जालना,दि.1(जिमाका): जिल्ह्यातील अपघातप्रवण क्षेत्रांवरील (ब्लॅक स्पॉट)
प्रलंबित सुरक्षा उपाययोजनांची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आशिमा
मित्तल यांनी संबंधित यंत्रणांना दिले.
जिल्हाधिकारी
कार्यालयातील जिल्हा रस्ते सुरक्षा समितीची आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. पोलीस अधिक्षक तेगबीर सिंह संधु, सार्वजनीक
बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर कोल्हे, सार्वजनीक बांधकाम विभाग कार्यकारी
विभाग 2 चे कार्यकारी अभियंता व्यं.ना. मिठ्ठेवाड, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी मनिष
दौंड, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे वाहतुक निरिक्षक आ. अ. सोनवणे, विद्युत अभियंता
के.बी. गावंडे, पोलीस निरिक्षक सुरेश उणवणे आदींची उपस्थिती होती.
या बैठकीत जिल्ह्यातील ब्लॅक स्पॉट, रस्ते सुरक्षा
उपाययोजना आणि प्रलंबित कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. चिंचखेड फाटा, काजळा फाटा,
सुखापुरी फाटा, चौधरी नगर, मंठा चौफुली आणि चंदनझिरा या सहा ब्लॅक स्पॉटवरील सुरक्षा
उपाययोजनांची कामे पूर्ण झाल्याचे बैठकीत स्पष्ट झाले. या कामांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी
समाधान व्यक्त केले.
'सेव्ह
लाईफ फाउंडेशन'ने सुचविलेल्या १२५ क्रिटिकल ब्लॅक स्पॉटपैकी २३ प्राधान्य ब्लॅक स्पॉट
तसेच जिल्ह्यातील इतर २६ ब्लॅक स्पॉटवर आवश्यक उपाययोजना करण्यात येणार आहेत. यापैकी
एकही ब्लॅक स्पॉट उपाययोजनांशिवाय अपूर्ण राहणार नाही, पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधु सांगितले.
ब्लॅक
स्पॉटवर सुरक्षा उपाययोजना केल्यानंतर अपघातांमध्ये प्रत्यक्षात किती घट झाली, याचा
आढावा घेण्यात येणार आहे. त्यासाठी उपाययोजनांपूर्वी आणि त्यानंतर झालेल्या अपघातांचा
तुलनात्मक अहवाल पुढील बैठकीत सादर करण्याचे निर्देश पोलीस विभागाला देण्यात आले.
मागील
दोन-तीन बैठकींत सूचना करूनही प्रलंबित कामे पूर्ण न झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित
राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
जालना, अमरावती, अकोला आणि छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रीय महामार्ग विभाग तसेच
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) छत्रपती संभाजीनगर कार्यालयाला प्रलंबित
कामांसाठी सात दिवसांची अंतिम मुदत देण्यात आली.
महावितरणकडून
रस्त्यालगत सुरक्षेच्या दृष्टीने अडथळा निर्माण करणाऱ्या पद्धतीने अनधिकृत विद्युत
खांब उभारले जात असल्याची बाब बैठकीत निदर्शनास आणण्यात आली. याची दखल घेत पुढील बैठकीत
महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले. या प्रकरणाचा
सविस्तर आढावा घेऊन आवश्यक ती कारवाई केली जाणार आहे.
चंदनझिरा
परिसरातील अपघातांशी संबंधित प्रलंबित कामांचा आढावा घेण्यासाठी पुढील बैठकीस एमआयडीसी
बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच इंद्रायणी
हॉटेलसमोरील अपघातप्रवण ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजना तातडीने करण्याचे निश्चित
करण्यात आले.
रस्त्यांवरील
प्रकाश व्यवस्था सुधारण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने २६ ब्लॅक स्पॉटवर फ्लड लाईट्स
बसविण्याचे अंदाजपत्रक सादर केले आहे. या अंदाजपत्रकाची इतर एजन्सींच्या प्रस्तावांशी
तुलना करण्यात येत असून, योग्य एजन्सीची निवड करून कामाचा अंतिम आदेश देण्यात येणार
आहे.
जिल्ह्यातील
रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी परस्पर समन्वय
वाढवून प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देश बैठकीत देण्यात आले.
****