Friday, 27 March 2026

शनिवारी जिल्ह्यातील चार मंडळात समाधान शिबिराचे आयोजन

 


 

जालना, दि.27 (जिमाका) :- जिल्ह्यातील नागरिकांच्या महसुली तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यासाठी आणि विविध शासकीय सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाच्या आदेशानुसार ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अभियान (टप्पा क्र. 1) राबविण्यात येत आहे. मार्च ते मे 2026 या कालावधीत तालुक्यातील विविध मंडळामध्ये या विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून याद्वारे प्रशासकीय सेवा थेट जनतेच्या दारात पोहोचवण्याचा मानस प्रशासनाने व्यक्त केला आहे.

या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र जमीन महसूल संहितेअंतर्गत प्रलंबित नोंदी अद्ययावत करणे, डिजिटल सेवा पोर्टलवरील प्रकरणांचा निपटारा करणे आणि ‘सिंगल डे सर्व्हिस डिलिव्हरी’ अंतर्गत तातडीने दाखले व सेवा देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. महसुली अडचणींमुळे अडकलेली सर्वसामान्यांची कामे या शिबिरांच्या माध्यमातून मार्गी लागणार असल्याने ग्रामीण भागातील जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे.

कार्यक्रमानुसार, शनिवार दि. 28 मार्च 2026 रोजी सकाळी 10 वाजता जिल्ह्यातील चार महत्त्वाच्या मंडळामध्ये ही शिबिरे पार पडणार आहेत. यामध्ये जालना तालुक्यातील विरेगाव मंडळातील साळेगव्हाण महादेव मंदिर, बदनापूर तालुक्यातील सेलगाव मंडळात जि.प. शाळा सेलगाव, अंबड तालुक्यातील वडीगोद्री मंडळातील श्री. गुरुदेव विद्यामंदिर वडीगोद्री आणि भोकरदन तालुक्यातील हसनाबाद मंडळातील मारोती मंदिर हसनाबाद या ठिकाणांचा समावेश आहे. नागरिकांनी आपल्या कामांशी संबंधित आवश्यक कागदपत्रासह या शिबिरांना मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांनी केले आहे.

 -*-*-*-*-

वृत्त क्र. 138                                                                   दि. 27 मार्च, 2026

 

जालना जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल पुरवठा सुरळीत; विक्रीवरील मर्यादा रद्द

-         जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधर

 

जालना,दि.27(जिमाका) :- जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे स्पष्ट करत जिल्हाधिकारी कार्यालय, जालना (पुरवठा विभाग) यांनी इंधन विक्रीवरील पूर्वीचे निर्बंध रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधर यांनी 27 मार्च 2026 रोजी जारी केलेल्या आदेशानुसार, सोशल मिडियावर पसरलेल्या अफवांमुळे पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी होत होती. त्यामुळे मागणी व पुरवठा यामध्ये काही काळ समस्या निर्माण झाली होती. ही परिस्थिती लक्षात घेऊन 25 मार्च, 2026 रोजी पेट्रोल व डिझेल विक्रीवर काही मर्यादा घालण्यात आल्या होत्या. मात्र, सद्यस्थितीत जिल्ह्यातील BPCL, IOCL, HPCL तसेच इतर कंपन्यांकडून पुरेसा इंधन साठा उपलब्ध झाल्याने आता परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आली आहे. त्यामुळे इंधन वितरणावर निर्बंध ठेवण्याची गरज उरलेली नाही, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. यामुळे 25 मार्च रोजी जारी करण्यात आलेला पेट्रोल-डिझेल विक्रीवरील मर्यादेचा आदेश तत्काळ प्रभावाने रद्द करण्यात आला आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता आवश्यक तेवढेच इंधन घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. दरम्यान, या आदेशाची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी पोलिस विभाग, तहसीलदार, तेल कंपन्यांचे अधिकारी तसेच पेट्रोल पंप चालकांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. याबाबत जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी परिस्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

****

वृत्त क्र. 139                                                                   दि. 27 मार्च, 2026

 

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

 

       जालना, दि. 27 (जिमाका) :- जिल्ह्यात दि.31 मार्च रोजी भगवान महावीर जयंती, 2 एप्रिलला हनुमान जन्मोत्सव, 3 एप्रिल रोजी गुड फ्रायडे तसेच छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी आणि 5  एप्रिल रोजी इस्टर संडे या सण, उत्सव आणि आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था, सार्वजनिक शांतता व सुरक्षितता राखण्यासाठी मुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1) (3) अन्वये जालना जिल्ह्याच्या संपूर्ण हद्दीत दि.1 जानेवारी 2026 पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी करण्यात आली आहे, असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी  शशिकांत हदगल यांनी जारी केले आहेत.   

           संपूर्ण जालना जिल्ह्याच्या हद्दीत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश 6 एप्रिल 2026 रोजीच्या 24 वाजेपर्यंत लागू राहील. या आदेशान्वये शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या, लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल, अशी कोणतीही वस्तू सोबत बाळगता येणार नाही. व्यक्तीचे प्रेते, आकृत्या व प्रतिमा यांचे प्रदर्शन करता येणार नाही. जाहीरपणे घोषणा, गाणे म्हणणे, वाद्य वाजविणे यास प्रतिबंध राहील. तसेच कोणत्याही रस्त्यांवर किंवा कोणत्याही एका ठिकाणी पाच किंवा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास किंवा मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आली आहे. हा आदेश अधिकारी- कर्मचाऱ्यांना तसेच उपविभागातील पोलिस अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणूका, सभा, मोर्चा यांना लागू राहणार नाही, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

-*-*-*-*-

वृत्त क्र. 140                                                                   दि. 27 मार्च, 2026

 

‘अमृत पेठ-2026’ उद्योजक मेळाव्याचे आयोजन

 

जालना, दि. 27 (जिमाका) :- स्थानिक कारागिरांच्या कौशल्याला दाद देण्यासाठी आणि स्वदेशी उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृतकडून जालन्यात ‘अमृत पेठ 2026’ या भव्य उद्योजक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 11 आणि 12 एप्रिल 2026 रोजी महेश भवन, गुरु बच्चन चौक, मंठा चौफुली, जालना येथे थेट उत्पादकांकडून दर्जेदार वस्तू खरेदी करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.

स्वदेशी वस्तूंच्या वापराला चालना देणे हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र शासनाच्या अमृत संस्थेने हे पाऊल उचलले आहे. या मेळाव्यात स्थानिक उद्योजक, महिला बचत गट तसेच नवउद्योजकांनी तयार केलेल्या विविध उत्पादनांचे स्टॉल थाटले जाणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने घरगुती उत्पादने, आकर्षक हस्तकला वस्तू, खमंग खाद्यपदार्थ, तयार कपडे आणि दैनंदिन वापराच्या वैविध्यपूर्ण वस्तूंचा समावेश असेल. स्वदेशी बाजारपेठ या संकल्पनेवर आधारित हा मेळावा सर्वांसाठी खुला असून, जालनाकरांनी आपल्या कुटुंबीय आणि मित्रपरिवारासह या उपक्रमाला भेट द्यावी. स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन देऊन स्वदेशीचा संकल्प अधिक दृढ करावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी नागरिकांनी ७३९१०६५४७४ किंवा ९४२१९४४७५२ या क्रमांकावर संपर्क साधावा. असे जिल्हा व्यवस्थापक, अमृत कार्यालय, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

 

 

No comments:

Post a Comment