जालना, दि.25 (जिमाका) :- जालना जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या सततधार पावसामुळे बाधित झालेल्या शहरातील कुटुंबांना सेंटर फॉर एग्रीकल्चर अँड डेव्हलपमेंट अर्थात कार्ड संस्थेच्या माध्यमातून शेल्टर कम हायजीन किट्सचे जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
जालना येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सभागृहात दि.25 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10 वाजता संच वाटप कार्यक्रम पार पडला. यावेळी महापालिका आयुक्त संतोष खांडेकर, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त राजू एडके , सनदी लेखापरीक्षक स्नेहल मोदाळे, निखिल बाहेती, डॉ.दीपक बुक्तरे, पत्रकार नूर अहमद कुरेशी,कार्डचे अध्यक्ष सुवर्णा दांडगे,उपाध्यक्ष डॉ.रामदास निहाळ, सचिव पुष्कराज तायडे, कोषाध्यक्ष सोनिया तेलगड यांची उपस्थिती होती.
वाटप करण्यात आलेल्या शेल्टर कम हायजीन किट्समध्ये ताडपत्री,सतरंजी, मच्छरदाणी,टूथपेस्ट,ब्रश, अंगाची व कपडे धुण्याची साबण, सॅनिटरी नॅपकिन,दोरी, बॅग आदी साहित्य आहे. वाटप प्रसंगी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी कार्डच्या मदतीबद्दल अभिनंदन करून आपत्ती काळात अशीच मदत करत रहा असे सांगून संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुष्कराज तायडे यांनी केले यात त्यांनी अमेझॉन,डोनेट कार्ट कडून जालना जिल्ह्यात आलेल्या अतिवृष्टी बाधित कुटुंबांना 300 किट्स उपलब्ध करून देण्यात आल्या असून त्याचे वाटप जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात येत असून बाधित कुटुंबांपर्यंत पोहचणार आहोत. असे स्पष्ट केले.तर सूत्रसंचालन आणि आभार प्रा.डॉ.रामदास निहाळ यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी भास्कर उघडे, विशाल उघडे, राहुल उघडे यांनी परिश्रम घेतले. यावेळी बाधित नागरिक उपस्थित होते.
_*_*_*_*_

No comments:
Post a Comment