Tuesday, 17 February 2026

‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमासाठी दोन दिवसात येणाऱ्या 15 लाखाहून अधिक भाविकांसाठी सूक्ष्म नियोजनप्रधान सचिव श्रीकर परदेशी यांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा

 




 

नवी मुंबई,दि.17(विमाका)-: ‘हिंद-दी-चादर’ या भव्य कार्यक्रमाच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी यांनी आज दूरदृश्यप्रणालीव्दारे संबंधित यंत्रणांची पूर्वतयारीची सविस्तर बैठक घेऊन आढावा घेतला. कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत सर्व विभागांनी समन्वयाने काम करून कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडावा, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

     बैठकीदरम्यान कोंकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी कोकण विभागातील संबंधित यंत्रणांनी आतापर्यंत केलेल्या कामांचा सविस्तर अहवाल सादर केला.

     या बैठकीस विभागीय अपर आयुक्त (सामान्य प्रशासन) फरोग मुकादम, अपर आयुक्त (महसूल) वैशाली इंदानी- उंटवाल, अपर आयुक्त (विकास) माणिक दिवे, अपर आयुक्त (आस्थापना) मिनल कुटे, सहआयुक्त (नगरपालिका प्रशासन) विजयकुमार म्हसाळ, सहआयुक्त (करमणूक) रविंद्र पवार, उपायुक्त (नगरपालिका) डॉ. सागर घोलप,  सहआयुक्त (विकास) डॉ.प्रदीप घोरपडे, प्रभारी माहिती उपसंचालक मनोज सानप, तहसिलदार गजानन धुमाळ उपस्थित होते.

     यावेळी कोंकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी कार्यक्रमस्थळी पायाभूत सुविधा, वाहतूक नियोजन, सुरक्षा व्यवस्था, आरोग्य सेवा, स्वच्छता व आपत्कालीन यंत्रणा आदी बाबींबाबतची तयारी पूर्णत्वाकडे जात असल्याची माहिती दिली.

      कार्यक्रमस्थळी येणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेता वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विशेष मार्गयोजना तयार करण्यात आली आहे. पोलीस विभागाकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार असून सीसीटीव्ही यंत्रणा, नियंत्रण कक्ष तसेच स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

     आरोग्य सेवांच्या दृष्टीने ग्रामीण भागात आतापर्यंत २ हजार १५९ आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आली असून, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांनी सहभाग नोंदविला आहे. कार्यक्रमस्थळी ५ तात्पुरती वैद्यकीय केंद्रे आणि एक आयसीयू उभारण्यात येणार आहे. तसेच जवळील रुग्णालयांमध्ये ३५० खाटा आणि ७५ आयसीयू खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. आरोग्य विभागामार्फत तात्पुरती वैद्यकीय पथके, रुग्णवाहिका व प्राथमिक उपचार केंद्रांची व्यवस्था केली जाणार असल्याचेही बैठकीत सांगण्यात आले.

     या कार्यक्रमासाठी निवडण्यात आलेल्या खारघर, नवी मुंबई येथील ओवे मैदानाची क्षमता एकावेळी सुमारे ५ लाख भाविकांची असून, मुख्य मंडपात ८० हजार भाविक बसू शकतील, अशी व्यवस्था करण्यात येत आहे.  लंगर व्यवस्थेसाठी सुमारे अडीच लाख भाविकांचा विचार करण्यात आला असून, १२ हजार ५०० भाविकांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. मंडप उभारणीचे काम अंतिम टप्प्यात असून, पुढील ५ दिवसांत ते पूर्ण होणार आहे.तसेच पाणीपुरवठा, स्वच्छतागृहे, वीजपुरवठा आणि प्रकाशयोजना यांसाठी संबंधित विभागांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या.      

      कार्यक्रमादरम्यान कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वय राखून कार्यवाही करावी, असे प्रधान सचिव श्रीकर परदेशी यांनी अधोरेखित केले.

     हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रचार व प्रसिध्दी हा महत्वाचा भाग असल्याने आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी कोकण विभागातील शासकीय व खासगी शाळांमध्ये आतापर्यंत राबविण्यात आलेल्या "हिंद दी चादर" कार्यक्रमाच्या प्रचार प्रसिध्दीसाठी राबविण्यात येत असलेल्या प्रभातफेऱ्या, निबंध स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, स्वच्छता मोहीम अशा विविध कार्यक्रमांचा अहवाल सादर केला.    

     कोकण विभागांतर्गत येणाऱ्या ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्हयांच्या ग्रामीण भागातील ५ लाख १७ हजार विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमात सहभाग घेतला असून, ४ हजार ३८१ फोटो आणि २ हजार १२५ व्हिडिओ हिंद दी चादर या कार्यक्रमासाठी तयार करण्यात आलेल्या https://gurutegbahadurshahidi.com या पोर्टलवर अपलोड करण्यात आले आहेत.     

    नगरपालिका आणि महापालिका क्षेत्रातील सुमारे १७ लाख विद्यार्थी विविध उपक्रमांमध्ये सहभागी झाले आहेत. कार्यक्रमाच्या प्रचारासाठी मुंबई शहर, उपनगर आणि कोकण विभागातील सर्व चित्रपटगृहांमध्ये सुप्रसिध्द गायक सतिंदर सरताज यांनी गायलेले विशेष गीत प्रदर्शित करण्यात येत आहे. तसेच मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, पनवेल, उल्हासनगर, भिवंडी या नगरपालिका आणि महानगरपालिका क्षेत्रात एकूण 219 होर्डिंग्जवर  "हिंद दी चादर" कार्यक्रमाची प्रचार प्रसिध्दी करणारे मजकूर लावण्यात आले आहेत. 

      देशभरातून या समागम कार्यक्रमास येणाऱ्या भाविकांची संख्या पाहता वाहतूक व्यवस्थेसाठी ३० पार्किंग स्थळांची निश्चिती करण्यात आली आहे. भाविकांच्या सोयीसाठी कोपरा या ठिकाणी तात्पुरता पूल उभारण्यात येत आहे. एसटी, बसेससाठी निश्चित केलेल्या वाहततळापासून मुख्य कार्यक्रमस्थळापर्यंत पायी जाणाऱ्या भाविकांसाठी मुख्य रस्त्याच्या बाजूने तातुरत्या स्वरुपातील पायवाट तयार करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या आहेत.  जेएनपीए परिसरात दररोज सुमारे २५ हजार जड वाहनांची ये-जा होत असल्याने, वाहतुकीचे नियोजन जिल्हा प्रशासन, पोलीस आणि संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून करण्यात येत आहे.

      कार्यक्रमस्थळी पाणीपुरवठा, वीजपुरवठा आणि स्वच्छतेची विशेष काळजी घेण्यात आली आहे. लंगर व्यवस्थेसाठी १ हजार गॅस सिलेंडर आणि आवश्यक इंधनाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच ४० ते ५० लाख पाण्याच्या बाटल्यांची उपलब्धता सुनिश्चित करण्यात येत आहे.

     या बैठकीस अल्पसंख्यांक विकास व औकाफ विभागाचे सचिव रूचेश जयवंशी, पुणे महसूल आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, नाशिक महसूल आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे, ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पालघर जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, रत्नागिरी जिल्हाधिकारी मनुज जिंदाल, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, पनवेल महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे, राज्यस्तरीय समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक, उपजिल्हाधिकारी (रोहयो) नवी मुंबई समागम समन्वय अधिकारी रविंद्र राठोड, इतर महसूल विभागातील इतर जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हा परिषद उप मुख्य कार्यकारी अधिकारी, औद्योगिक विकास महामंडळाचे कोकण विभागीय अधिकारी, पनवेल व नवी मुंबई महानगरपालिका उपायुक्त, महसूल, जिल्हा परिषद, शिक्षण, आरोग्य, नगरपालिका, पोलीस विभागाचे अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

-*-*-*-*-*-*-

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त जालना येथे भव्य सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

 


जालना,दि.17 (जिमाका) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्यकर्तृत्व व शौर्यावर आधारित भव्य सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई तसेच जिल्हाधिकारी कार्यालय जालना यांच्या संयुक्त विद्यमाने येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, टाऊन हॉल, जालना येथे या कार्यक्रमाचे आायोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांमधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, पराक्रम आणि लोककल्याणकारी कार्याचा गौरव करण्यात येणार आहे.

या सांस्कृतिक सोहळ्याचे अध्यक्षस्थानी पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन तथा पालकमंत्री जालना जिल्हा पंकजा गोपीनाथ मुंडे उपस्थित राहणार आहेत. तर विशेष अतिथी म्हणून आमदार श्री. विक्रम काळे, श्री. राजेश राठोड, महापौर श्रीमती वंदना मगरे, खासदार श्री. कल्याण काळे आणि श्री. संजय जाधव, आमदार सर्वश्री सतीश चव्हाण, बबनराव लोणीकर, अर्जुनराव खोतकर, नारायण कुचे, संतोष पाटील दानवे, हिकमत उढाण उपस्थित राहणार आहेत. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नु पी.एम. आणि पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांची उपस्थिती लाभणार आहे.

या सांस्कृतिक कार्यक्रमात बुधवार, दिनांक 18 फेब्रुवारी, 2026 रोजी सकाळी 11 वाजता प्रसिद्ध शाहीर अजिंक्य लिंगायत यांचा ‘जागर शिवशाहीचा’ हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहे. तसेच गुरुवार, दिनांक 19 फेब्रुवारी, 2026 रोजी सकाळी 11 वाजता शाहीर रामानंद उगले, माधवी उगले-माळी, शाहीर अप्पासाहेब उगले आणि सहकलावंताचा समुह ‘शाहिरी शिवदर्शन’ हा कार्यक्रम सादर करणार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे शौर्य, पराक्रम व त्यांच्या जीवनातील उदात्त मानवी मूल्यांची नवीन पिढीमध्ये रूजवणूक व्हावी या हेतूने या भव्य सांस्कृतिक सोहळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, टाऊन हॉल, जुना जालना येथे संपन्न होणार असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांनी केले आहे.

-*-*-*-*-*-*-

Monday, 16 February 2026

मोती तलाव येथे जिल्हास्तरीय आपत्ती व्यवस्थापन शोध व बचाव प्रशिक्षण संपन्‍न

 





जालना, दि. 16 (जिमाका): जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष आशिमा मित्तल  व निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत हदगल यांच्या मार्गदर्शनाखाली आज जालना शहरातील मोती तलाव येथील विसर्जन कुंड येथे जिल्हास्तरीय आपत्ती व्यवस्थापन शोध व बचाव साहित्य हाताळणी प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.

    या प्रशिक्षणाचे आयोजन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत करण्यात आले होते. जिल्ह्यातील महानगरपालिका, नगर परिषद व नगर पंचायत अग्निशमन विभाग तसेच होमगार्डस् दलातील कर्मचाऱ्यांना आपत्कालीन परिस्थितीत प्रभावी प्रतिसाद देण्यासाठी आवश्यक आधुनिक शोध व बचाव साहित्य हाताळणीचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यात आले.

सदर प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश पूर, जलदुर्घटना तसेच इतर आपत्कालीन परिस्थितीत त्वरित व सुरक्षित बचावकार्य करण्यासाठी संबंधित यंत्रणांची कार्यक्षमता वाढविणे हा होता. प्रशिक्षणादरम्यान जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांतर्गत नव्याने खरेदी करण्यात आलेल्या विविध आपत्कालीन साहित्याच्या वापर, देखभाल व सुरक्षित हाताळणीबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. त्यामध्ये पुढील साहित्याचा समावेश होता :

           फायबर बोट – ४

           रबर बोट – ३

           स्कुबा सेट – २

           फायर जेल ब्लँकेट – २०

           लाईफबोये – १००

           बॅटरी कटर – ९

           बॅटरी स्प्रेडर – ९

           फ्लोटींग पंप – १०

           पोर्टेबल जनरेटर – ४

           पोर्टेबल पंप – १०

           मेगाफोन – २०

           सेफ्टी नेट – १०

           लाईफ जॅकेट – २२५

           रिफ्लेक्टर जॅकेट – २२५

सदर साहित्य मनपा तसेच जिल्ह्यातील सर्व नगर परिषद व नगर पंचायत अग्निशमन विभागांना उपलब्ध करून देण्यात आले असून, आपत्कालीन परिस्थिती प्रभावीपणे हाताळण्यासाठी त्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग होणार आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.‍जिल्‍हाधिकारी श्रीमती. आशिमा मित्‍तल या होत्‍या. यावे मा.अपर जिल्हाधिकारी श्री. रमेश मिसाळ, निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण श्री. शशिकांत हदगल, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री. दिपक काजळकर, प्रभारी अग्निशमन अधिकारी, मनपा जालना श्री. संदीप दराडे तसेच मनपा जालना अग्निशमन विभाग, भोकरदन, परतूर व अंबड नगर परिषद अग्निशमन विभाग, बदनापूर, जाफ्राबाद, मंठा, घनसावंगी व तिर्थपुरी नगर पंचायत विभाग आणि होमगार्डस् विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

****

सांस्कृतिक कार्य संचालनालय व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन

 


जालना,दि.16(जिमाका) : सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई व जिल्हाधिकारी कार्यालय जालना यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दि. 18 व 19 फेब्रुवारी, 2026 रोजी जालना येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्य कर्तृत्व व  शौर्यावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमांचे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, टाऊन हॉल, जालना येथे सकाळी 11 वाजता आयोजन करण्यात आले आहे.

यामध्ये बुधवार, दि. 18 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित शाहिर अजिंक्य लिंगायत यांचा ‘जागर शिवशाहिचा’ तर गुरुवार, दि. 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित शहिर रामानंद उगले, माधवी उगले-माळी यांचा ‘शाहिरी शिवदर्शन’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी जालनाकरांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे आवाहन करण्यात आले आहे.

-*-*-*-*-*-*-*-

Wednesday, 11 February 2026

शासकीय कार्यालयात 'विना हेल्मेट' प्रवेशाला बंदी; जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचे कडक आदेश

 


 

जालना, दि.11 (जिमाका) :- जालना जिल्ह्यात रस्ते अपघातांचे वाढते प्रमाण आणि त्यामध्ये होणारी प्राणहानी रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी आज एका विशेष परिपत्रकाद्वारे जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि अभ्यागतांना दुचाकी चालवताना 'आय.एस.आय.' मार्क असलेले हेल्मेट परिधान करणे बंधनकारक केले आहे. तरी रस्ते सुरक्षेसाठी नागरिकांनी आणि शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी या मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केले आहे.

जालना मुख्यालयातील सर्व शासकीय कार्यालयांच्या अधिकारी - कर्मचाऱ्यांना दुचाकी चालविताना हेल्मेट वापरणे आता अनिवार्य असेल.  जिल्हाधिकारी कार्यालय परिसर तसेच सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये हेल्मेट परिधान केलेल्या व्यक्तींनाच (कर्मचारी व अभ्यागत) प्रवेश दिला जाईल.  प्रत्येक कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षकांमार्फत तपासणी केली जाईल. हेल्मेट नसलेल्या व्यक्तींना कार्यालय परिसरात वाहन लावण्यास सक्त मनाई असेल. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध पोलीस प्रशासन आणि प्रादेशिक परिवहन विभागामार्फत मोटर वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

कार्यालय प्रमुखांनी आपल्या कर्मचाऱ्यांना या नियमाची माहिती देऊन त्याची काटेकोर अंमलबजावणी सुनिश्चित करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अधिकारी -कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिला आहे. या आदेशाची अंमलबजावणी आजपासूनच लागू करण्यात आली आहे. प्रशासकीय शिस्त आणि रस्ते सुरक्षेसाठी मोटर वाहन अधिनियम 1988 मधील कलम 129 नुसार, दुचाकी चालक आणि पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तीने हेल्मेट वापरणे कायदेशीररीत्या अनिवार्य आहे. प्रशासकीय स्तरावर याचा आदर्श निर्माण व्हावा, या उद्देशाने जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश निर्गमित केले आहेत.

-*-*-*-*-

वृत्त क्र.                                                                    दि. 11 फेब्रुवारी, 2026

 

अंबड येथे 295 पदांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन

 

जालना, दि.11 (जिमाका):- जालना जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणींसाठी रोजगाराची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि महर्षी कणाद शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अंबड यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दि.13  फेब्रुवारी 2026 रोजी भव्य 'पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे' आयोजन करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील उमेदवारांनी रोजगार मेळाव्याच्या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता यांनी केले आहे.

उमेदवारांनी सोबत बायोडाटा (5 प्रती), शैक्षणिक कागदपत्रे आणि आधारकार्डच्या छायांकित प्रती घेऊन उपस्थित राहावे. मेळाव्यात सहभागी होण्यासाठी www.rojgar.mahaswayam.gov.in या पोर्टलवर नोंदणी करून 'SPECIAL JOB FAIR- 5 (2025-26) JALNA' या पर्यायावर 'Apply' करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक ०२४८२-२९९०३३ वर संपर्क साधावा. या मेळाव्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे केवळ नोकरीच नाही, तर स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य देणाऱ्या विविध महामंडळांचे स्टॉल्स येथे लावले जाणार आहेत. रोजगार मेळाव्यात पाच नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी प्रत्यक्ष मुलाखती घेऊन निवड करणार आहेत.  यामध्ये . लार्सन अँड टुब्रो ,पनवेल  120 पदे (बांधकाम क्षेत्रातील विविध पदे),  साई मॅनपावर (टोयोटा प्रा. लि.), जालना: 75 पदे,  भारत फायनान्शियल इन्क्लुजन लि., जालना  60 पदे,  रिद्धी सिद्धी सर्विसेस, जालना: 20 पदे,  देवाश्व होंडा शोरूम, जालना 20 पदांचा  समावेश आहे. असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

वृत्त क्र.                                                                    दि. 11 फेब्रुवारी, 2026

 

परळी वैजनाथ येथे महापशुधन एक्स्पो 2026 चे आयोजन

 

जालना, दि.11 (जिमाका) :- महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने दि. 13 ते 15 फेब्रुवारी 2026 या कालावधीत परळी वैजनाथ (जि. बीड) येथे  'भारतीय पशुपक्षी महापशुधन एक्स्पो 2026' चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन जातीवंत पशुधन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा एक अनोखा संगम ठरणार आहे. तरी जालना जिल्ह्यातील पशुपालक, तरुण उद्योजक आणि शेतकरी बांधवांनी या महोत्सवात सहभागी होऊन आपले ज्ञान व उत्पन्न वाढवावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

महापशुधन एक्स्पो 2026 या प्रदर्शनात राज्यातील व राज्याबाहेरील गायी, म्हशी, शेळ्या-मेंढ्या आणि पक्ष्यांच्या विविध प्रजातींचे दर्शन घडणार आहे. तसेच आधुनिक डेअरी फार्मिंग, चारा नियोजन आणि प्रक्रिया उद्योगांचे भव्य स्टॉल्स येथे असणार आहेत. तज्ज्ञ पशुवैद्यकांकडून पशुधनाचे आरोग्य व वैज्ञानिक संगोपनावर विशेष मार्गदर्शन दिले जाणार आहे. या प्रदर्शनामुळे शेतकऱ्यांना दुग्धव्यवसायातील जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान पाहता येईल. असे सहायक आयुक्त, पशुसंवर्धन विभाग, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

 

वृत्त क्र.                                                                    दि. 11 फेब्रुवारी, 2026

 

18 फेब्रुवारीची पेंशन अदालत आता 27 फेब्रुवारीला

 

जालना दि. 11 (जिमाका) :- जालना जिल्हा परिषदेअंतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या पेंशन अदालतीच्या 18 फेब्रुवारीच्या तारखेत बदल करण्यात आला असून आता ही अदालत शुक्रवार दि.27 फेब्रुवारी 2026 रोजी संपन्न होणार आहे.

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयाने दिलेल्या निर्देशानुसार अदालत आयोजित करण्यात आलेली आहे. तरी जिल्हा परिषदेच्या सेवानिवृत्तांनी आपल्या प्रलंबित प्रकरणाच्या संपूर्ण माहितीसह या अदालतीला दि.27 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन जालना जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र तुबाकले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-

 

वृत्त क्र.                                                                    दि. 11 फेब्रुवारी, 2026

सैनिक कल्याण विभागाची

14 मार्च रोजी ऑनलाईन परीक्षा

जालना, दि. 11 (जिमाका) :-  महाराष्ट्र राज्य सैनिक कल्याण विभाग आणि त्याअंतर्गत असलेल्या जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील रिक्त पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले होते. या विभागातील 'लिपीक टंकलेखक' (गट-क) या संवर्गातील एकूण 72 पदांसाठी ऑनलाईन परीक्षा टीसीएसमार्फत दि.14 मार्च 2026 रोजी दुपारी 1 ते 3 या वेळेत आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जालना यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

-*-*-*-*-

वृत्त क्र.                                                                    दि. 11 फेब्रुवारी, 2026

 

 सोमवारी महिला लोकशाही दिन

 

जालना दि. 11 (जिमाका) :- महिलांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने, जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवार, दि.16 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11  ते 12 या वेळेत 'जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे' आयोजन करण्यात आले आहे.

ज्या महिलांना आपल्या तक्रारी किंवा प्रश्न मांडायचे आहेत, त्यांनी आपले अर्ज दोन प्रतीत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, जालना येथे सादर करावेत. महिलांनी प्रथम संबंधित तहसीलदार यांच्याकडे लोकशाही दिनाच्या 15 दिवस आधी तक्रार नोंदवावी. तालुका स्तरावर तक्रार केल्यानंतर एका महिन्याच्या आत कार्यवाही न झाल्यास, संबंधित महिला जिल्हास्तरीय लोकशाही दिनात आपली तक्रार मांडू शकतात. तहसीलदार आणि बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी तक्रारदारास एका महिन्याच्या आत अंतिम उत्तर देणे बंधनकारक आहे.

जिल्ह्यातील पिडीत महिलांनी आपल्या तक्रारींसाठी तालुकास्तरावर तहसील कार्यालय आणि जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी कार्यालय किंवा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधून या उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जालना यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-

वृत्त क्र.                                                                    दि. 11 फेब्रुवारी, 2026

 

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना;  

ई-केवायसीसाठी पोर्टल पुन्हा सुरू

 

जालना दि. 11 (जिमाका) :- महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागांतर्गत राबविण्यात येत असलेल्या "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजनेतील ज्या लाभार्थी महिलांच्या ई-केवायसी प्रक्रियेत तांत्रिक चुका झाल्या आहेत, अशा महिलांसाठी सुधारणा करण्याची संधी दि.31 मार्च 2026 पर्यंत उपलब्ध करून देण्यात आली आहे. तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जातील त्रुटीची सुधारणा करुन या या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे. 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरताना किंवा ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करताना अनेक महिलांनी कुटुंबातील सदस्यांच्या नोकरीविषयक माहितीमध्ये नजरचुकीने चुकीचा पर्याय निवडला आहे. विशेषतः कुटुंबातील सदस्य सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ किंवा स्थानिक संस्थेत नियमित/कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत किंवा कसे? तसेच कुटुंबातील सदस्य सेवानिवृत्ती वेतन घेत आहेत किंवा कसे? या पर्यायांची निवड करताना झालेल्या चुकांमुळे पात्र महिलांना लाभ मिळण्यास तांत्रिक अडचणी येत आहेत.

-*-*-*-*-

 

 

 

सैनिक कल्याण विभागाची 14 मार्च रोजी ऑनलाईन परीक्षा

 


जालना, दि. 11 (जिमाका) :-  महाराष्ट्र राज्य सैनिक कल्याण विभाग आणि त्याअंतर्गत असलेल्या जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील रिक्त पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले होते. या विभागातील 'लिपीक टंकलेखक' (गट-क) या संवर्गातील एकूण 72 पदांसाठी ऑनलाईन परीक्षा टीसीएसमार्फत दि.14 मार्च 2026 रोजी दुपारी 1 ते 3 या वेळेत आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जालना यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

-*-*-*-*-

वृत्त क्र.                                                                    दि. 11 जानेवारी, 2026

 

 सोमवारी महिला लोकशाही दिन

 

जालना दि. 11 (जिमाका) :- महिलांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने, जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवार, दि.16 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11  ते 12 या वेळेत 'जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे' आयोजन करण्यात आले आहे.

ज्या महिलांना आपल्या तक्रारी किंवा प्रश्न मांडायचे आहेत, त्यांनी आपले अर्ज दोन प्रतीत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, जालना येथे सादर करावेत. महिलांनी प्रथम संबंधित तहसीलदार यांच्याकडे लोकशाही दिनाच्या 15 दिवस आधी तक्रार नोंदवावी. तालुका स्तरावर तक्रार केल्यानंतर एका महिन्याच्या आत कार्यवाही न झाल्यास, संबंधित महिला जिल्हास्तरीय लोकशाही दिनात आपली तक्रार मांडू शकतात. तहसीलदार आणि बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी तक्रारदारास एका महिन्याच्या आत अंतिम उत्तर देणे बंधनकारक आहे.

जिल्ह्यातील पिडीत महिलांनी आपल्या तक्रारींसाठी तालुकास्तरावर तहसील कार्यालय आणि जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी कार्यालय किंवा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधून या उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जालना यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-

वृत्त क्र.                                                                    दि. 11 जानेवारी, 2026

 

 

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना;  

ई-केवायसीसाठी पोर्टल पुन्हा सुरू

 

जालना दि. 11 (जिमाका) :- महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागांतर्गत राबविण्यात येत असलेल्या "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजनेतील ज्या लाभार्थी महिलांच्या ई-केवायसी प्रक्रियेत तांत्रिक चुका झाल्या आहेत, अशा महिलांसाठी सुधारणा करण्याची संधी दि.31 मार्च 2026 पर्यंत उपलब्ध करून देण्यात आली आहे. तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जातील त्रुटीची सुधारणा करुन या या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे. 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरताना किंवा ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करताना अनेक महिलांनी कुटुंबातील सदस्यांच्या नोकरीविषयक माहितीमध्ये नजरचुकीने चुकीचा पर्याय निवडला आहे. विशेषतः कुटुंबातील सदस्य सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ किंवा स्थानिक संस्थेत नियमित/कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत किंवा कसे? तसेच कुटुंबातील सदस्य सेवानिवृत्ती वेतन घेत आहेत किंवा कसे? या पर्यायांची निवड करताना झालेल्या चुकांमुळे पात्र महिलांना लाभ मिळण्यास तांत्रिक अडचणी येत आहेत.

-*-*-*-*-

 

Tuesday, 10 February 2026

जालना जिल्हाधिकारी कार्यालयात ‘सेफर इंटरनेट डे’ निमित्त विशेष कार्यशाळा संपन्न

 




जालना, दि.10 (जिमाका) : जिल्हा सूचना विज्ञान केंद्र (NIC) यांनी ‘सेफर इंटरनेट डे’ निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन, येथे आज इंटरनेटचा सुरक्षित व जबाबदारीने वापर याबाबत जनजागृती करण्यासाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन केले होते. इंटरनेटचा सुरक्षित वापर, सायबर सुरक्षा आणि ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना याविषयी तज्ञ  प्रा. संदिप काळे यांनी मार्गदर्शन केले.    

या कार्यशाळेचा मुख्य उद्देश शासकीय कामकाजात तसेच वैयक्तिक स्तरावर इंटरनेट वापरताना घ्यावयाची काळजी आणि तांत्रिक बाबींबाबत माहिती देणे हा आहे.  सर्व  शासकीय कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सूचना विज्ञान केंद्र यांनी केले आहे.

या कार्यशाळेस निवासी उपजिल्हाधिकरी शशिकांत हदगल, प्रा. संदीप काळे, जिल्हा सूचना विज्ञान केंद्राचे भूषण लोखंडे, रामेश्वर भोसले, दिपेंद्र जयस्वाल यांच्यासह विविध विभागातील अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती.  

-*-*-*-*-*-*-*-