जालना, दि.11 (जिमाका) :-  स्पर्धा परीक्षेच्या प्रवासात निस्वार्थी वृत्ती आणि कार्यक्षमता हेच यशाचे खरे गमक आहे. केवळ शासकीय नोकरी मिळविण्याच्या उद्देशाने नाही, तर गावाचा विकास आणि जनतेची सेवा करण्यासाठी अधिकारी होण्याचे ध्येय बाळगावे. स्पर्धा परीक्षांची तयारी करताना केवळ पुस्तकी वाचन न करता विषयांच्या मूलभूत संकल्पना समजून घेण्यावर भर देणे आवश्यक आहे. जोपर्यंत विषयातील संकल्पना स्पष्ट होत नाही, तोपर्यंत केवळ पाठांतराचा उपयोग होत नाही. पाया भक्कम असेल तर यश हमखास मिळते. त्यामुळे स्पर्धा परीक्षेतील अभ्यासाची सुरुवात नेहमी मूलभूत संकल्पनेपासून करा. तरी स्पर्धा परीक्षेत लोकसेवेचे ध्यये आणि मूलभूत संकल्पनांचे ज्ञान यश प्राप्तीसाठी अत्यंत आवश्यक आहे. असे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे यांनी केले.

उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात ‘जालना ग्रंथोत्सव-2025’ आयोजित करण्यात आला आहे. बुधवार दि. 11 मार्च रोजी या ग्रंथोत्सवात ‘स्पर्धा परीक्षा काळाची गरज’ या विषयावर आयोजित परिसंवादात त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष रवींद्र तौर होते. तर डॉ. संजीवनी तडेगावकर, डॉ. प्रभाकर शेळके, प्रा.राजेंद्र भोसले, उपशिक्षणाधिकारी संजय कायंदे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी चंद्रशेखर ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती.

समाजासाठी आणि देशासाठी काम करण्याची ओढ ज्याच्या मनात आहे, तोच एक उत्तम अधिकारी बनू शकतो. एक अधिकारी म्हणून आपण घेतलेल्या निर्णयाचा समाजावर काय दूरगामी परिणाम होईल, याचे भान असणे अत्यंत आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षेचे क्षेत्र आव्हानात्मक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नेहमी सकारात्मक राहून तयारी करावी, मात्र त्याच वेळी आपल्याकडे ‘प्लॅन बी’ सुद्धा तयार असावा. यश मिळाले नाही तरी निराश न होता, पर्यायी मार्गाचा विचार करून जिद्दीने पुढे जावे. प्रशासनात येताना तुमची वृत्ती ही केवळ नोकरीची नसून ती सेवा करण्याची असावी. एक अधिकारी म्हणून आपण घेतलेल्या निर्णयाचा समाजावर काय दूरगामी परिणाम होईल, याचे भान असणे अत्यंत आवश्यक आहे. प्रशासनात येताना तुमची वृत्ती ही केवळ नोकरीची नसून ती सेवा करण्याची असावी. स्पर्धा परीक्षेत सर्व विषयांचे ज्ञान असणे आवश्यक आहे. केवळ पुस्तकी कीडा न होता, चालू घडामोडींचे सखोल ज्ञान आत्मसात करावे. असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी उपस्थित मान्यवरांची समयोचित भाषणे झाली. सुत्रसंचालन डॉ. प्रभाकर शेळके यांनी केले तर आभार सतीश जाधव यांनी मानले. यावेळी ग्रंथप्रेमी, ग्रंथालयाचे संचालक, ग्रंथपाल, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

मी धर्मवीर नाटिकेने शिवकालीन इतिहास जिवंत

ग्रंथोत्सवाच्या दुसऱ्या सत्रात दुपारी 1.30 वाजता ‘मी धर्मवीर’ या नाटिकेचे ओजस्वी सादरीकरण करण्यात आले. ऐतिहासिक काळात झालेला अन्याय आणि जुलूम याविरुद्ध छत्रपती शिवाजी महाराज यांनी दिलेला लढा यात प्रभावीपणे मांडण्यात आला. रायरेश्वर मंदिरातील स्वराज्याची शपथ आणि आग्रा भेटीतील थरार पाहून उपस्थित प्रेक्षक भारावून गेले. या नाटिकेने संपूर्ण सभागृहात चैतन्य निर्माण केले होते.

-*-*-*-*-

वृत्त क्र. 108                                                                      दि. 11 मार्च, 2026

14 मार्च रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

 

जालना, दि.11 (जिमाका) :-  न्यायालयातील प्रलंबित वादांमधून सुटका करून घेण्यासाठी आणि वेळ, पैसा व मानसिक ताण वाचवण्यासाठी जालना जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची संधी चालून आली आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, शनिवार, दि. 14 मार्च 2026 रोजी जालना जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी आपापसातील वाद सामोपचाराने मिटवून वेळ, पैसा आणि मानसिक ताण वाचवावा. या लोकअदालतीचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती वर्षा मोहिते यांनी केले आहे.

लोकअदालतीमध्ये प्रामुख्याने मोटार अपघात विमा दावे आणि कौटुंबिक वाद, बँकांची वसुली प्रकरणे, वीज वितरण कंपनीशी संबंधित वाद, सर्व प्रकारचे दिवाणी दावे आणि तडजोडपात्र फौजदारी गुन्हे, औद्योगिक, कामगार, सहकार न्यायालय आणि ग्राहक तक्रार निवारण मंचातील प्रलंबित प्रकरणे आदि प्रकारची प्रकरणे तडजोडीसाठी ठेवली जाणार आहेत. तरी संबंधितांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना किंवा संबंधित तालुका विधी सेवा समितीशी संपर्क साधावा. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

वृत्त क्र. 109                                                                       दि. 11 मार्च, 2026

अमृतचा वॉशिंग्टन विद्यापीठाशी मदतीचा हात

जालना, दि.11 (जिमाका) :- महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील तरुणांना आता केवळ राज्यातच नव्हे, तर जागतिक स्तरावर आपली उद्योजकता सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे. राज्य शासनाची स्वायत्त संस्था महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) आणि अमेरिकेतील वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी यांच्यात नुकताच धोरणात्मक भागीदारीचा करार झाला आहे. या भागीदारीमुळे स्थानिक नवउद्योजकांना आता थेट अमेरिकेतून तांत्रिक आणि आर्थिक बळ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

अमृत संस्थेच्या माध्यमातून राज्यातील गुणवंत तरुणांना स्वावलंबी बनवण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. या प्रयत्नांना आता आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संशोधनाची आणि मार्गदर्शनाची जोड मिळणार आहे. वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीचे फाऊंडेशन आणि त्यांच्या स्टार्टअप इन्क्युबेशन सेंटरने यासंदर्भात पुढाकार घेतला आहे. या करारामुळे जागतिक दर्जाच्या संशोधनाला चालना मिळणार असून, महाराष्ट्रातील ग्रामीण व निमशहरी भागातील स्टार्टअप्सना जागतिक बाजारपेठेची दारे उघडली जाणार आहेत.

वॉशिंग्टन विज्ञान-तंत्रज्ञान विद्यापीठाने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून या भागीदारीची घोषणा केली आहे. या महत्त्वपूर्ण करारावेळी विद्यापीठाच्या इन्क्युबेशन सेंटरच्या कार्यकारी संचालिका प्रिया कोठारी आणि अन्य वरिष्ठ पदाधिकारी प्रत्यक्ष उपस्थित होते, तर अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी ऑनलाइन स्वरूपात उपस्थिती लावून या करारावर शिक्कामोर्तब केले आहे. असे अमृतचे जिल्हा व्यवस्थापक नितिन खेकाळे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

वृत्त क्र. 110                                                                       दि. 11 मार्च, 2026

 

 

 

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण प्लेसमेंट ड्राईव्ह;

13 मार्चला 22 जागांसाठी थेट मुलाखती

 

          जालना, दि.11 (जिमाका) :- जालना जिल्ह्यातील नोकरीच्या शोधात असलेल्या युवक-युवतींसाठी रोजगाराची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे शुक्रवार, दि. 13 मार्च 2026 रोजी विशेष प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत होणाऱ्या या मोहिमेत नामांकित संस्थांमध्ये रिक्त असलेल्या 22 पदांसाठी पात्र उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना येथे घेतल्या जाणार आहेत.

              या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये प्रामुख्याने रेणुका देवी नागरी सहकारी बँक आणि गणपती नेत्रालय या सारख्या नामांकित संस्था सहभागी होत आहेत. या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे, नियुक्ती होणाऱ्या उमेदवारांना संबंधित कंपनीकडून मिळणाऱ्या वेतनाव्यतिरिक्त शासन निर्णयानुसार त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार 6 हजार, 8 हजार आणि 10 हजार रुपयांपर्यंतचे मासिक विद्यावेतन देखील दिले जाणार आहे.  इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीला येण्यापूर्वी राज्य शासनाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in किंवा केंद्र शासनाच्या www.ncs.gov.in या पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. लॉगिन केल्यानंतर डॅशबोर्डवरील 'मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना प्लेसमेंट ड्राईव्ह' या टॅबवर क्लिक करून जालना जिल्ह्याची निवड करावी आणि संबंधित पदांची माहिती घ्यावी.असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

वृत्त क्र. 111                                                                       दि. 11 मार्च, 2026

 

जैवविविधतेत पक्षी-प्राणी यांचे महत्त्व मोलाचे

असून त्यांच्या संरक्षणासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत

                                                                                        - जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

 

              जालना, दि.11 (जिमाका) :- जैवविविधतेचे संतुलन राखण्यात पक्षी व वन्यप्राण्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून पर्यावरण संवर्धनासाठी त्यांचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. पक्ष्यांचे अधिवास जपणे, झाडे लावणे आणि पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारणे यासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केले.

              महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक वनीकरण विभाग, वन प्रशिक्षण संस्था जालना तसेच महाराष्ट्र राज्य पक्षीमित्र संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने जालना येथील वन प्रशिक्षण संस्था तथा जिल्हा प्रशासकीय संकुलात प्रथमच विद्यार्थी पक्षीमित्र संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जालना पी. एम. मिन्नू, विभागीय वन अधिकारी सुरेश वडदे, सामाजिक वनीकरण विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक अजित पुकळे, वन प्रशिक्षण संस्थेचे उपसंचालक अजय जाधव, महाराष्ट्र राज्य पक्षीमित्र राज्य कार्यकारिणी सदस्य तथा निसर्ग कट्टा संस्थेचे संस्थापक अमोल सावंत, पक्षीमित्र संघटनेचे जिल्हा समन्वयक ज्ञानेश्वर गिराम, मयूर साबळे आणि सुभाष पारे यांची उपस्थिती होती.

                        कार्यक्रमाची सुरुवात वृक्षपूजन व पक्षीतज्ञ डॉ. सलीम अली व स्व.श्री मारुती चितमपल्ली यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आले. त्यानंतर प्रधान मुख्य वनसंरक्षक सामाजिक वनीकरण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी व्हिडिओ संदेशद्वारे या कार्यक्रमास शुभेच्छापर संदेश देऊन पर्यावरण संरक्षण हे आपले संविधानिक जबाबदारी असल्याचे सांगितले.

              जिल्हाधिकारी आशिमा मित्तल म्हणाल्या की, पर्यावरणातील संतुलन राखण्यासाठी पक्षी व प्राणी अत्यंत आवश्यक घटक आहेत. अनेक पक्षी कीड नियंत्रण, परागीभवन तसेच बियांचे प्रसारण करण्याचे महत्त्वाचे काम करतात. त्यामुळे शेती, जंगल आणि पर्यावरण या तिन्ही घटकांसाठी त्यांचे अस्तित्व आवश्यक आहे. वाढत्या शहरीकरणामुळे आणि वृक्षतोडीमुळे पक्ष्यांचे अधिवास कमी होत असून त्यांच्या संरक्षणासाठी समाजातील प्रत्येक घटकाने संवेदनशील होण्याची गरज आहे.विद्यार्थ्यांनी पक्षीनिरीक्षणाची आवड जोपासून पर्यावरण संरक्षणाचा संदेश समाजात पोहोचवावा. पक्ष्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी अशा प्रकारची संमेलने महत्त्वाची ठरतात. विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम व पर्यावरणाबद्दलची जबाबदारी वाढविण्याचा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरेल.

              या पक्षीमित्र संमेलनाचे प्रस्ताविक विभागीय वन अधिकारी सुरेश वडोदे यांनी करून विद्यार्थी पक्षी मित्र संमेलनाचा उद्देश सांगितला व सामाजिक वनीकरण विभागाकडून राष्ट्रीय हरित सेना व पर्यावरण शिक्षण कार्यक्रम अंतर्गत जिल्हाभरात घेण्यात आलेल्या विविध कार्यक्रमा बाबत माहिती दिली. तर महाराष्ट्र राज्य पक्षीमित्र राज्य कार्यकारिणी सदस्य तथा निसर्ग कट्टा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अमोल सावंत यांनी महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेचे कार्याबाबत सांगून माझे पक्षी अभयारण्य या विषयावर स्लाइड शोद्वारे सादरीकरण केले. महाराष्ट्रात शालेय पक्षी मित्र संमेलन हा उपक्रम अमोल सावंत यांच्या संकल्पनेत सुरू करण्यात आला आहे . जालना येथील प्रसिद्ध पक्षी निरीक्षक तथा महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेचे जिल्हा समन्वयक ज्ञानेश्वर गिराम यांच्या जालना जिल्ह्यातील पक्षी वैभव या विषयावर आधारित छायाचित्राचे प्रदर्शन दाखवून जालना जिल्ह्याचे पक्षी वैभव यावर स्लाईड शो सादर केला. सर्व विद्यार्थ्यांसाठी पक्षी चित्रकला स्पर्धा घेऊन , पक्षासाठी कृत्रिम घरटे निर्मिती कार्यशाळा, प्रश्नमंजुषा, व्याख्याने इ.उपक्रम घेण्यात आले आहे. या विद्यार्थी पक्षी संमेलनाचा उद्देश असा आहे की जालना जिल्ह्यात जास्तीत जास्त विद्यार्थी पालक शिक्षक यांना पक्षी निरिक्षण आणि पक्षाबाबतीत जास्तीत जास्त माहिती होणे आणि त्या बाबतीत जनजागृती करणे हा आहे. कार्यक्रमाच्या शेवटी चित्रकला स्पर्धा, प्रश्न मंजुषा व इतर स्पर्धा मध्ये प्रथम, द्वितीय , तृतीय क्रमांक प्राप्त व सहभागी झालेल्या विद्यार्थांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.

              चित्रकला स्पर्धेचे मूल्यांकन कलाशिक्षक परिमल पेडगावकर व अमोल मोरे यांनी केले. पक्षी संमेलनात सहभाग नोंदवलेल्या सर्व शाळांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन निवेदक मनिषा पाटील यांनी केले.यामध्ये जालना जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून इको क्लबच्या निवडक दोन शाळांचे प्रत्येकी 15 ते 20 विद्यार्थी व प्रत्येक शाळेतून दोन शिक्षक सहभागी झाले होते. जिल्हा मास्टर ट्रेनर मधुकर गायकवाड, जालना राष्ट्रीय हरीत सेना तथा महाराष्ट्र राज्य पक्षीमित्र संघटनेचे मयूर साबळे , जीवनराव पारे विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा महाराष्ट्र पक्षी मित्र आजीवन सभासद सुभाष पारे तसेच समस्त विभागातील वनअधिकारी, वनपाल, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

-*-*-*-*-

वृत्त क्र. 112                                                                       दि. 11 मार्च, 2026

 

 ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अभियानाचे आयोजन

·         मार्च ते मे 2026 दरम्यान विविध मंडळांत शिबिरे

·         नागरिकांच्या महसुली तक्रारींचे तातडीने निराकरण

 

                      जालना,दि.11(जिमाका) :- राज्य शासनाच्या आदेशानुसार जालना तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा क्र. 1 राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांच्या महसुली संबंधित अडचणी व तक्रारींचे तातडीने निवारण करण्यासह विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे. या शिबिरांमध्ये महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे, महाराष्ट्र जमीन महसूल संहितेअंतर्गत नोंदी अद्ययावत करणे, डिजिटल सेवा पोर्टलवरील प्रकरणांचा निपटारा तसेच सिंगल डे सर्व्हिस डिलिव्हरी अंतर्गत सेवा देण्यात येणार आहेत. मार्च ते मे 2026 या कालावधीत तालुक्यातील विविध मंडळांमध्ये ही शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत.

         कार्यक्रमानुसार 14 मार्च रोजी जालना तालुक्यातील सावंगी तलाव मंडळात निरखेडा रामेश्वर मंदीर येथे, बदनापूर तालुक्यात रोशेगाव मंडळात शिवाजी विद्यालय रोशेगाव येथे, अंबड तालुक्यातील धनगरपिंप्री मंडळात मंगल कार्यालय धनगरपिंप्री येथे,  घनसावंगी तालुक्यात राणीउंचेगाव मंडळात शारदा मंगल कार्यालय राणी उंचेगाव येथे, परतूर तालुक्यात श्रीष्टी मंडळात जि.प.शाळा श्रीष्टी येथे, मंठा तालुक्यात तळणी मंडळात जि.प.शाळा तळणी येथे, भोकरदन तालुक्यात जानेफळ दाभाडी मंडळात महादेव मंदीर जानेफळ दाभाडी येथे, आणि जाफ्राबाद तालुक्यातील कोळेगाव मंडळात जि.प.शाळा भारत बु. येथे हे शिबिर सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी संबंधित कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-

वृत्त क्र. 113                                                                       दि. 11 मार्च, 2026

 

ग्रामीण भागातील महिलांनी छोट्या उद्योगांच्या माध्यमातून आत्मनिर्भर व्हावे

-जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

 

जालना,दि.11(जिमाका) :-  ग्रामीण भागातील महिलांनी स्वयंसहायता समूहांच्या माध्यमातून छोटे-छोटे उद्योग उभारून आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि आत्मनिर्भर बनावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केले.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत जालना शहरातील डॉ. फ्रेझर बॉईज हायस्कूल येथे दि. 7 मार्च ते 11 मार्च 2026 या कालावधीत ग्राम विकास विभाग व पंचायत राज विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद जालना उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत ग्रामीण स्वयंसहायता समूहांच्या महिलांनी तयार केलेल्या दर्जेदार व पारंपरिक उत्पादनांची भव्य प्रदर्शनी व विक्री शिबिर 'जानकी महोत्सव' आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनीला भेट देऊन पाहणी करताना त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जालना पी. एम. मिन्नू, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सुनिल कुमार पठारे, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग श्रीमती स्मिता पवार, कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद जालना श्रीमती सविता शालघर, उप जिल्हाधिकारी सामान्य प्रशासन श्रीमती नम्रता चाटे, उप जिल्हाधिकारी पुनर्वसन श्रीमती सुकेशिनी कांबळे-पगारे, उप जिल्हाधिकारी रोहयो श्रीमती मनिषा दांडगे, उप जिल्हाधिकारी भूसंपादन श्रीमती मनिषा देशपांडे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बाल विकास विभाग श्रीमती कोमल कोरे, तहसीलदार श्रीमती छाया पवार, गटविकास अधिकारी बदनापूर श्रीमती ज्योती राठोड, गटविकास अधिकारी अंबड श्रीमती ज्योती कवडदेवी, शिक्षणाधिकारी प्राथमिक श्रीमती संगिता भागवत, जिल्हा अभियान व्यवस्थापक शैलेश चौधरी यांची उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल म्हणाल्या की, ग्रामीण भागातील महिलांकडे अनेक कौशल्ये व पारंपरिक ज्ञान आहे. या कौशल्यांचा उपयोग करून विविध लघुउद्योग उभारता येतात. स्वयंसहायता समूहांच्या माध्यमातून महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळू शकते. महिलांनी घरगुती व्यवसाय, हस्तकला, अन्नप्रक्रिया, शिवणकाम, तसेच स्थानिक पातळीवर उपलब्ध संसाधनांवर आधारित उद्योग सुरू करून स्वतःचा व कुटुंबाचा आर्थिक विकास साधावा. सोबतच महिला सक्षमीकरणासाठी महिलांनी आधुनिक तंत्रज्ञान अवगत करणे आवश्यक आहे. डिजिटल माध्यमांचा वापर करून उत्पादनांची विक्री वाढवता येते. तसेच बाजारपेठेची माहिती घेऊन उत्पादनांची गुणवत्ता टिकवून ठेवणे महत्त्वाचे आहे. नवीन उद्योगांविषयी माहिती घेऊन ते उभारण्यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.या प्रदर्शनीत ग्रामीण स्वयंसहायता समूहांच्या महिलांनी तयार केलेले विविध खाद्यपदार्थ, मसाले, पापड, लोणची, हस्तकला वस्तू, सजावटीच्या वस्तू, कपड्यांवरील भरतकाम आदी पारंपरिक व दर्जेदार उत्पादने विक्रीसाठी ठेवण्यात आली होती. नागरिकांनी या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध वस्तूंची खरेदी केली. या वेळी संबंधित विभागाचे अधिकारी, स्वयंसहायता समूहांच्या महिला तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या प्रदर्शनाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना आपली उत्पादने थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळाली असून त्यांच्या आर्थिक सबलीकरणाला चालना मिळणार आहे.

-*-*-*-*-

 

No comments:

Post a Comment