Thursday, 5 February 2026

जालना जिल्ह्यातील नागरिकांसाठी RBI कडून बँकिंग तक्रार निवारणाची सुविधा

 


जालना, दि.६(जिमाका): अलीकडील काळात जालना जिल्ह्यात बँकिंग व्यवहारांशी संबंधित तक्रारी, गैरसमज आणि काही अप्रिय घटना समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांना बँकिंग तक्रार निवारण व्यवस्थेबाबत स्पष्ट व अधिकृत माहिती मिळावी यासाठी जिल्हा अग्रणी बँकेकडून प्रसिद्धी करण्यात आली आहे.

बँकिंग व्यवहारांबाबत कोणतीही तक्रार असल्यास नागरिकांनी प्रथम संबंधित बँकेच्या अंतर्गत तक्रार निवारण यंत्रणेकडे (Internal Grievance Redressal Mechanism) तक्रार दाखल करावी. प्रत्येक बँकेच्या शाखा परिसरात तसेच RBI बँकिंग ओम्बुड्समनबाबत तपशील ठळकपणे प्रदर्शित केलेले असतात.

तक्रार दाखल केल्यानंतर ३० दिवसांत समाधानकारक उत्तर न मिळाल्यास नागरिकांना थेट भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) एकात्मिक बँकिंग ओम्बुड्समन योजनेअंतर्गत तक्रार नोंदवता येते. यासाठी जिल्हा प्रशासन किंवा इतर शासकीय कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही.

RBI बँकिंग ओम्बुड्समन योजनेअंतर्गत एटीएम व्यवहार, खात्यातील चुकीची कपात, कर्ज व व्याजदर, चेक, डिजिटल फसवणूक, सेवा शुल्क, पेन्शन व विमा इत्यादी तक्रारींचे निवारण केले जाते. तसेच संबंधित यंत्रणेला दंडात्मक कारवाई करण्याचा आणि तक्रारदार ग्राहकांना नुकसानभरपाई देण्याचा अधिकार आहे.

नागरिक खालील माध्यमांतून तक्रार दाखल करू शकतात:

* RBI Complaint Management System (CMS) पोर्टल: https://cms.rbi.org.in,

* ई-मेल: crpc@rbi.org.in

RBI कडील तक्रार निवारण सेवा पूर्णतः मोफत, ऑनलाइन आणि पारदर्शक असून, तक्रारींचा पाठपुरावा देखील ऑनलाइन पद्धतीने करता येतो. नागरिकांनी अफवा, गैरसमज किंवा आंदोलनाचा मार्ग न अवलंबता उपलब्ध अधिकृत तक्रार निवारण यंत्रणांचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक मंगेश केदार यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment