Tuesday, 24 March 2026

जिल्हा निर्देशांकात जालना जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

 


 

  • राज्यात प्रथम क्रमांकाने सन्मानित
  • जिल्हा प्रशासनातील गुणवत्ता व उत्कृष्टतेचा सन्मान

 

जालना, दि.24 (जिमाका) :-  दै. लोकसत्ताच्या जिल्हा निर्देशांक या उपक्रमाचे यंदा चौथे  वर्ष असून सांख्यिकी विभागाकडे असलेल्या तपशिलाच्या आधारे पुणे येथील विख्यात गोखले अर्थशास्त्र संस्थेकडून विविध जिल्ह्याच्या कामगिरीचे विश्लेषण केले गेले. त्यानूसार जालना जिल्ह्याने विविध विकास निर्देशांकाबाबत प्रथम क्रमांक नोंदविला आहे. त्यानूसार जालना जिल्ह्याने उत्कृष्ट कामगिरी करत ‘गट-1’ मध्ये राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या कार्यक्रमाचे आयोजन दि.20 मार्च 2026 रोजी हॉटेल ताज विवांता मुंबई येथे करण्यात आले होते. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध निकषांवर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांचा सत्कार केला.

विशेषतः प्रशासकीय गतिमानता आणि लोककल्याणकारी योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्यात जिल्हा प्रशासनाला मोठे यश आले आहे. या लक्षणीय यशाबद्दल जिल्ह्याचा विशेष सन्मान करण्यात आला असून जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी हा मानाचा पुरस्कार व सन्मानचिन्ह स्वीकारले आहे. या यशाबद्दल बोलताना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल म्हणाल्या की, हा बहुमान जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी, कर्मचारी आणि जिल्ह्यातील जनतेच्या सांघिक प्रयत्नांचे फळ आहे. भविष्यातही जालना जिल्ह्याला विकासाच्या बाबतीत अग्रस्थानी ठेवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. जालना जिल्ह्याला मिळालेल्या या गौरवामुळे सर्व स्तरातून प्रशासनाचे कौतुक होत असून मराठवाड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

-*-*-*-*-

वृत्त क्र. 128                                                                   दि. 24 मार्च, 2026

 

6 एप्रिल रोजी  लोकशाही दिनाचे आयोजन

जालना, दि. 24  (जिमाका) :-   जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन महिन्याचे पहिल्या सोमवारी करण्याबाबत निर्देश आहेत. तरी जालना जिल्ह्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवार दि. 6  एप्रिल 2026  रोजी सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

लोकशाही दिनाकरीता अर्जदार यांनी अर्ज विहीत नमुन्यात 15 दिवस आधी 2 प्रतीत पाठवणे आवश्यक आहे. या लोकशाही दिनामध्ये अर्ज देताना त्यांनी संबंधित तालुक्यातील तिसऱ्या सोमवारी तालुकास्तरीय लोकशाही दिनामध्ये अर्ज दिलेला असावा व या तालुकास्तरीय लोकशाही दिनात एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी होऊन देखील कोणतीही कार्यवाही झाली नाही, अशाच अर्जदाराने टोकन क्रमांकाच्या पावतीसह विहीत नमुन्यात दोन प्रतीमध्ये अर्ज सादर करावा. ज्या अर्जदाराने तालुकास्तरीय लोकशाही दिनात भाग घेतला नाही, अशा अर्जदाराचे अर्ज स्विकारले जाणार नाहीत, असे जिल्हाधिकारी कार्यालय जालना यांचे कार्यालयाकडुन सुचित करण्यात येत आहे. लोकशाही दिनात न्याय प्रविष्ट प्रकरणे, राजस्व,अपील, सेवाविषयक आस्थापनाविषयक बाबी, विहीत नमुन्यात नसणारे व त्यासोबत आवश्यक त्या कागदपत्राच्या प्रती न जोडलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. तालुकास्तरीय लोकशाही दिनातील टोकन क्रमांकाशी तहसीलदार यांच्या स्वाक्षरीची पोच पावती तसेच त्यासाठी दिलेल्या मुदतीत व नमुन्यात ज्यांनी यापुर्वीच्या आवश्यक कागदपत्रासह अर्ज केले असतील त्यांना तक्रार मांडता येईल. ज्यांनी त्यापुर्वी जिल्हास्तरावरील लोकशाही दिनी तक्रार अर्ज दिलेला आहे. परंतु अद्याप कार्यवाही झालेली नाही, अशा तक्रारदारांनी पुन्हा अर्ज करु नये. तसेच लोकशाही दिन विहीत नमुन्याचा अर्ज  http://jalna.nic.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. असेही कळविले आहे.

-*-*-*-*-

वृत्त क्र. 129                                                                   दि. 24 मार्च, 2026

 

नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन मेळावा उत्साहात संपन्न

जालना, दि. 24  (जिमाका) :-   स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी आणि नवउद्योजकांच्या अडचणी सोडवण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना आणि ‘दे आसरा’ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयात नवउद्योजकांसाठी विशेष उद्योजक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. दि. 24 मार्च 2026 रोजी पार पडलेल्या या मेळाव्यात जिल्ह्यातील सूक्ष्म व अतिसूक्ष्म उद्योजकांनी उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

महाराष्ट्र राज्यात सूक्ष्म उद्योग हे रोजगाराचे महत्त्वाचे साधन आहेत. मात्र, आधुनिक तंत्रज्ञान, डिजिटल मार्केटिंग आणि वित्तीय व्यवस्थापन अशा क्षेत्रांत उद्योजकांना अनेकदा अडचणी येतात. या मेळाव्याचा मुख्य उद्देश उद्योजकांना या विषयांवर मार्गदर्शन करणे आणि त्यांच्यातील नेटवर्किंग वाढवणे हा होता. सहायक आयुक्त गणेश चिमणकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. ‘दे आसरा’ फाउंडेशनच्या वतीने राहुल लिमये यांनी ‘मार्केटिंग तंत्र’ या विषयावर, तर किरण धगे यांनी ‘उद्योजकतेची वाटचाल’ या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. तसेच स्नेहा नन्नवरे यांनीही उपस्थित नवउद्योजकांशी संवाद साधून मोलाच्या टिप्स दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल परिहार यांनी केले तर आभार भुजंग रिठे यांनी मानले. या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी कौशल्य विकास विभागाचे अमोल बोरकर, आत्माराम दळवी,  प्रदीप डोळे,  नितीन लोकडे, रविंद्र पाडमुख,  विशाल जगरवाल,  योगेश बहुरे,  दीपक पालवे व  गणेश सुपारकर यांनी विशेष परिश्रम घेतले. असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

 

 

No comments:

Post a Comment