जालना,दि.12 (जिमाका) : राज्य शासनाच्या वतीने 65 वर्षांवरील रिक्षा व मीटर
टॅक्सी परवानाधारक चालकांसाठी धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळाची स्थापना
करण्यात आली असून, पात्र चालकांसाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली
आहे. पात्र रिक्षा व मीटर टॅक्सी चालकांनी https://ananddighekalyankarimandal.org
या संकेतस्थळावर जावून ऑनलाइन नोंदणी करावी. ही नोंदणी मोबाईलद्वारे घरबसल्या
किंवा कोणत्याही सायबर कॅफेमधून करता येणार आहे. अर्ज भरताना काही अडचण आल्यास उप
प्रादेशिक परिवहन कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या मदत कक्षाशी संपर्क साधावा,
असेही कळविण्यात आले आहे.
या योजनसाठी चालक हा महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासी
असावा. तसेच त्याच्याकडे किमान पाच वर्षांपूर्वीचा परवाना असणे आवश्यक आहे. रिक्षा
किंवा मीटर टॅक्सी चालवत असताना त्याच्याकडे कोणतेही चारचाकी वाहन नसावे, अशी अटही
ठेवण्यात आली आहे.
या कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून रिक्षा व मीटर
टॅक्सी परवानाधारक चालकांना सामाजिक सुरक्षा व विविध कल्याणकारी योजनांचा लाभ
देण्यात येणार आहे. 65 वर्षांवरील सभासद चालकांना निवृत्ती सन्मान योजनेअंतर्गत
सन्मान निधी दिला जाणार असून, चालकांसाठी विमा व आरोग्य योजनाही राबविण्यात येणार
आहेत.
तसेच चालकांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती योजना
राबविण्यात येणार असून, कर्तव्यावर असताना चालकास दुखापत झाल्यास कल्याणकारी
मंडळामार्फत आर्थिक सहाय्यही करण्यात येणार आहे. पात्र चालकांनी या योजनेचा लाभ
घ्यावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जालना यांनी केले आहे.
-*-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment