जालना, दि.24 (जिमाका):- जालनातील पारंपरिक कारागीर आणि
शिल्पकारांच्या हाताला हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी भारत सरकारच्या 'एमएसएमई'
मंत्रालय आणि महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने 'प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना प्रदर्शन व विक्री'
कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जुना जालना भागातील मस्तगढ येथील शितल गार्डन येथे दि.25 ते 27 फेब्रुवारी
2026 दरम्यान हे प्रदर्शन भरणार असून यात 50 हून अधिक वैविध्यपूर्ण स्टॉल्सचे आकर्षण
असणार आहे. तरी स्थानिक कारागिरांच्या मेहनतीला दाद देण्यासाठी आणि स्वदेशी उत्पादनांना
प्रोत्साहन देण्यासाठी जालना जिल्ह्यातील नागरिकांनी या प्रदर्शनाला मोठ्या संख्येने
भेट द्यावी, असे आवाहन एमएसएमई विकास कार्यालयाचे सहायक संचालक राहुलकुमार मिश्रा यांनी
आज पत्रकार परिषदेत केले.
प्रदर्शन विक्रीचे उदघाटन बुधवार, दि.25 फेब्रुवारी 2026
रोजी दुपारी 5 वाजता शितल गार्डन जालना येथे महापौर वंदना मगरे यांच्या हस्ते होणार
आहे. यावेळी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी
मिन्नू पी.एम., एमएसएमई विकास कार्यालयाचे सहायक संचालक राहुलकुमार मिश्रा यांची प्रमुख
उपस्थिती राहणार असून त्यांचे मार्गदर्शनही मिळणार आहे.
पंतप्रधान विश्वकर्मा योजनेतील लाभार्थ्यांच्या
उत्पादनांना थेट व्यासपीठ मिळवून देणे हा या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश आहे.
यामध्ये सुतार, लोहार, सुवर्णकार, कुंभार, मूर्तिकार, मोची, चटई, झाडू आणि खेळणी
निर्माते अशा विविध 18 प्रकारच्या पारंपरिक कारागिरांना आपली कला सादर करण्याची
आणि वस्तूंची थेट विक्री करण्याची नि:शुल्क
संधी देण्यात आली आहे. केवळ विक्रीच नव्हे, तर उद्योजकांना तांत्रिक बळ
देण्यासाठी या तीन दिवसांत ब्रँड नोंदणी
आणि बौद्धिक संपदा या विषयावर विशेष मार्गदर्शन सत्रे आयोजित करण्यात आली
आहेत. तसेच 26 फेब्रुवारी रोजी स्वयंरोजगार
कार्यशाळा आणि संध्याकाळी 'संगीत
संध्या' या सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद नागरिकांना घेता येईल. असेही
त्यांनी यावेळी सांगितले.
तीन दिवसीय प्रदर्शन सकाळी 11 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत
खुले असून सर्वांसाठी प्रवेश विनामूल्य राहणार आहे. जिल्हा अग्रणी बँकेचे
व्यवस्थापक मंगेश केदार, खादी व ग्रामोद्योग अधिकारी बी. के. वाघमारे, कौशल्य विकास विभागाचे अधिकारी
यांची यावेळी उपस्थिती होती. या उपक्रमाला
लघु उद्योग भारती आणि दलित भारतीय वाणिज्य एवं उद्योग चेंबर (डिक्की), भीम उद्योग अभियान,
अखिल भारतीय व्यापारी परिसंघ जालना ईकाईसह विविध व्यापारी संघटनांनी पाठिंबा
दर्शविला आहे.
-*-*-*-*-
वृत्त
क्र. दि. 24 फेब्रुवारी, 2026
शासकीय सेवा व योजनाच्या महामेळाव्याचे
आयोजन
जालना, दि.24 (जिमाका):- नागरिकांच्या
प्रलंबित शासकीय अडचणी सोडवण्यासाठी आणि विविध सरकारी योजनांचा लाभ थेट जनतेपर्यंत
पोहोचवण्यासाठी जालना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने पुढाकार घेण्यात आला
आहे. शनिवार दि.28 फेब्रुवारी रोजी भोकरदन तालुक्यातील राजूर येथे भव्य 'शासकीय
सेवा व योजनांचा महामेळावा' आयोजित करण्यात आला आहे. या महामेळाव्यात महसूल, कृषी,
आरोग्य, शिक्षण, समाजकल्याण, पोलीस प्रशासन, महावितरण आणि परिवहन यासह किमान 30
विविध शासकीय विभागांचे स्टॉल्स उभारले जाणार आहेत. अशी माहिती
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव नितेश एम. बंडगर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली
आहे.
राजूर-भोकरदन रोडवरील पुण्याई लॉन्स येथे सकाळी 10 वाजता या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले
आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती तथा जालना
जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती अरुण आर.
पेडणेकर यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होईल. तर न्यायमूर्ती सुशील मनोहर घोडेस्वार यांची प्रमुख
उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र
न्यायाधीश वर्षा एम. मोहिते
असतील. कार्यक्रमास जिल्हाधिकारी आशिमा
मित्तल, पोलीस अधीक्षक अजय बन्सल,
प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष
बनसोडे, जिल्हा सरकारी अभियोक्ता अॅड.
बाबासाहेब इंगळे, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अॅड. अनिरुद्ध घुले पाटील आणि भोकरदन तालुका वकील संघाचे अध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील यांच्यासह अनेक
मान्यवर उपस्थित राहणार आहेत. असेही कळविले आहे.
-*-*-*-*-
वृत्त
क्र. दि. 24 फेब्रुवारी, 2026
2 मार्चला लोकशाही दिनाचे
आयोजन
जालना, दि. 24 (जिमाका) :- जिल्हास्तरीय लोकशाही
दिनाचे आयोजन महिन्याचे पहिल्या
सोमवारी करण्याबाबत निर्देश आहेत. तरी जालना जिल्ह्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवार दि. 2
मार्च 2026 रोजी सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
लोकशाही दिनाकरीता अर्जदार
यांनी अर्ज विहीत नमुन्यात 15 दिवस आधी 2 प्रतीत पाठवणे आवश्यक आहे. या लोकशाही दिनामध्ये अर्ज देताना
त्यांनी संबंधित तालुक्यातील तिसऱ्या सोमवारी तालुकास्तरीय लोकशाही दिनामध्ये अर्ज दिलेला
असावा व या तालुकास्तरीय लोकशाही दिनात एक महिन्यापेक्षा
जास्त कालावधी होऊन देखील कोणतीही कार्यवाही झाली नाही, अशाच अर्जदाराने टोकन क्रमांकाच्या
पावतीसह विहीत नमुन्यात दोन प्रतीमध्ये अर्ज सादर करावा. ज्या अर्जदाराने तालुकास्तरीय लोकशाही दिनात भाग घेतला नाही,
अशा अर्जदाराचे अर्ज स्विकारले जाणार नाहीत, असे जिल्हाधिकारी कार्यालय
जालना यांचे कार्यालयाकडुन सुचित करण्यात येत आहे. लोकशाही दिनात न्याय प्रविष्ट
प्रकरणे, राजस्व,अपील, सेवाविषयक आस्थापनाविषयक बाबी, विहीत नमुन्यात नसणारे व त्यासोबत
आवश्यक त्या कागदपत्राच्या प्रती न जोडलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. तालुकास्तरीय लोकशाही दिनातील टोकन क्रमांकाशी
तहसीलदार यांच्या स्वाक्षरीची पोच पावती तसेच त्यासाठी दिलेल्या मुदतीत व नमुन्यात
ज्यांनी यापुर्वीच्या आवश्यक कागदपत्रासह अर्ज केले असतील त्यांना तक्रार मांडता येईल.
ज्यांनी त्यापुर्वी जिल्हास्तरावरील लोकशाही दिनी तक्रार अर्ज दिलेला
आहे. परंतु अद्याप कार्यवाही झालेली नाही, अशा तक्रारदारांनी पुन्हा अर्ज करु नये.
तसेच लोकशाही दिन विहीत नमुन्याचा अर्ज http://jalna.nic.in या संकेतस्थळावर
उपलब्ध आहे. असेही कळविले आहे.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment