Tuesday, 23 September 2025

जालना येथे 30 सप्टेंबर ‍रोजी “पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा” भरती मेळाव्याचे आयोजन

 


      जालना, दि.23 (जिमाका): जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,जालना अणि मातोश्री स्क‍िल डेव्हलमेंट सेंटर,जालना यांचे संयुक्त विद्यमानाने दिनांक 30 सप्टेंबर 2025 मंगळवार रोजी मातोश्री स्क‍िल डेव्हलमेंट सेंटर, अंबड रोड,जालना येथे सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत “पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा” आयोजित करण्यात आला आहे. यासाठी अंदाजे 252 पेक्षा अधिक रिक्तपदे उपलब्ध होणार आहेत. नमो महारोजगार मेळाव्यानिमित्त या मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले असून या मेळाव्यामध्ये निवड झालेल्या निवडक उमेदवारांना नमो महारोजगार मेळाव्यामध्ये दिनांक 8 ऑक्टोबर 2025 रोजी बी.के.सी. बांद्रा मुंबई येथे  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हस्ते नियुक्ती आदेश देण्यात येणार आहे.

                          रोजगार कार्यालयाकडील नोंदणीकृत सुशिक्षित महिला व पुरुष उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी सहाय्य होण्याच्या दृष्टीने या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.या मेळाव्यात रोजगार देणा-या विविध नामांकित कंपन्या व नियोक्ते उपस्थित राहुन व प्रत्यक्ष मुलाखती घेवून उमेदवारांची निवड करणार आहे. सदर मेळाव्यामध्ये नियोक्त्यांकडून 252 रिक्तपदे एसएससी, एचएससी, कोणतेही पदवीधर, आयटीआय ट्रेडधारक (फिटर,वेल्डर, इलेक्ट्रीशियन, मशिनिष्ट, अप्रेन्‍टीस ट्रेनी, अकाउंटंट असिस्‍टंट, डाटा एन्‍ट्री ऑपरेटर, सर्व्हिस अॅडव्‍हायझर इत्यादी) 18 ते 45 वयोगटातील पात्रताधारक उमेदवारांसाठी पदे उपलब्ध झालेली आहेत. आणखी काही पदे उपलब्ध होणार आहेत.तसेच या मेळाव्यात स्वयंरोजगाराबाबत अर्थसहाय्य करणा-या विविध शासकीय महामंडळाचे स्टॉल लावण्यात येणार असुन विविध योजनांचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याच बरोबर स्टॉलच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना अंतर्गत विनामुल्य असलेले विविध रोजगारक्षम कौशल्य प्रशिक्षणाची माहिती देऊन नोंदणी करण्यात येणार आहे.या सुवर्ण संधीचा जास्तीत जास्त नोकरी इच्छूक महिला व पुरुष उमेदवारांनी लाभ घ्यावा. तसेच उमेदवारांनी याचा लाभ घेण्यासाठी किमान पाच प्रतीत बायोडाटा व फोटो आणि आधारकार्ड,सेवायोजन नोंदणी कार्ड इ. कंपनींना देण्यासाठी सोबत ठेवावे.नोकरी इच्छुक उमेदवारांनी अद्याप पर्यंत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी किंवा यापुर्वी महास्वयंम वेबपोर्टलवर नोंदणी केली असल्यास वरील रिक्तपदे व पात्रते प्रमाणे मॅचिंग होणा-या पदांसाठी ऑनलाईन ॲप्लाय करुन लॉगीन करावे आणि प्रत्यक्ष मुलाखतीसाठी रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी सकाळी  9 वाजता उपस्थित रहावे. अधिक माहितीसाठी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर भेट देऊन आगामी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा या सदराखाली जालना जिल्हा निवडून पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यामधील तपशिल पाहावा. याबाबत काही अडचण आल्यास सहाय्यासाठी कार्यालयाच्या 02482-299033 या दूरध्वनीवर कार्यालयीन वेळेत संपर्क करावा किंवा jalnarojgar@gmail.com या ई-मेलवर संपर्क करावा.या मेळाव्याचा जास्तीत जास्त उमेदवारांनी उपस्थित राहुन लाभ घ्यावा.     असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

                                                             *-*-*-*-*-*-*- 

जवाहर नवोदय विद्यालयात ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदतवाढ

 


   जालना, दि.23 (जिमाका): जवाहर नवोदय विद्यालय अंबा-परतूर लॅटरल एन्ट्री निवड चाचणी वर्ग 9 वी आणि वर्ग 11 वी करिता जालना जिल्ह्यातील इयत्ता 8 वी आणि 10 वी वर्गात शैक्षणिक वर्ष सन 2025-26 मध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांसह सेवाकेंद्रावरून व इतर यंत्रणेचा वापर करून ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख 23 सप्टेंबर 2025अशी होती. प्रशासकीय कारणास्तव ही मुदत वाढवून दिनांक 7 ऑक्टोबर 2025 पर्यंत करण्यात आलेली आहे.

                तरी इच्छुक विद्यार्थी,पालक,शिक्षक व मुख्याध्यापकांनी ह्याची नोंद घ्यावी.ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी फोटो, स्वाक्षऱ्या हे 10 ते 100 KB मध्ये स्कॅन करून वर्ग नववी साठी “https://cbseitms.nic/2025/nvsix 9” या संकेतस्थळावरून व अकरावी साठी https://cbseitms.nic/2025/nvsxi ११ या संकेतस्थळावरून भरावेत.जिल्हाभरातील सर्व मुख्याध्यापकांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्याचे अर्ज भरण्याचे आवाहन जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य एस.जी.पवार यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे. 

                                                                                *-*-*-*-*-*

“मॅजिक आयटीआय जालना इनक्युबेशन सेंटर” चे 25 सप्टेंबर रोजी उद्घाटन

 

जालना, दि.23 (जिमाका): जिल्ह्यातील शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांतील विद्यार्थी तसेच नवउद्योजकांमध्ये नाविन्य व उद्योजकता वृद्धीसाठी, छत्रपती संभाजीनगर येथे दिनांक 16 सप्टेंबर 2023 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जालना येथे MAGIC (Marathwada Accelerator for Growth and Incubation Council), छत्रपती संभाजीनगर यांच्याव्दारे इनक्युबेशन सेंटर स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या अनुषंगाने, सदर इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील को-वर्किंग व कार्यालयीन जागेचे नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले असून प्रत्यक्ष कामकाज सुरू होण्याच्या मार्गावर आहे.या अनुषंगाने, गुरुवार, दि. 25 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 1.30 वाजता कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, मंत्री,  मंगल प्रभात लोढा, महाराष्ट्र राज्य यांच्या उपस्थितीत “मॅजिक आयटीआय जालना इनक्युबेशन सेंटर” या केंद्राचा उद्घाटन समारंभ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जालना येथे आयोजित करण्यात आला आहे.मॅजिक आयटीआय जालना इनक्युबेशन सेंटर च्या स्थापनेमुळे नवीन उद्योग उभारणीसाठी आवश्यक मार्गदर्शन,प्रशिक्षण व सुविधा मिळणार असून, नवउद्योजकांना स्टार्टअप कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी मदत होणार आहे.त्याचप्रमाणे बँक व शासकीय योजनांशी जोडणी करून आर्थिक साहाय्य मिळविण्याची संधी, कौशल्य, तंत्रज्ञान आणि बाजारपेठ यांचा थेट अनुभव व नेटवर्किंग होणार, जिल्ह्यातील नव्या उद्योग जगतात  सक्रिय सहभाग व संधी उपलब्ध होणार आहे. सदर उद्घाटन समारंभास आपण उपस्थित राहून आपल्या प्रगतीसाठी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक,आयुक्त कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता,यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-  

इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ विविध योजनांच्या लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

 

जालना, दि.23 (जिमाका): महाराष्ट्र राज्य इतर मागास वर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित, जिल्हा कार्यालय अंतर्गत मुख्य कंपनी व 13 उपकंपनी अंतर्गत लघु उद्योग व्यवसायकरीता व शिक्षणाकरीता कर्ज पुरवठा केल्या जातो. सन 2025-26 या वित्तीय वर्षाकरीता विविध योजनांचे उद्दीष्ट प्राप्त झाले आहे. या योजना  पेट कर्ज योजना मर्यादा 1 लाख, 20 टक्के बीज भांडवल योजना मर्यादा 5 लाख रुपये, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना मर्यादा 15 लाख रुपये, शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना मर्यादा 20 लाख रुपये, गट कर्ज व्याज परतावा योजना मर्यादा 20 लाख रुपये, महिला स्वयंसिध्दी व्याज परतावा योजना.

या योजनेच्या अधिक माहितीसाठी पात्र लाभार्थ्यांनी  जिल्हा व्यवस्थापक  महाराष्ट्र राज्य इतर  मागासवर्गीय  वित्त आणि विकास महामंडळ  मर्यादित जिल्हा कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर  जालना येथे संपर्क क्रमांक 02482 -223420 यावर तसेच www.msobcfdc.org संपर्क करण्याचे तसेच योजनेच्या  लाभार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापक एस.एम. राठोड यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.  

-*-*-*-*-*- 

धनगर समाज आरक्षण मोर्चानिमित्त वाहतूक मार्गात बदल

 


जालना, दि.23 (जिमाका): बीड शहागड अंबडकडून येणारी वाहतूक ही पारनेर फाटा सुखसागर हॉटेल पासुन वळवून ही किनगाव चौफुली- नानेगाव- बदनापूर-सेलगाव-ग्रेडर टी पॉईंट जालना मार्गे भोकरदन देऊळगावराजा सिंदखेडराजा- मंठाकडे येईल.   

बदनापूर येथुन वळवून नानेगाव मार्गे  किनगाव  चौफुली पारनेर फाटा सुखसागर हॉटेल मार्गे अंबड.

भोकरदन – जालना- अंबड, देऊळगावराजा –जालना- अंबड, सिंदखेडराजा- जालना अंबड, मंठा- जालना- अंबडकडे  जाणारी वाहतूक ही कन्हैयानगर- मंठा चौफुली  जालना मार्गे  रोहणवाडी  फाटा येथुन  वळवून राणीउंचेगाव- सुतगिरणी  घनसावंगी फाटा मार्गे अंबड- शहागडकडे जाईल.

-*-*-*-*-*- 

राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियानांतर्गत बायोचार निर्मितीसाठी अर्ज करण्याचे आवाहन


 

जालना, दि.23(जिमाका): राष्ट्रीय अन्न् सुरक्षा आणि पोषण अभियान वाणिज्यिक पिके अंतर्गत कापुस विकास कार्यक्रम 2025-26 अंतर्गत बायोचार निर्मीती उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश शेतातील कापूस पिकांच्या पऱ्हाट्यांचा वापर करुन जमिनीत कार्बनचे प्रमाण वाढवून पिकांची उत्पादकता वाढवणे हा आहे.

यासाठी वैयक्तिक लाभार्थी नोंदणी राष्ट्रीय शेतकरी गट/शेतकरी उत्पादक कंपनी/कृषी क्षेत्रात काम करणारी सहकारी संस्था अर्ज करण्यास पात्र असणार आहेत. याकरीता महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणे आवश्यक आहे. लाभार्थी निवड प्रक्रिया प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर होणार असून, पात्र शेतकऱ्यांना प्रति युनिट रु. 10 हजार रुपये किंवा एकूण खर्चाच्या 50 टक्के पैकी जे कमी असेल त्याप्रमाणे अनुदान मिळणार आहे.

जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी, शेतकऱ्यांनी बायोचार युनिटसाठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे यांनी केले आहे.

-*-*-*-*-*- 

पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री तसेच जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांचा जालना दौरा

 

 

जालना, दि.23(जिमाका): पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री तसेच पालकमंत्री  पंकजा मुंडे यांचा जालना जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे  बुधवार  दि. 24 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 6.00 वाजता शासकीय विश्रामगृह छत्रपती संभाजीनगर येथून शासकीय वाहनाने गोळेगाव ता. परतुर जि. जालनाकडे प्रयाण. सकाळी 8.00 वाजता  आगमन गोळेगाव ता. परतुर येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी. सकाळी 8.30 वाजता शासकीय वाहनाने घनसावंगी, जि. जालनाकडे प्रयाण. सकाळी 10.00 वाजता शासकीय विश्रामगृह, जालनाकडे आगमन व राखीव. सकाळी 11.00 वाजता घनसावंगी, जि. जालना येथे आगमन व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी. सकाळी 11.30 वाजता शासकीय वाहनाने मौजे सुखापुरी ता. अंबड येथे प्रयाण. दुपारी 12.30 वाजता आगमन व सुखापुरी ता. अंबड येथील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी. दुपारी 1.00 वाजता शासकीय वाहनाने बीड जिल्ह्याकडे प्रयाण.

-*-*-*-*-*-