Friday, 8 May 2026

विकसित जालना घडविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे -विभागीय आयुक्त जी. श्रीकांत

 




जालना,दि.8(जिमाका) :  जिल्ह्यातील विकासकामे अधिक गतीने आणि प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी सर्व विभागांनी आपापसांत समन्वय ठेवून काम करावे. तसेच स्थानिक पातळीवरील प्रश्न स्थानिक स्तरावरच सोडविण्याचा प्रयत्न करावा. ‘विकसित जालना’ या संकल्पनेच्या अनुषंगाने प्रत्येक विभागाने आपल्या विभागाचा स्वतंत्र व्हिजन मॅप तयार करून दीर्घकालीन नियोजन करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जिल्हास्तरीय आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी बैठकीस जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णकांत कांवरिया, महानगर पालिका आयुक्त अंजली शर्मा, पोलीस अधीक्षक संधू, अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, उपजिल्हाधिकारी मनिषा दांडगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी विभागीय आयुक्त पुढे म्हणाले की, आपले मुख्यमंत्री यांच्या “1 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था” आणि “विकसित भारत” या संकल्पनेला अनुसरून जिल्ह्यातील सर्व विभागांनी उद्दिष्टपूर्तीसाठी काम करावे. भारतीय हवामान विभागाच्या अहवालानुसार आगामी काळात मराठवाडा भागावर हवामानाचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यानुसार कृषी, पशुसंवर्धन आणि पाणीपुरवठा विभागांनी आतापासूनच आवश्यक नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले. ज्या भागांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे, त्या ठिकाणी तात्काळ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करावा. शासनाने जलजीवन मिशन अंतर्गत निधी उपलब्ध करून दिला असून, जिल्ह्यातील प्रलंबित कामांचा आढावा घेऊन, ती तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले. तसेच पाणंद रस्ते मोकळे करण्यासाठी महसूल आणि पोलिस विभागाने समन्वयाने काम करावे व आवश्यकतेनुसार पोलिसांची मदत घ्यावी, असे सांगितले.

महानगरपालिका आणि नगरपालिका प्रशासनाने शहर परिसरातील स्वच्छतेवर विशेष भर देत नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे. याशिवाय जिल्ह्यातील नद्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात यावी.

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी “लखपती दीदी” अभियानाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महिलांना विविध उपक्रमांमध्ये सहभागी करून घेण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच स्वयंरोजगार, बचत गट आणि कौशल्यविकास योजनांमध्ये महिलांचा सहभाग वाढविण्यावर भर देण्यात यावा.

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस विभागाने प्रभावी नियोजन करावे. तसेच कायदा सुव्यवस्था बिघडविणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करून, आवश्यकतेनुसार त्यांना जिल्ह्यातून तडीपार करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. प्रशासनाने चांगल्या नागरिकांचे संरक्षण आणि चुकीच्या प्रवृत्तीच्या नागरिकांवर कठोर कारवाई करण्याची भूमिका ठेवून काम करावे.

प्रत्येक विभागाने त्यांच्या राज्यस्तरावर प्रलंबित असलेल्या विषयांची स्वतंत्र माहिती तयार ठेवावी. शासनाकडून विचारणा झाल्यास संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी विभागाने कोणते प्रयत्न केले याचा पुढील काळात सविस्तर आढावा घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शासनाकडून जिल्ह्याच्या विकासाकरीता कोणत्याही विषयावर प्रस्ताव मागविण्यात आल्यास तो प्रस्ताव तत्काळ सादर करता येईल, या दृष्टीकोनातून सर्व विभागांनी पूर्वतयारी ठेवावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. जिल्हा प्रशासनाने विविध स्तरांवर आवश्यक असलेल्या मनुष्यबळ, निधी आणि इतर संसाधनांची माहिती अद्ययावत ठेवण्यावर भर द्यावा. यासोबतच सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्वतःची व आपल्या कुटुंबाची स्वगणना पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन केले. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था आणि विविध विभागांनी एकत्रितपणे काम करून “विकसित जालना”चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी समन्वयाने काम करावे असे ही जी. श्रीकांत यांनी यावेळी सांगितले

प्रारंभी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील विविध विभागाची माहिती सादर केली. यावेळी विविध विभाग प्रमुख यांची उपस्थिती होती.

-*-*-*-*-

विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांची विविध विकास कामांना भेट

 






 

जालना,दि.8(जिमाका) : विभागीय आयुक्त जी. श्रीकांत हे आज जालना दौऱ्यावर आले असता, यावेळी त्यांनी जालना शहरातील विविध विकास कामांना प्रत्यक्ष भेट देवून पाहणी केली. यामध्ये त्यांनी मोतीबाग येथील नवीन चौपाटी सुशोभीकरणाच्या कामास भेट देवून पाहणी केली. तसेच सुपर फिप्टी उपक्रमास भेट देवून संबंधीताकडून सदर उपक्रमाची माहिती जाणुन घेतली. यांनतर जालना ड्रायपोर्टला भेट देवून पाहणी करत, ड्रायपोर्ट कामाच्या प्रगतीबाबत माहिती घेतली.

यावेळी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णकांत कंवरिया, मनपा आयुक्त अंजली शर्मा, अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ, यांच्यासह संबंधीत विभाग प्रमुख होते.

-*-*-*-*-

Thursday, 7 May 2026

रामतीर्थ स्मशानभूमी परिसरात नदीपात्रात मृत कोंबड्या टाकणाऱ्या अज्ञात वाहनचालका विरुद्ध गुन्हा दाखल

 


 

जालना दि.7,(जिमाका): शहरातील रामतीर्थ स्मशानभूमी परिसरातील नदीपात्रात मोठ्या प्रमाणात मृत कोंबड्या टाकून सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण केल्याप्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जालना महानगरपालिकेतील प्रभारी स्वच्छता निरीक्षक मॅथ्यु वर्गीस चाको (वय 45) यांनी सदर बाजार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, 7 मे 2026 रोजी रामतीर्थ स्मशानभूमी परिसरातील नदीपात्रात पिकअप वाहन क्रमांक एमएच 21 बीएच 9742 मधून अंदाजे 100 ते 125 मृत कोंबड्या आणून टाकल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून, सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. तसेच संसर्गजन्य रोग फैलावण्याची शक्यता निर्माण झाले. तसेच नदीपात्रात मृत कोंबड्या टाकून सार्वजनिक पाणी स्रोतात प्रदूषण करुन वातावरण आरोग्यास धोका निर्माण केल्याचा आरोप संबंधीतावर करण्यात आला आहे. या प्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 271, 272, 279, 280, आणि 291 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. श्री. जाधव करीत असल्यचे प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

-*-*-*-*-*-

शासकीय व निमशासकीय कार्यालयांनी डिजिटल स्व-गणना नोंदणी करावी - जिल्हाधिकारी आशिमा मित्तल · अधिकारी-कर्मचारी आणि जिल्ह्यातील नागरिकांनी 15 मे पूर्वी ऑनलाइन माहिती भरावी

 


 

जालना,दि.7(जिमाका) :भारत सरकारच्या आगामी 16 व्या जनगणना-2027 प्रक्रियेअंतर्गत नागरिकांनी डिजिटल स्व-गणना (Self Enumeration) प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. यासंदर्भात गृह मंत्रालय, भारत सरकार यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी जालना आशिमा मित्तल यांनी सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांना सूचना जारी केल्या आहेत.

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील 16 वी जनगणना जानेवारी 2026 ते फेब्रुवारी 2027 या कालावधीत दोन टप्प्यात पार पडणार आहे. जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात नागरिकांना स्वतःची माहिती ऑनलाइन पद्धतीने नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी भारत सरकारच्या https://se.census.gov.in या संकेतस्थळावर डिजिटल स्व-गणना प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

ही ऑनलाइन स्व-गणना प्रक्रिया 1 ते 15 मे, 2026 या कालावधीत राबविण्यात येत असून, सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांचे विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्वतःची डिजिटल स्व-गणना पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच संबंधित कार्यालयांतील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही ही प्रक्रिया निश्चित मुदतीत पूर्ण करावी. ज्या अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांनी अद्याप स्व-गणना केलेली नाही किंवा प्रक्रिया अपूर्ण ठेवली आहे, त्यांनी तातडीने नोंदणी पूर्ण करून त्याचा प्रमाणित अहवाल सादर करावा. संबंधित कार्यालयांनी 15 मे 2026 पर्यंत डिजिटल स्व-गणना पूर्ण करून 16 मे, 2026 रोजी पर्यंत संख्यात्मक अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

तसेच जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी देखील या सुविधेचा लाभ घेऊन स्वतःची व कुटुंबाची माहिती अचूकपणे नोंदवावी. असे आवाहन जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी आशिमा मित्तल यांनी केले आहे.

-*-*-*-*-*-*-*-

 

पनीरच्या नावाखाली ‘चीज ॲनालॉग’ विक्रीवर करुन ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या हॉटेल, रेस्टॉरंट व केटरर्सवर अन्न व औषध प्रशासन करणार कारवाई

 


 

जालना,दि.7(जिमाका) : पनीरच्या नावाखाली स्वस्त दरातील ‘चीज ॲनालॉग’ विक्री करून ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या हॉटेल, रेस्टॉरंट, केटरर्स तसेच फास्ट फूड विक्रेत्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येत असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त श्रीधर डुबे पाटील यांनी दिले आहेत.

या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा सुरक्षित अन्न व पोषक आहार समितीच्या अध्यक्षा आशिमा मित्तल यांनी संबंधित मोहिमेचा आढावा घेतला. यावेळी जिल्ह्यातील हॉटेल, रेस्टॉरंट, केटरर्स, फास्ट फूड विक्रेते तसेच पनीर व चीज ॲनालॉग उत्पादकांची व्यापक तपासणी करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

पनीर आणि चीज ॲनालॉगमधील फरक

अन्न व औषध प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, “पनीर” हा पदार्थ पूर्णपणे दुधापासून तयार केला जातो. तर “चीज ॲनालॉग” तयार करताना दुधासोबत किंवा त्याऐवजी खाद्यतेल, स्टार्च, इमल्सिफायर व इतर घटकांचा वापर केला जातो.

ग्राहकांनी घ्यावी ही काळजी

अन्न व औषध प्रशासनाने ग्राहकांना खरेदी करताना काही बाबींची विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. पॅकबंद पनीर खरेदी करताना त्यावरील लेबल तपासावे. सुटे पनीर घेताना ते शुद्ध दुधाचे असल्याची खात्री करून संशय आल्यास बिल घ्यावे. तसेच हॉटेलमध्ये पदार्थ ऑर्डर करण्यापूर्वी मेन्यूकार्डवर ‘पनीर’ आणि ‘ॲनालॉग’ असे स्वतंत्र पर्याय नमूद आहेत का, हे तपासावे.

हॉटेल व्यावसायिकांसाठी सूचना

अन्न व औषध प्रशासनाकडे अनेक हॉटेल व्यावसायिक ग्राहकांना कोणतीही माहिती न देता स्वस्त दरातील चीज किंवा पनीर ॲनालॉग वापरत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे आता ज्या हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये चीज ॲनालॉगचा वापर केला जातो, त्यांनी मेन्यूकार्ड अथवा डिस्प्ले बोर्डवर त्याचा स्पष्ट उल्लेख करणे बंधनकारक राहणार आहे. याशिवाय हॉटेल चालकांनी पनीर ॲनालॉग किंवा चीज ॲनालॉग खरेदी करताना बिलावर संबंधित पदार्थाचा स्पष्ट उल्लेख असल्याची खात्री करूनच खरेदी करावी, असे निर्देशही देण्यात आले आहेत.

शाकाहारींसाठी पनीर हा प्रथिनांचा महत्त्वाचा स्रोत मानला जातो. मात्र काही व्यावसायिक आर्थिक फायद्यासाठी कमी दर्जाच्या घटकांचा वापर करून पनीरसदृश पदार्थ विकत आहेत. यावर प्रतिबंध घालण्यासाठी आणि नागरिकांना सकस, निर्भेळ व सुरक्षित अन्न उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाभर विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापना विरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी अन्न व औषध प्रशासनाला दिले आहेत.

 

-*-*-*-*-*-*-

जालना जिल्ह्यात आज ‘छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर’ आयोजन

 


जालना दि.7,(जिमाका): राज्य शासनाच्या नागरिक केंद्रित उपक्रमांतर्गत जालना जिल्ह्यात शुक्रवार, 8 मे 2026 आजरोजी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान’ आयोजित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सहा मंडळ स्तरांवर हे शिबिर भव्य स्वरूपात घेण्यात येणार असून, नागरिकांच्या विविध शासकीय समस्या, तक्रारी, अर्ज व प्रलंबित प्रकरणांचे तातडीने निवारण करण्यावर भर दिला जाणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणी संदर्भात आढावा बैठक पार पडली. यावेळी बैठकीस प्र. निवासी उपजिल्हाधिकारी मनिषा दांडगे,    उपविभागीय अधिकारी रामदास दौंड, नायब तहसीलदार किशोर तायडे, यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नगर परिषद व नगर पंचायतींचे मुख्याधिकारी यांची उपस्थिती होती.

यावेळी बैठकीत शिबिरांचे नियोजन, समन्वय, नागरिकांना मिळणाऱ्या सेवा आणि तक्रार निवारण प्रक्रियेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. शिबिरांमध्ये नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती, अर्ज स्वीकृती, प्रमाणपत्रे, महसूलविषयक सेवा तसेच इतर विभागांच्या सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या. शिबिरांमध्ये येणाऱ्या नागरिकांना आवश्यक पायाभूत सुविधा, पुरेसे मनुष्यबळ, मार्गदर्शन कक्ष, तक्रार नोंदणी व निवारण यंत्रणा उपलब्ध राहील. नागरिकांना सुलभ, पारदर्शक आणि समाधानकारक सेवा देण्याचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

खालीलप्रमाणे 08 मे रोजी तालुकानिहाय महाराजस्व अभियान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

·                     जालना तालुका : मुक्तेश्वर लॉन्स, जालना

·                     बदनापूर : आरती इंग्लिश स्कूल, बदनापूर

·                     अंबड : मत्स्योदरी देवी संस्थाचे अहिल्यादेवी सभागृह, अंबड

·                     घनसावंगी : जिल्हा परिषद शाळा, तीर्थपुरी

·                     भोकरदन : नगर परिषद मंगल कार्यालय, भोकरदन

·                     जाफराबाद : छत्रपती शिवाजी महाराज चौक, कुंभारझरी

 

जिल्हा प्रशासनाच्या वतीने नागरिकांना या शिबिरांचा जास्तीत-जास्त लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी आपल्या अडचणी, समस्या व शासकीय कामासंदर्भातील प्रकरणे संबंधित शिबिरात मांडून शासनाच्या सेवा योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

-*-*-*-*-*-*-*-

“जागेवर निवड संधी” चे 9 मे रोजी जालना येथे आयोजन

 

जालना दि.7,(जिमाका): जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर, जालना अणि विक्रम टी प्रोसेसर प्रा. लिमिटेड जालना यांचे संयुक्त विद्यामाने दिनांक 9 मे, 2026 शनिवार रोजी विक्रम टी प्रोसेसर प्रा. लिमिटेड बोरखेडी, सिंदखेड राजा रोड जालना येथे सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत (प्लेसमेंट ड्राईव्ह) “जागेवर निवड संधी” आयोजित करण्यात आला आहे. यासाठी 27 रिक्तपदे उपलब्ध आहेत.

 

रोजगार कार्यालयाकडील नोंदणीकृत सुशिक्षित महिला व पुरुष उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी सहाय्य होण्याच्या दृष्टीने हा रोजगार मेळाव्याचे आयोजीत करण्यात येत आहे. या मेळाव्यात विक्रम टी प्रोसेसर प्रा. लिमिटेड जालना यांचे नियुक्ते उमेदवारांची निवड करणार आहे. सदर मेळाव्यामध्ये नियोक्त्यांकडून 27 रिक्तपदे 1) आयटीआय फिटर 1 पद  2) आयटीआय इलेक्ट्रिशन1 पद 3) आय टी आय मशीनिस्ट 1 पद   4) वेअर हाऊस सहाय्यक 02 पदे 5) अकाउंट असिस्टंट 2 पदे 6) ऑफिस एच. आर. 1 पदे 7) लोडिंग ड्रायव्हर 10 पदे 8) सुपरवायझर 3 पदे 9) डाटा एन्ट्री ऑपरेटर 5 पदे इत्यादी, 18 ते 35 वयोगटातील पात्रता धारक उमेदवारां साठी पदे उपलब्ध झालेली आहेत, सदर पदासाठी आयटीआय, बी. कॉम  पदवीधर, एमबीए, कोणत्याही शाखेतील पदवी त्याच प्रमाणे ड्रायव्हर पदासाठी अनुभव धारक उमेदवारा यांच्यासाठी  ही जागेवर निवड संधी आयोजित करण्यात येत आहे.

            तरी या सुवर्णसंधीचा जास्तीत जास्त नोकरी इच्छूक महिला व पुरुष उमेदवारांनी लाभ घ्यावा.  मुलाखती साठी बायोडाटा एक प्रत सोबत ठेवावी. प्रत्यक्ष मुलाखतीसाठी विक्रम टी प्रोसेसर प्रा. लिमिटेड बोरखेडी, सिंदखेड राजा रोड जालना सकाळी 9 वाजता उपस्थित राहावे.  असे आवाहन सहायक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, जालना यांनी केले आहे.

-*-*-*-*-*-