Tuesday, 25 November 2025

एकता पदयात्रेस जालनेकरांचा उत्स्फूर्त सहभाग

 


 

जालना, दि. 25  (जिमाका) :-  लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त जालना शहरात मंगळवार दि.25 नोव्हेंबर 2025 रोजी भव्य एकता पदयात्रा काढण्यात आली. पदयात्रेत विद्यार्थी व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भारत माता की जय, वंदे मातरम या देशभक्तीपर घोषणांनी शहर दुमदुमुन गेले. 

कार्यक्रम  जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासन व माय भारत, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ,  तहसीलदार छाया पवार, पोलीस प्रशिक्षण केंद्राचे केशव गिरडकर, सुरेश कुलकर्णी यांची उपस्थिती होती.

सुरुवातीला सरदार वल्लभभाई पटेल व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पदयात्रेचा शुभारंभ करण्यात आला. तसेच पदयात्रेमध्ये एन.एस.एस, मॉडेल कॉलेज घनसावंगी, निर्मल क्रीडा मंडळ, विविध संस्था, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ म्हणाले की,  सशक्त, समृद्ध आणि आत्मनिर्भर भारतासाठी ‘एकता’ हा मूलभूत मंत्र प्रत्येक जनमानसात दृढ रुजला पाहिजे. देशाच्या सर्वांगिण प्रगतीसाठी विद्यार्थ्यांनी मानसिक, शारीरिक व भावनिकदृष्ट्या सक्षम राहून परिश्रमाची तयारी ठेवावी. सरदार पटेल यांच्या जिद्द, नेतृत्वगुण आणि कार्यतत्परतेचा आदर्श सर्वांनी घ्यावा.

कार्यक्रमात उत्कर्ष थिएटर कलापथक  यांच्याकडून नशामुक्ती विषयावरील  पथनाट्य,  तसेच  देशभक्तीपर गीते सादर करण्यात आले. नशाविरोधी संदेश देणाऱ्या या पथनाट्यास उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून पदयात्रेला सुरुवात झाली. पदयात्रा मार्ग छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते उडपी हॉटेल मार्गे फुल बाजार ते वीर सावरकर चौकापासून  मामा चौक अशी मार्गस्थ होवून  राष्ट्रगीताने समारोप करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्हा युवा अधिकारी प्रणित सांगवीकर, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. सोमनाथ खाडे,  प्रा. उद्धव थोरवे, जयपाल राठोड, अभिजित भुतेकर व पोलीस प्रशिक्षण केंद्राचे कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment