Wednesday, 18 February 2026

शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रम उत्साहात संपन्न शिवरायांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प करावा - महापौर वंदना मगरे

 

शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रम उत्साहात संपन्न

शिवरायांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प करावा

-         महापौर वंदना मगरे

 

चिमुकल्यांना शिवरायांच्या वेशभूषेत पाहून मनाला विशेष समाधान

-         उपमहापौर राजेश राऊत

 

·         शाहिरी कडाडली आणि अंगावर शहारे उमटले..!

·         गुरुवारी शाहिरी शिवदर्शन

 

 

जालना, दि.18 (जिमाका) :- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून जालना शहरात दि.18 आणि 19 फेब्रुवारी 2026 रोजी भव्य सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्यात शिवरायांच्या जाज्वल्य इतिहासाचा जागर होणार आहे. या कार्यक्रमांच्या माध्यमातून शिवकालीन इतिहास पुन्हा एकदा जिवंत करण्याचा प्रयत्न आहे. जालनेकरांनी या दोन दिवसीय सांस्कृतिक मेजवाणीचा लाभ घ्यावा. तसेच आजच्या पिढीने शिवरायांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प करावा, असे प्रतिपादन महापौर वंदना मगरे यांनी केले आहे.

सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई व जिल्हाधिकारी कार्यालय जालना यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दि. 18 व 19 फेब्रुवारी, 2026 रोजी जालना येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्य कर्तृत्व व  शौर्यावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमांचे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, टाऊन हॉल, जालना येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, अतिरिक्त आयुक्त अर्जुन गिराम, उपविभागीय अधिकारी रामदास दौंड, उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे, उपजिल्हाधिकारी मनिषा दांडगे, शिवजन्मोत्सव सोहळा अध्यक्ष विश्वंभर तिरुखे,  सामाजिक कार्यकर्ते अरविंद देशमुख, अशोक पडूळ, किशोर मरकड, तहसीलदार छाया पवार, नायब तहसीलदार तुषार निकम यांची प्रमुख उपस्थिती होती.

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे ऊर्जास्थान आहेत. जालना शहरात पूर्वी जेव्हा वाहने नव्हती, तेव्हा शिवजयंतीची मिरवणूक मोठ्या उत्साहात बैलगाडीतून निघत असे. आज काळ बदलला आहे, तंत्रज्ञान प्रगत झाले आहे. आता मोटारगाड्या आणि आधुनिक वाजंत्रीसह मिरवणुका निघतात. काळानुसार साजरीकरणाची पद्धत बदलली असली, तरी शिवरायांवरील निष्ठा तीच आहे. जयंतीच्या उत्सवापुरते मर्यादित न राहता, महापुरुषांचे उदात्त विचार समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे ही काळाची गरज आहे. आजच्या सोहळ्यात चिमुकल्यांना शिवरायांच्या वेशभूषेत पाहून मनाला विशेष समाधान वाटत आहे. अशा संस्कारांतूनच उद्याची पिढी घडणार आहे. असे प्रतिपादन उपमहापौर राजेश राऊत यांनी केले.

यावेळी बोलताना निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांनी आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली. छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य आणि त्यांचे विचार आजच्या पिढीला प्रेरणा देणारे आहेत. या महान कार्याचे स्मरण व्हावे आणि तो वारसा जपला जावा, याच मुख्य हेतूने या दोन दिवसीय कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे, असे त्यांनी नमूद केले. त्यांनी यावेळी शिवरायांना अभिवादन करत सर्व जालनेकरांना शिवजयंतीच्या मनापासून शुभेच्छा दिल्या. गुरुवार दि.19 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध शाहीर रामानंद उगले यांच्या शाहिरी शिवदर्शन या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमातही शिवरायांच्या शौर्याच्या अनेक गाथा मांडल्या जाणार असल्याने जालनेकरांनी या कार्यक्रमालाही मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

 

‘जागर शिवशाहीचा’ सादरीकरणाने जालनेकर भारावले;

शाहिरी कडाडली आणि अंगावर शहारे उमटले..!

 

बुधवार दि.18 फेब्रुवारी रोजी शाहीर अजिंक्य लिंगायत व त्यांच्या 11 कलावंतांनी सादर केलेल्या ‘जागर शिवशाहीचा’ या कार्यक्रमाने जालनेकरांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.  डफावर थाप पडली, तुणतुण्याचा सूर छेडला गेला आणि ‘छत्रपती शिवाजी महाराज, तुम्ही घ्या मानाचा मुजरा...’ या ललकारीने टाऊन हॉलचा परिसर शिवमय झाला.

छत्रपती शिवरायांच्या बाललीलांचे वर्णन करणाऱ्या ‘गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या’ या शिवपाळण्याने उपस्थितांच्या मनाचा ठाव घेतला. कार्यक्रमाचा परमोच्च बिंदू ठरला तो ‘छत्रपती शिवाजी जाहले’ हे शिवराज्याभिषेक गीत. या गीतावेळी शाहिरांचा बुलंद आवाज आणि वाद्यांची साथ यामुळे अंगावर रोमांच उभे राहिले. कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक गोंधळाने झाली. ‘गोंधळाला ये...’ आणि ‘दार उघड बया आता दार उघड...’ या गीतांनी सभागृहात चैतन्य निर्माण केले. केवळ गाणीच नव्हे, तर विस्मृतीत चाललेल्या ‘तुमडी’ या कलाप्रकाराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ‘लग्नाला चला तुम्ही लग्नाला चला’ या गाण्यासोबतच कलाकारांनी सादर केलेली युद्धकला आणि लढतीची प्रात्यक्षिके पाहून प्रेक्षक थक्क झाले. महापौर वंदना मगरे आणि उपमहापौर राजेश राऊत यांच्या उपस्थितीत रंगलेल्या या सोहळ्यात शाहिरी परंपरेतून शिवरायांचे शौर्य मांडण्यात आले.

प्रत्येक पोवाड्यागणिक सभागृहात होणारा ‘जय भवानी, जय शिवाजी’ जयघोष वातावरणात नवचैतन्य निर्माण करत होता. तर सुरातून उलगडणारा शिवरायांचा देदीप्यमान इतिहास अनुभवण्यासाठी जालनेकरांनी सभागृहात गर्दी केली होती.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्‍त त्यांच्या कार्यकतृत्वावर व शौर्यावर आधारीत सांस्कृतिक कार्यक्रमाचे  मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन उदघाटन करण्यात आले.

गुरुवारी शाहिरी शिवदर्शन

गुरुवार दि.19 फेब्रुवारी 2026 रोजी जालना टाऊन हॉल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात झी मराठी, सोनी मराठी आणि कलर्स मराठी फेम टीव्ही स्टार प्रसिध्द शाहिर  रामानंद उगले, माधवी उगले-माळी, शाहीर अप्पासाहेब उगले आणि 16 सहकलावंताचा समुह  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारीत बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम शाहिरी शिवदर्शन सादर करणार आहेत.

-*-*-*-*-

 

No comments:

Post a Comment