Wednesday, 25 March 2026

पीडित कुटुंबांना मिळाला शासकीय सेवेचा आधार जिल्हाधिकारी आशिमा‍ मित्तल यांच्या हस्ते 8 वारसांना नियुक्तीपत्रे प्रदान

 


 

जालना, दि.25 (जिमाका) :-  अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (ॲट्रॉसिटी) दाखल झालेल्या गंभीर प्रकरणांतील दिवंगत व्यक्तींच्या वारसांना शासनाने मोठा दिलासा दिला आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयानुसार जालना जिल्ह्यातील अशा 8 पात्र वारसांची शैक्षणिक अर्हतेनुसार वर्ग-4 पदावर निवड करण्यात आली आहे. बुधवार दि.25 मार्च 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित एका विशेष कार्यक्रमात या लाभार्थ्यांना नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात आले, ज्यामुळे संघर्षानंतर या कुटुंबांना हक्काचा आधार मिळाला आहे.

जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीच्या शिफारशीनुसार, सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, शासकीय वसतिगृहे आणि निवासी शाळांमधील रिक्त पदावर या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये शारदा मांदळे (पहारेकरी), संगिता रंजवे (शिपाई), रमा लाटे (पहारेकरी), साईनाथ कसारे (शिपाई), साईनाथ जाधव (सफाईगार), विशाल खरात (शिपाई), दिपक जाधव (शिपाई) आणि पंकज पाटोळे (शिपाई) या आठ जणांचा समावेश आहे. आपल्या कुटुंबातील कर्ता व्यक्ती गमाविल्याचे दुःख बाजूला सारून शासकीय सेवेच्या माध्यमातून सन्मानाने जगण्याची नवी उमेद या वारसांच्या चेहऱ्यावर यावेळी दिसून आली. तसेच सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून घेतलेला हा निर्णय पीडित कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी महत्त्वाचा टप्पा असल्याचे दिसून येत आहे.

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल आणि अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ यांच्या हस्ते हे नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी नवनियुक्त उमेदवारांचे अभिनंदन करत त्यांना भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व प्रशासकीय कामात सचोटीने योगदान देण्याचे आवाहन केले. याप्रसंगी विशेष अधिकारी स्नेहल मोदाळे, समाजकल्याण निरीक्षक अनिल सुनगत यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

 

-*-*-*-*-

वृत्त क्र. 131                                                                  दि. 25 मार्च, 2026

 

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या

 थेट कर्ज योजनेसाठी 30 मार्च रोजी लॉटरीने निवड

 

जालना, दि.25 (जिमाका) :-  साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या थेट कर्ज योजनेच्या प्रतीक्षेत असलेल्या अर्जदारांमधून जालना जिल्हा कार्यालयामार्फत लाभार्थ्यांची अंतिम निवड आता लॉटरी पद्धतीने केली जाणार आहे.  ही निवड प्रक्रिया निवासी उपजिल्हाधिकारी तथा लाभार्थी निवड समितीचे अध्यक्ष शशिकांत हदगल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे.   हा कार्यक्रम दि. 30 मार्च 2026 रोजी दुपारी 12 वाजता जालना येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात संपन्न होणार आहे.

महामंडळाच्या जालना जिल्हा कार्यालयाला मुख्यालयाकडून एकूण 40 लाभार्थ्यांचे उद्दिष्ट प्राप्त झाले होते. या योजनेसाठी स्थानिक प्रसारमाध्यमांतून प्रसिद्धी दिल्यानंतर जिल्हाभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्राप्त झालेल्या एकूण 162 अर्जांची छाननी केल्यानंतर, त्यापैकी 144 अर्ज पात्र ठरले असून 18 अर्ज तांत्रिक कारणास्तव अपात्र ठरविण्यात आले आहेत. पात्र ठरलेल्या या 144 उमेदवारांमधून केवळ 40 लाभार्थ्यांची निवड पारदर्शकपणे लॉटरी पद्धतीने केली जाईल. निवडीमध्ये पूर्ण पारदर्शकता राहावी, यासाठी ही जाहीर सोडत काढण्यात येणार आहे. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.), डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, जालना येथे  अर्जदारांच्या उपस्थितीत ही पारदर्शक निवड प्रक्रिया पार पडणार आहे. तरी निवड प्रक्रियेवेळी पात्र अर्जदारांनी वेळेवर उपस्थित राहावे. असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक आर.एन.पवार यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-

 

वृत्त क्र. 132                                                                दि. 25 मार्च, 2026

 

 

जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समिती बैठक संपन्न

 

            जालना, दि.25 (जिमाका) : जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या वाढत्या गैरवापराला आळा घालण्यासाठी जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीची बैठक आज अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ यांच्या अध्यक्षेत संपन्न झाली.

यावेळी बैठकीस जिल्हा रुग्णालयाचे डॉ. पी. एम. कुलकर्णी, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे संजय ताकवाले, कृषी अधीकारी सचिन पांचाळ, समाज कल्याण विभागाचे एल.बी. बारगिरे सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासनचे जीवन जाधव, नायब तहसिलदार शैलेश राजमाने, पोलीस निरिक्षक पंकज जाधव, सपोनि सचिन इंगेवाड यांची उपस्थिती होती.

जिल्हास्तरीय बैठकीत अमंली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीच्या माध्यमातून विविध विभागांना समन्वयाने काम करण्याचे निर्देश देत अपर जिल्हाधिकारी श्री. मिसाळ म्हणाले की, अवैध पद्धतीने गावठी दारू व अमली पदार्थांची निर्मिती व विक्री रोखण्यासाठी कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर पोलिसांनी तातडीने कारवाई करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत, असे स्पष्ट करण्यात आले. तसेच महसूल विभागाने पोलीस कारवाई दरम्यान आवश्यक ती मदत करावी, असेही सांगण्यात आले. अन्न व औषध प्रशासनाला ग्रामीण भागातील वैद्यकीय दुकाने व दवाखान्यांवर नियमित तपासणी करून औषधांचा गैरवापर रोखण्याचे निर्देश देण्यात आले. विशेषतः ‘एच वन’ (H1) गटातील औषधांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच संबंधित दुकाने व डॉक्टरांचे परवाने रद्द करण्याबाबतही सूचना अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ यांनी दिल्या. शिक्षण विभागाने शाळा व महाविद्यालयांमध्ये अमली पदार्थांविरोधात जनजागृती मोहीम राबवावी, विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करावी, असे सांगण्यात आले. यासोबतच क्रीडा, आरोग्य व पोलीस विभागांनी संयुक्तपणे समुपदेशन व जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरवण्यात आले. जिल्ह्यातील नागरिकांनीही संशयास्पद हालचालींची माहिती प्रशासनाला देऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.

 

-*-*-*-*-

वृत्त क्र. 133                                                                 दि. 25 मार्च, 2026

 

जालना येथे 27 मार्च रोजी

रोजगार मेळाव्याचे आयोजन

जालना, दि.25 (जिमाका) :-  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना आणि हुतात्मा जनार्दनमामा नागापूरकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था , जालना यांच्या संयुक्त विद्यमानाने शुक्रवार, दि. 27 मार्च 2026 रोजी हुतात्मा जनार्दनमामा नागापूरकर शासकीय, जालना येथे सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत भव्य ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले आहे.

रोजगार मेळाव्याद्वारे विविध क्षेत्रांतील अंदाजे 200 पेक्षा अधिक रिक्त पदांवर भरती केली जाणार असून, यासाठी पाचवी ते दहावी उत्तीर्ण, बारावी, पदवीधर आणि आय.टी.आय.च्या सर्व ट्रेड्समधील पात्र उमेदवारांना रोजगाराची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या मेळाव्यात प्रामुख्याने फिल्ड असिस्टंट मॅनेजर, असिस्टंट ब्रांच मॅनेजर, कॅशियर, टेक्निशियन, ऑपरेटर, फिल्ड एक्झिक्युटिव्ह, हेल्पर, अप्रेन्टिस ट्रेनी आणि ए.सी.सी. मशीन ऑपरेटर यांसारख्या विविध पदांसाठी मुलाखती घेतल्या जाणार आहेत.

रोजगार मेळाव्यात एकूण 9 नामांकित कंपन्यांचे नियुक्ती अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित राहून पात्र उमेदवारांच्या चाचण्या व मुलाखती घेणार आहेत. यामध्ये जालना येथील खंडेलवाल ज्वेलर्स (15 पदे) व भारत फायनान्शियल इन्क्लुजन लि. (20 पदे), तसेच अभिनव इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (20 पदे) यांचा समावेश आहे. छत्रपती संभाजीनगरमधील बजाज ऑटो लि. (50 पदे), संजीव ऑटो लि. वाळूज (15 पदे), एंड्युरन्स टेक्नॉलॉजी लि. वाळूज (5 पदे) आणि धूत ट्रान्समिशन प्रा. लि. (30 पदे) या कंपन्या मोठ्या प्रमाणात पदभरती करणार आहेत. यासोबतच बजाज ऑटो लि. चाकण, पुणे (30 पदे) आणि एथर एनर्जी लि. बेंगलोर (15 पदे) या कंपन्यांचे प्रतिनिधीही भरती प्रक्रियेसाठी उपस्थित राहतील.

इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी किमान पाच प्रतींमध्ये आपला रिझ्युमे (बायोडाटा), मूळ शैक्षणिक कागदपत्रे, आधार कार्ड आणि सेवायोजन नोंदणीच्या छायाप्रतींसह सकाळी 9 वाजता मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित राहावे. ज्या उमेदवारांनी अद्याप सेवायोजन नोंदणी केलेली नाही, त्यांनी महास्वयंमच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.rojgar.mahaswayam.gov.in) किंवा केंद्र शासनाच्या (www.ncs.gov.in) पोर्टलवर नोंदणी करून जॉब फेअर पर्यायामध्ये जालना जिल्हा निवडावा. तेथे (स्पेशल जॉब फेअर- 6 (2025-26) जालना ) या लिंकवर क्लिक करून पात्रतेनुसार पदांसाठी अप्लाय करणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्जासाठी किंवा इतर कोणत्याही तांत्रिक अडचणीसाठी कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक ०२४८२-२९९०३३ वर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग, जालना यांनी केले आहे.

-*-*-*-*-

वृत्त क्र. 134                                                                  दि. 25 मार्च, 2026

 

भारतीय सशस्त्र दलात अधिकारी होण्याची सुवर्णसंधी;

नाशिक येथे 10 दिवसांचे मोफत पूर्व प्रशिक्षण

 

जालना, दि.25 (जिमाका) :-  भारतीय सैन्यदल, नौदल आणि वायुदलात अधिकारी पदावर भरती होऊन देशसेवेचे स्वप्न पाहणाऱ्या महाराष्ट्रातील युवक-युवतींसाठी महाराष्ट्र शासनाने प्रशिक्षणाचे द्वार खुले केले आहे. नाशिक येथील छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र येथे दि.4 मे ते 13 मे 2026 या कालावधीत एसएसबी कोर्स क्र. 65 चे आयोजन करण्यात आले आहे.  तरी यासाठी जालना जिल्ह्यातील पात्र उमेदवारांच्या मुलाखती दि.24 एप्रिल 2026 रोजी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जालना येथे आयोजित करण्यात आल्या आहेत.

निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींना 10 दिवसांच्या या कोर्समध्ये तज्ज्ञांमार्फत सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड  परीक्षेची सखोल पूर्वतयारी करून घेतली जाईल. विशेष म्हणजे प्रशिक्षण कालावधीत प्रशिक्षणार्थींना निःशुल्क प्रशिक्षण, निवास आणि भोजनाची सोय शासनातर्फे करण्यात आली आहे. जालना जिल्ह्यातील इच्छूक उमेदवारांनी दि.24 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जालना येथे मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे. उमेदवारांनी येताना सैनिक कल्याण विभाग, पुणे  यांच्या संकेतस्थळावरून एसएसबी-65 कोर्सचे प्रवेशपत्र आणि परिशिष्टांची प्रिंट पूर्ण भरून सोबत आणणे अनिवार्य आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक यांच्या ०२५३-२४५१०३२ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा ९१५६०७३३०६ या व्हॉट्सॲप क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जालना यांनी केले आहे.

-*-*-*-*-

वृत्त क्र. 135                                                                  दि. 25 मार्च, 2026

 

जिल्ह्यात डिजिटल जनगणनेचा बिगुल;

हलगर्जीपणा केल्यास कठोर कारवाई

 

जालना, दि.25 (जिमाका) :-  जिल्ह्यात आगामी ‘जनगणना 2027’ च्या पूर्वतयारीला वेग आला असून पहिल्या टप्प्यातील घर सूचीकरण आणि गृहनिर्माण गणनेचे काम लवकरच सुरू होणार आहे.  जनगणना हे राष्ट्रीय महत्त्वाचे काम आहे. यात कोणतीही हलगर्जी खपवून घेतली जाणार नाही. तरी कामात कसूर करणाऱ्यांवर जनगणना अधिनियम 1948 व 1990 मधील तरतुदींनुसार कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा जनगणना अधिकारी शशिकांत हदगल यांनी दिली आहे.

दि.24 मार्च 2026 रोजी पार पडलेल्या महत्त्वपूर्ण व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठकीत जनगणनेच्या नियोजनाचा आढावा घेण्यात आला. ही संपूर्ण प्रक्रिया डिजिटल स्वरूपाची असल्याने त्यात पारदर्शकता आणि अचूकतेवर भर देण्यात आला आहे. जिल्ह्यातील क्षेत्रीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण जिल्हाधिकारी कार्यालयातील महसुल भवन येथे आयोजित करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण 6 ते 8 एप्रिल आणि 9 ते 11 एप्रिल 2026 या दोन टप्प्यांत पार पडणार आहे. सर्व नियुक्त कर्मचारी, पर्यवेक्षक आणि प्रगणक यांची नोंदणी C.M.M.S. पोर्टलवर करणे बंधनकारक आहे. एकदा नोंदणी झाल्यानंतर जनगणनेचे काम पूर्ण होईपर्यंत त्यात कोणताही बदल करता येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.  कर्मचाऱ्यांचे मोबाईल क्रमांक, ई-मेल आणि पॅन कार्ड क्रमांक अत्यंत अचूक असणे आवश्यक आहे. संपूर्ण प्रणाली ओटीपी आधारित असल्याने माहितीतील छोटीशी चूकही प्रक्रियेत अडथळा ठरू शकते.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment