Monday, 23 February 2026

जिल्हाधिकारी कार्यालयात संत गाडगे बाबा महाराज यांना अभिवादन

 


 

जालना, दि.23 (जिमाका):-  थोर समाजसुधारक संत गाडगे  बाबा  महाराज  यांच्या जयंतीनिमित्त  आज जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे यांनी  संत गाडगे बाबा महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी नायब तहसीलदार सतीश तायडे, संपदा कुलकर्णी, दीपाली राऊत, सविता भोकरे,सविता पेरके, सविता मगरे, वैशाली ‍डिघोळे, विठ्ठल बोरकर, अतुल केदार, सुनिल काळूंके, अनिल हिवाळे, इंद्रजित नानोटे यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचाऱ्यांनी यावेळी संत गाडगे बाबा महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

-*-*-*-*-

वृत्त क्र.                                                                         दि. 23 फेब्रुवारी, 2026

 

मोफत तांत्रिक उद्योजकता प्रशिक्षणाचे आयोजन

 

जालना, दि.23 (जिमाका):-  डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने वेब डिझायनिग वर आधारित  एक महिना व १. सायबर सिक्युरिटी ॲण्ड डेटाबेस रिकव्हरी वर आधारित,  ॲनिमेशन  ॲण्ड ग्राफिक्सवर आधारित  दोन महिने कालावधीचे अनिवासी तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर प्रशिक्षण कार्यक्रमाचा मुख्य उद्देश हा की अनुसूचित जाती प्रवर्गातील युवक व  युवतींनी तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन स्वतःचा स्वयंरोजगार सुरू करावा किंवा या तांत्रिक माहितीच्या आधारे रोजगार मिळवावा. तरी इच्छुक व्यक्तींनी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र जालना येथे सुरेखा मोरे कार्यक्रम आयोजक, मो.9699334648 यांच्याशी संपर्क साधावा किंवा एमसीईडीच्या संकेतस्थळावर www.mced.co.in/Barti या लिंकवर जाऊन ऑनलाईन नोंदणी करावी 

   प्रशिक्षणात संबंधित विषयाचे प्रॅक्टिकलसह तांत्रिक ज्ञान तसेच उद्योजकीय ज्ञान जसे उद्योग उभारणी कशी करावी, शासकीय कर्जविषयक, अनुदान योजनांची माहिती, प्रकल्प अहवाल, विक्री कला, उद्योग व्यवस्थापन, उद्योगांना भेटी, कर कायदा लायसन याविषयीची माहिती इत्यादी बाबींविषयी तज्ञ मार्गदर्शकाद्वारे प्रशिक्षण दिल्या जाईल.  या प्रशिक्षणासाठी लाभार्थीची निवड प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. प्रशिक्षणासाठी लाभार्थी हा 18 ते 45 वयोगटातील असावा, तो अनुसूचित जाती प्रवर्गातील असावा, किमान दहावी  शिक्षण घेतलेले असावे, तो गेल्या पंधरा वर्षापासून महाराष्ट्राचा रहिवासी असावा तसेच स्वतःचा स्वयंरोजगार,  रोजगार करण्याची तयारी असावी. प्रवेश अर्जासोबत आधार कार्ड, फोटो, स्वतःचा जातीचा दाखला, अंतिम सत्र गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, रहिवासी दाखला जोडणे आवश्यक आहे. असेही महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

 

-*-*-*-*-

वृत्त क्र.                                                                         दि. 23 फेब्रुवारी, 2026

 

पाणीपट्टी थकविणाऱ्या ग्रामपंचायतींना आवाहन

 

जालना, दि.23 (जिमाका):-  जालना पाटबंधारे विभागांतर्गत विविध प्रकल्पांतून अनेक ग्रामपंचायतींना पिण्याच्या पाण्यासाठी पाणीपुरवठा केला जातो. मात्र या योजनांकडून पाणीपट्टी भरण्याबाबत सातत्याने टाळाटाळ केली जात असल्याचे समोर आले आहे. सध्या विभागाची 4 कोटी 85 लाख 63 हजार रुपयांची थकबाकी आहे. तरी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत योजनाधारकांनी सात दिवसांची अंतिम मुदतीत  आपली थकबाकी जमा करावी, असे कार्यकारी अभियंता एस. बी. कोरके यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम 1976 मधील भाग 6, कलम 49 (ज) नुसार कारवाई केली जाणार आहे. यामध्ये केवळ पाणीपुरवठाच नव्हे, तर संबंधित योजनेचा विद्युत पुरवठाही खंडित करण्यात येणार असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.

-*-*-*-*-

वृत्त क्र.                                                                         दि. 23 फेब्रुवारी, 2026

 

50 बचतगटांना मिनी ट्रॅक्टर वाटपासाठी आज निघणार लॉटरी

 

जालना, दि.23 (जिमाका):- अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील नोंदणीकृत स्वयंसहायता बचतगटांना मिनी ट्रॅक्टर वाटप करण्याच्या योजनेची जिल्हास्तरीय सोडत (लॉटरी) मंगळवार दि. 24 फेब्रुवारी 2026 रोजी जाहीर होणार आहे. जालना जिल्ह्यासाठी 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता 50 मिनी ट्रॅक्टरचे उद्दिष्ट प्राप्त झाले असून पात्र बचतगटांमधून लॉटरी पद्धतीने लाभार्थी निवडले जाणार आहेत. तरी पात्र ठरलेल्या बचतगटांमधील अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सचिव यांनी या निवड प्रक्रियेसाठी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त राजू एडके यांनी केले आहे. 

समाज कल्याण विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या या योजनेंतर्गत 9 ते 18 अश्वशक्तीचे मिनी ट्रॅक्टर आणि त्याची उपसाधने तब्बल 90 टक्के अनुदानावर पुरविली जातात. या सुवर्णसंधीसाठी जिल्ह्यातील अनेक बचतगटांनी अर्ज केले होते. अर्जांची छाननी केल्यानंतर पात्र आणि अपात्र ठरलेल्या बचतगटांची अंतिम यादी समाज कल्याण कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथील सांस्कृतिक सभागृहात दुपारी 3 वाजता ही सोडत प्रक्रिया पार पडणार आहे. निवडीमध्ये पारदर्शकता राहावी यासाठी लॉटरी पद्धतीचा अवलंब केला जात आहे. असेही कळविले आहे.

-*-*-*-*-

वृत्त क्र.                                                                         दि. 23 फेब्रुवारी, 2026

 

जालना येथे 5 बालकामगारांची सुटका;

 एका आस्थापना मालकावर गुन्हा दाखल

 

जालना, दि.23 (जिमाका):- जिल्ह्यात बालकामगार प्रथेला चाप लावण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या आदेशानुसार 16 ते 19 फेब्रुवारी दरम्यान राबविण्यात आलेल्या विशेष शोध मोहिमेत पाच बालकामगारांची सुटका करण्यात आली. तसेच एका आस्थापना मालकावर पोलीस ठाण्यात गुन्हा ही दाखल करण्यात आला आहे. जिल्हा बालकामगार अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली.

14 वर्षांखालील मुलांना कामावर ठेवणे हा अजामीनपात्र गुन्हा आहे. कायद्यानुसार, दोषी मालकास किमान 3 महिने कारावास आणि 20 हजार रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे. जिल्ह्यात कुठेही बालकामगार आढळल्यास नागरिकांनी तत्काळ 1098 या चाईल्डलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. 

बालकामगार शोध मोहिमेसाठी जिल्हा बालकामगार अधिकारी, चाइल्ड हेल्पलाईन, पोलीस प्रशासन, आरोग्य आणि शिक्षण विभागाच्या प्रतिनिधींचे एक विशेष संयुक्त पथक गठित करण्यात आले होते. या पथकाने शहरातील विविध दुकाने, हॉटेल्स आणि छोट्या उद्योगांवर अचानक छापे टाकले. या कारवाईत एकूण पाच अल्पवयीन मुले काम करताना आढळली. यात एका 14 वर्षांखालील बालकाचा आणि 16 वर्षांवरील चार किशोरवयीन मुलांचा समावेश आहे. सुटका करण्यात आलेल्या सर्व मुलांना बालकल्याण समिती समोर हजर करण्यात आले आहे. समितीच्या आदेशानुसार या मुलांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया राबविली जाणार आहे. दरम्यान, बाल आणि किशोर कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम 1986 चे उल्लंघन केल्याप्रकरणी एका मालकावर कठोर कारवाई करत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. असेही कळविले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment