Tuesday, 4 November 2025

जिल्ह्यातील लघु सिंचन योजनांची सातवी तसेच जलसाठ्याची दुसरी प्रगणना वेळेत पुर्ण करावी - जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

 


 

जालना, दि.4 (जिमाका):-  शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील लघु सिंचन योजनांची सातवी, जलसाठ्याची दुसरी प्रगणना वेळेत पुर्ण करणे आवश्यक आहे. या माध्यमातून चांगले काम करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिले.

 लघुसिंचन योजनांची सातवी, जलसाठ्याची दुसरी प्रगणना तसेच गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी बैठकीस या बैठकीस मृद व जलसंधारण अधिकारी एस.एस.वाघमारे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुनिल पठारे, आत्माचे प्रकल्प संचालक अशोक आगवान, उप कार्यकारी अभियंता ए.पी.शिनगारे यांच्यासह संबंधित यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.

 जिल्हाधिकारी आशिमा मित्तल म्हणाल्या की, जिल्ह्यात प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, सामुहिक शेततळे, बांधबंदिस्ती, फळबाग लागवड योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. तसेच गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार आणि नाला खोलीकरण व रुंदीकरणाची कामे प्रलंबित कामे तत्परतेने पूर्ण करावीत. प्रशिक्षण देण्यात आलेल्या ग्राम रोजगार सेवकांनी लघु सिंचन योजनांची सातवी तसेच जलसाठ्याची दुसरी प्रगणनेची कामे वेळेत पुर्ण करण्याचे निर्देश ही यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती मित्तल यांनी दिले.

तसेच जालना जिल्ह्यात समस्त महाजन ट्रस्ट आणि बिजेस यांच्यासोबत मोठ्या प्रमाणावर गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवारची कामे केली जाणार आहेत. या माध्यमातून गाळ काढण्याची मोहिम हाती घेण्यात येणार आहेत. मृद व जलसंधारण योजनांच्या अंमलबजावणी नियमित आढावा घेऊन, सर्व कामे विहित कालमर्यादेत पूर्ण करावीत, जेणेकरून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक विकास साधता येईल तसेच जलसुरक्षा वाढण्यास मदत होईल, असे जिल्हाधिकारी श्रीमती मित्तल यावेळी म्हणाल्या.

 

 

-*-*-*-*-

वृत्त क्र.                                                                              दि. 4 नोव्हेंबर, 2025

 

10 नोव्हेंबरला शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा

 

 

जालना दि. 4 (जिमाका) :- जालना येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अंतिम वर्षात प्रशिक्षण घेत असलेल्या तसेच आयटीआय उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांसाठी दि.10 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता शिकाऊ भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी छत्रपती संभाजीनगर व जालना येथील नामांकित कंपनीचे प्रतिनिधी हजर राहणार आहेत. तरी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सह.प्रशिक्षणार्थी सल्लागार, मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*- 

No comments:

Post a Comment