जालना,दि.17 (जिमाका) : जिल्ह्यातील सूक्ष्म व अतिसूक्ष्म उद्योजकांच्या व्यवसाय विस्ताराला चालना देण्यासाठी
आणि त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता
मार्गदर्शन केंद्र आणि ‘दे आसरा’ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उद्योजक
मेळावा व मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम मंगळवार दि.24 मार्च 2026 रोजी सकाळी 10 ते दुपारी
1 या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे पार पडणार आहे. तरी जिल्ह्यातील
जास्तीत जास्त उद्योजकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास केंद्र, जालना यांनी केले आहे.
स्थानिक पातळीवर मोठ्या
प्रमाणात रोजगार निर्मिती करणाऱ्या सूक्ष्म उद्योजकांना अनेकदा आधुनिक तंत्रज्ञान,
डिजिटल मार्केटिंग आणि वित्तीय व्यवस्थापनात अडचणी येतात. या पार्श्वभूमीवर, उद्योजकांना
योग्य दिशा मिळावी आणि त्यांच्या शंकांचे निरसन व्हावे, हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश
आहे. या सत्रात दे आसरा फाउंडेशनचे तज्ज्ञ आणि जिल्ह्यातील यशस्वी उद्योजक मार्गदर्शन
करणार असून, नेटवर्किंग वाढवण्यासाठीही ही मोठी संधी ठरणार आहे. या मेळाव्यात सहभागी
होऊ इच्छिणाऱ्या लाभार्थ्यांनी https://forms.gle/DtPKMVVk2E3GmKBc7 या लिंकवर आपली
नावनोंदणी करणे आवश्यक आहे.
-*-*-*-*-
वृत्त
क्र. 118
दि. 17 मार्च, 2026
सुशिक्षित बेरोजगारांना
प्रत्यक्ष निवडीची सुवर्णसंधी
जालना,दि.17 (जिमाका) : जालना जिल्ह्यातील नोकरीच्या शोधात असलेल्या
युवक-युवतींसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व
उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि मॉडेल करिअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, दि.18 मार्च 2026 रोजी विशेष
प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेअंतर्गत पात्र उमेदवारांना
थेट मुलाखतीद्वारे जागेवरच नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे.उमेदवारांनी
सकाळी 11 ते दुपारी 2 या
वेळेत जिल्हा कौशल्य विकास केंद्र, दुसरा
मजला, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथे उपस्थित रहावे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील कौशल्य
विकास केंद्रात सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत ही प्रक्रिया पार पडणार आहे. या प्लेसमेंट
ड्राईव्हमध्ये रिद्धी सिद्धी सर्विसेस, जालना
या संस्थेकडून एकूण 20 रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे. यामध्ये बारावी उत्तीर्ण
उमेदवारांची टेलीकॉलर 10 पदे, सेल्स अधिकारी 10 पदेभरली जाणार आहेत. इच्छुक
उमेदवारांनी मुलाखतीला येण्यापूर्वी शासनाच्या अधिकृत पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक
आहे. वेबसाइट: www.rojgar.mahaswayam.gov.in किंवा www.ncs.gov.in वर भेट द्यावी. मुलाखतीसाठी
येताना उमेदवारांनी आपल्या बायोडाटाच्या किमान
दोन प्रती सोबत ठेवणे अनिवार्य आहे. जालना जिल्ह्यातील जास्तीत जास्त तरुण-तरुणींनी
या रोजगाराच्या पर्वणीचा लाभ घ्यावा. खासगी क्षेत्रातील नामवंत कंपन्यांमध्ये करिअर
करण्याची ही उत्तम संधी आहे, असे सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता
विभाग, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
-*-*-*-*-
वृत्त
क्र. 119
दि. 17 मार्च, 2026
जालना पाटबंधारे
विभागाचा कडक इशारा;
पाणीपट्टी न भरल्यास
पाणी व वीज पुरवठा खंडित करणार
जालना,दि.17 (जिमाका) : सर्व
थकीत बिगर सिंचन योजनाधारकांना कळविण्यात येते की जालना पाटबंधारे विभाग जालना
पाटबंधारे विभाग जालना अंतर्गत पाटबंधारे प्रकल्पातुन बिगर सिंचन योजनेस
पिण्याच्या पाण्याच्या प्रयोजनार्थ पाणी पुरवठा करण्यात येतो. वापरलेल्या
पाण्याच्या प्रयोजनार्थ विभागाची 1264.39 लक्ष रुपये बिगर सिंचन पाणीपट्टी थकीत
आहे. थकीत पाणीपट्टी भरणा सर्व योजना धारकांनी आपल्या योजनेची थकीत बिगर सिंचन पाणीपट्टी 7
दिवसाच्या आत जालना पाटबंधारे विभाग जालना यांच्या नावे धनादेशाव्दारे भरणा
करण्यात यावा, अन्यथा महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम 1976 भाग 6, कलम 49 (ज) अन्वये
संबंधीत योजनेचा पाणी पुरवठ्यासह विद्युत पुरवठा खंडीत करण्याची कार्यवाही करण्यात
येईल. असे आवाहन कार्यकारी अभियंता, जालना पाटबंधारे विभाग, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे
केले आहे.
-*-*-*-*-
वृत्त
क्र. 120
दि. 17 मार्च, 2026
ॲथलेटिक्स आणि कुस्तीचे निपुणता
केंद्र सज्ज;
प्रतिभावान खेळाडूंनी 20 मार्चपर्यंत अर्ज करावेत
जालना,दि.17 (जिमाका) : राज्यातील क्रीडा संस्कृतीला व्यावसायिक व जागतिक
दर्जाची जोड देण्यासाठी राज्य शासनाने ‘मिशन लक्ष्यवेध’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प
हाती घेतला आहे. या अंतर्गत लातूर विभागाला ॲथलेटिक्स आणि कुस्ती या दोन खेळांच्या निवासी विभागीय क्रीडा निपुणता
केंद्राची मान्यता मिळाली असून, प्रतिभावान खेळाडूंना आता हक्काचे व्यासपीठ मिळणार
आहे. या केंद्रासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, इच्छुकांनी दि.20 मार्च 2026
पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
लातूर येथे सुरू होणाऱ्या या निवासी केंद्रात ॲथलेटिक्स
आणि कुस्ती या दोन्ही खेळांच्या प्रत्येकी 20 खेळाडूंची निवड केली जाणार आहे. निवड
झालेल्या खेळाडूंना निवास, भोजन, पूरक आहार, अद्ययावत प्रशिक्षण साहित्य आणि देशी-विदेशी
प्रशिक्षणाची सुविधा शासनामार्फत मोफत पुरविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, खेळाडूंच्या
सरावासाठी स्पोर्ट्स सायन्स सेंटर आणि करिअर मार्गदर्शनासारख्या आधुनिक सोयीही उपलब्ध
करून दिल्या जातील.
अर्जासोबत अर्जदारांनी जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला,
आधार कार्ड, अधिवास प्रमाणपत्र, मागील 2 वर्षांतील क्रीडा कामगिरीची प्रमाणपत्रे, बोनाफाईड
सर्टिफिकेट, पालकांचे संमती पत्र आणि वैद्यकीय तंदुरुस्ती प्रमाणपत्र जोडणे आवश्यक
आहे. इच्छुक खेळाडूंनी आपले अर्ज विभागीय
उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, लातूर विभाग, जिल्हा क्रीडा संकुल परिसर, औसा रोड, लातूर
येथे प्रत्यक्ष सादर करावेत. किंवा dyd.syslatur@rediffmail.com
या ई-मेलवरही ऑनलाईन अर्ज पाठवण्याची सुविधा उपलब्ध आहे. अर्जाची शेवटची तारीख 20 मार्च 2026 अशी आहे. असे जिल्हा क्रीडा
अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
-*-*-*-*-
वृत्त
क्र. 121 दि. 17 मार्च, 2026
जालना जिल्हा लोकअदालतीत 713 प्रकरणे निकाली;
14 कोटी 33 लाखाहून अधिक तडजोड शुल्क वसूल
·
दोन विखुरलेले संसार पुन्हा बहरले
जालना,दि.17 (जिमाका) : उच्च न्यायालय, मुंबई व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण,
मुंबई यांच्या निर्देशानुसार जालना जिल्ह्यात शनिवार, दि.14 मार्च 2026 रोजी
'राष्ट्रीय लोकअदालती'चे यशस्वी आयोजन करण्यात आले. या लोकअदालतीमध्ये एकूण 713
प्रकरणांचा निपटारा करण्यात आला असून, तब्बल 14 कोटी 33 लाख 77 हजार 450 रुपयांचे
तडजोड शुल्क वसूल करण्यात आले आहे.
लोकअदालतीचे
उद्घाटन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा व सत्र
न्यायाधीश श्रीमती वर्षा एम. मोहिते यांच्या प्रमुख
उपस्थितीत झाले. यावेळी जिल्हा न्यायाधीश-03 के.व्ही. मोरे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-01
जी.आर. ढेपे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव नितेश बंडगर, जिल्हा वकील संघाचे
अध्यक्ष परमेश्वर गडगीळे, जिल्हा सरकारी अभियोक्ता बाबासाहेब इंगळे व इतर
न्यायालयीन अधिकारी उपस्थित होते.
जालना जिल्ह्यातील विविध
न्यायालयांमध्ये एकूण 31856 प्रकरणे लोकअदालतीसाठी ठेवण्यात आली होती. यामध्ये दिवाणी,
फौजदारी, मोटार अपघात, भूसंपादन, एन.आय. ॲक्ट कलम 138 आणि दावा दाखलपूर्व प्रकरणांचा
समावेश होता. या लोकअदालतीचे विशेष
यश म्हणजे कौटुंबिक वादातील दोन प्रकरणे सामोपचाराने सुटली. परिणामी, दोन विभक्त
राहणाऱ्या महिला पुन्हा आपल्या पतीच्या घरी नांदायला गेल्या असून दोन विखुरलेले
संसार पुन्हा सुखाने बहरले आहेत. प्रलंबित प्रकरणे 6300 प्रकरणांपैकी 510
प्रकरणे निकाली निघाली. अशा प्रकारे एकूण 713 प्रकरणे तडजोडीने यशस्वीरित्या
मिटवण्यात आली. दाखलपूर्व प्रकरणी 25,556 प्रकरणांपैकी 203 प्रकरणे निकाली निघाली. ही लोकअदालत यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील न्यायालयीन कर्मचारी, बँक अधिकारी,
पोलीस प्रशासन, उपप्रादेशिक परिवहन विभाग आणि वकील संघाच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम
घेतले. असे सदस्य सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे
कळविले आहे.
-*-*-*-*-
वृत्त
क्र. 122 दि. 17 मार्च, 2026
जालना जिल्ह्यात 19 मार्च रोजी 'यलो अलर्ट';
नागरिकांना सतर्क राहण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन
जालना,दि.17 (जिमाका)
: प्रादेशिक
हवामानशास्त्र केंद्र, कुलाबा, मुंबई यांच्या अंदाजानुसार जालना जिल्ह्यात येत्या
काही दिवसांत हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा
प्रशासनाने नागरिकांना खबरदारी घेणे गरजेचे आहे. तरी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी
हवामान विभागाच्या अद्ययावत अंदाजांकडे लक्ष देऊन स्थानिक प्रशासनाने दिलेल्या
सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
जिल्ह्यात 17 व 18 मार्च रोजी जिल्ह्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर 19 मार्च रोजी जिल्ह्यासाठी 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला असून, विजांच्या कडकडाटासह वादळी वारे, हलका ते
मध्यम पाऊस आणि ताशी 30 ते 40 किमी वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता
वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे विजांचा
कडकडाट आणि वादळी वारे सुरू असताना घराबाहेर पडणे टाळावे. झाडे, विजेचे खांब,
ट्रान्सफॉर्मर आणि उंच बांधकामांपासून दूर राहावे. मेघगर्जना होत असताना मोकळ्या मैदानात किंवा झाडाखाली उभे न राहता
सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. वीज कडकडत असताना घरातील विद्युत उपकरणांचा वापर
शक्यतो टाळावा. शेतकऱ्यांनी कापणी केलेली पिके
सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा ताडपत्रीने झाकून ठेवावीत. पाळीव
प्राण्यांना सुरक्षित गोठ्यात बांधावे. वाहनचालकांनी पावसाच्या वेळी वाहन चालवताना वेग मर्यादित ठेवावा आणि सुरक्षित
ठिकाणी वाहन उभे करावे. असेही कळविले आहे.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment