Friday, 26 September 2025

जालना तालूक्यातील रोहनवाडी आणि पानशेंद्रा भागात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानग्रस्त भागाची उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केली पाहणी





 

जालना, दि.26 (जिमाका) : जालना जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीने झाल्याने जिल्ह्यातील अनेक भागातील शेतपिकांचे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर आज राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री श्री. उदय सामंत यांनी आज जालना तालूक्यातील रोहनवाडी आणि पानशेंद्रा या गावात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतपिकाची पाहणी केली.

यावेळी श्री. सामंत यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधुन, या नैसर्गिक संकटाच्या वेळी शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असुन, बाधीत शेतकऱ्यांना शासन सर्वोतोपरी मदत करणार असल्याचे व त्यांना न्याय मिळवून देण्याची आमची जबाबदारी आहे असे त्यांनी यावेळी सांगितले. कृषिमंत्र्यांनी सगळ्या उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार यांना सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पंचनामे करुन, शासनामार्फत नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत पोहोचविण्यात येणार असल्याचेही श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले.

यावेळी आमदार अर्जुन खोतकर, उपविभागीय अधिकारी श्री. दौड, तहसिलदार श्रीमती छाया पवार, मंडळ अधिकारी, तलाठी यांच्यासह रोहनवाडी आणि पानशेंद्रा या गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधून शेतकऱ्यांच्या समस्या व अडचणी जाणून घेतल्या.

-*-*-*-*-*-


कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी अतिवृष्टीने झालेल्या नुकसानग्रस्त शेतपिकांची केली पाहणी

 






         जालना, दि.26(जिमाका): जालना जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीने झाल्याने जिल्ह्यातील अनेक भागातील शेतपिकांचे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा  यांनी आज बदनापूर तालूक्यातील शेलगाव या गावात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतपिकाची पाहणी केली. यावेळी श्री. लोढा म्हणाले की, शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाने  झालेल्या नुकसानीनुसार योग्य पंचनामे करावे. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनामार्फत मदत देण्यात येणार आहे. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असुन, त्यांनी काळजी करू नये. अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून बाधीत शेतकऱ्यांना तात्काळ मदत पोहचविण्यात येणार असल्याचेही श्री. लोढा यांनी यावेळी सांगितले.

यावेळी आमदार नारायण कुचे, उपविभागीय अधिकारी श्री. दौड, तहसिलदार, श्री. हेमंत तायडे, सरपंच, मंडळ अधिकारी, तलाठी यांच्यासह शेलगाव येथील गावकऱ्यांची उपस्थिती होती.

-*-*-*-*-*-*-

28 सप्टेंबर रोजी लोक अदालतीचे आयोजन

 


जालना दि.26 (जिमाका) : तहसिल  घनसावंगी  यांच्या न्यायालयात प्रलंबित असलेल्या अर्धन्यायिक प्रकरणांच्या तातडीने निपटारा व्हावा तसेच नागरीकांना जलद न्याय मिळावा या उद्देशाने 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 महसुल सेवा पंधरवडा अंतर्गत “ न्याय आपल्या दारी ” या संकल्पनेतुन रविवार 28 सप्टेंबर  2025 रोजी  सकाळी 11.00 वाजता तहसिलदार तथा तालुका  दंडाधिकारी कार्यालय घनसावंगी येथे लोक अदालत आयोजित केली आहे.

लोक अदालतमध्ये तडजोड होऊ शकणाऱ्या महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे तरतुदीनुसार मामलदार कोर्ट ॲक्ट ( 15 च्या कलम 143, कुळकायदा दावे अंतर्गत अर्धन्यायीक प्रकरणांमध्ये समेट/तडजोड  करायची असल्यास विहीत नमुन्यामध्ये अर्ज करण्यासाठी सर्व संबंधीत नागरीक शासकीय कार्यालये यांना याद्वारे सुचित करावे. तरी सर्व नागरिकांना विनंती आहे की, अर्धन्यायीक प्रकरणांमध्ये तातडीने न्याय मिळवून घेण्यासाठी या लोकअदालतीचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपात्रांसह वेळेवर उपस्थित राहावे. अशी माहिती तहसिलदार घनसावंगी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

-*-*-*-*-*-*-

 

जिल्ह्यात यलो अलर्ट; सोसाट्याचा वारा, पावसाची शक्यता दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

 


 

जालना दि.26 (जिमाका) : प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, कुलाबा, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार जालना जिल्हयात दि. 26 सप्टेंबर  ते  दि. 28 सप्टेंबर 2025 या कालावधीत यलो  (Yellow) अलर्ट जारी केला असुन तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (ताशी 30-40 कि.मी.प्र.ता. वेगाने) येण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच दि. 29  सप्टेंबर 2025 रोजी मध्यम स्वरुपाचा  व दि.30 सप्टेंबर 2025 रोजी   हलका त मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनातर्फे जिल्ह्यातील नागरीकांना खालीलप्रमाणे दक्षता घेणेबाबत आवाहन करण्यात येत आहे.

            मेघगर्जनेच्या वेळी, वीजा चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहू नये. वीजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. गडगडाटीच्या वादळादरम्यान व वीजा चमकतांना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. वीजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा, ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल / सायकल यांचेपासून दूर रहावे,मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्वजांचे खांब, विद्युत/दिव्यांचे खांब, धातुचे कुंपण, विद्युतवाहिनी अथवा ट्रॉन्सफोर्मजवळ थांबू नये. सर्व प्रकारच्या अर्थातरी लटकणा-या / लोंबणा-या तारांपासून दूर रहावे.वीजा चमकत असताना मोकळ्या जागेवर असल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्ही गुडघ्यांच्यामध्ये झाकावे, जमीनीशी कमीतकमी संपर्क असावा.अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी बांधवांनी वेळीच नियोजन करावे. शेतक-यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल किंवा त्याप्रमाणे नियोजन केले असेल, तर सदर मालाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी,जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे.

सर्व नागरीकांनी वादळी वारे, वीज पासून स्वतः सह जनावरांचे संरक्षण होईल याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी, आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना 02482-223132 वर तसेच नजीकचे तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन यांचेशी संपर्क साधाण्याचे आवाहजन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण गणेश महाडिक यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-*-

मॅजिक आयटीआय जालना इन्क्यूबेशन सेंटरच्या माध्यमातून जिल्ह्यातील युवकांना उद्योजक होण्याची संधी : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा § ‘मॅजिक आयटीआय जालना इनक्युबेशन सेंटर’ चे उद्घाटन

 





 

जालना, दि.26(जिमाका): जालना जिल्ह्यातील युवकांच्या उद्योग विषयक कल्पनेनुसार आपला स्वतंत्र उद्योग सुरु करुन उद्योजक होण्यासाठी मॅजिक इन्क्यूबेशन सेंटरच्या माध्यमातून सुवर्णसंधी निर्माण झाली असल्याचे राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.

येथील हुतात्मा जनार्दनमामा नागापुरकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या परिसरात सुरु करण्यात आलेल्या मॅजिक इन्क्युबेशन सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी श्री. लोढा हे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, पोलीस अधीक्षक श्री. अजयकुमार बन्सल, अपर जिल्हाधिकारी रिता मेत्रेवार, कौशल्य विकास विभागाच्या विभागीय उपआयुक्त विद्या शितोळे, कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त गणेश चिमणकर, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाचे सहसंचालक पुरूषोत्तम देवतळे, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी अतुल केसकर आणि शासकीय आयटीआयचे प्राचार्य प्रविणकुमार उखळीकर, मॅजिक संचालक मंडळाचे आशिष गर्दे, रितेश मिश्रा, नितीन काबरा, सुनील रायठ्ठा, प्रसाद कोकिळ, केदार देशपांडे, प्रशांत देशपांडे, मिलिंद कांक, सुरेश तोडकर तसेच मॅजिकची यंग टीमचे यशराज पिट्टी आणि अनुज बन्सल यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी श्री. लोढा पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आपल्या नाविन्यपूर्ण कल्पना प्रत्यक्षात उतरवून मॅजिक इन्क्युबेशन सेंटरच्या सहकार्याने कौशल्याधारित उद्योग सुरू करून “आयडीया ते इन्कम टॅक्स धारक”हा प्रवास साध्य करावा. आपल्या नाविन्यपूर्ण कल्पना उद्योगामध्ये रूपांतरित करून त्या माध्यमातून स्वतःचे उत्पन्न वाढविणे व रोजगार निर्मिती करणे एवढ्यावरच न थांबता. त्यांनी आपले उत्पन्न वाढवून आयकरधारक होण्याची संधी या इन्क्युबेशन सेंटरच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. आई-वडिलांच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी युवक-युवतींनी नवकल्पना मांडून यशस्वी उद्योजक व व्यवसायिक बनावे, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमास उपस्थित उमेदवारांशी संवाद साधून, आयटीआयमध्ये कोणते अभ्यासक्रम अपेक्षित आहेत याबाबत त्यांनी प्रत्यक्ष विचारणा केली. यावेळी उमेदवारांनी सुचविलेल्या ड्रोन ऑपरेटर, सोलार टेक्नीशियन, इलेक्ट्रिक व्हेइकल टेक्नीशियन, ब्युटी थेरपिस्ट आदी अभ्यासक्रम दि. 08 ऑक्टोबर, 2025 पर्यंत हमखास रोजगार देणारे प्रशिक्षण म्हणून सुरू करण्याचे निर्देश व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागास त्यांनी यावेळी दिले.

यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल म्हणाल्या की, जिल्ह्यातील युवकांना मॅजिक सेंटरच्या माध्यमातून आपला स्वत:चा स्टार्टअप सुरु करण्याची संधी निर्माण झाली आहे. अशी संधी  देणारा हा राज्यातील पहिला प्रकल्प आहे. या मॅजिक सेंटरमुळे भविष्यात खुप चांगले परिणाम आपणांस पाहण्यास मिळणार आहे. उद्योग उभारण्यासाठी लागणारे डिझाईन आणि भांडवल यासाठीचे मार्गदर्शन व मदन या सेंटरद्वारे उपलब्ध झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत-जास्त नवसंकल्पनाधारकांनी मॅजिक इन्क्युबेशन सेंटरमध्ये आपली नोंदणी करून, यशस्वी उद्योजक बनावे. तसेच ग्रामीण भागातील नवसंकल्पनाधारक युवक-युवतींसाठी तालुकास्तरावर मॅजिकप्रमाणे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कौशल्य विकास विभागाचे कौशल्य विकास अधिकारी भुजंग रिठे, आत्माराम दळवी, डॉ. अमोल परिहार, अमोल बोरकर, प्रदीप डोळे, दिपक पालवे, अमर तुपे तसेच मॅजिकचे अधिकारी राघवेंद्र कुलकर्णी, शशीकांत तिवारी, प्रिती कामठे, कृष्णा टेकाळे, आयेशा मन्सुरी, मिरा चितांमणी, गौरव पटेल यांनी सहकार्य घेतले.

यावेळी कार्यक्रमास येथील जिल्ह्यातील उद्योजक,  शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील अधिकारी-कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पूरग्रस्त पिठोरी सिरसगावाची केली पाहणी



      जालना, दि.26 (जिमाका) : जालना जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीने झाल्याने जिल्ह्यातील अनेक भागातील शेतपिकांचे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री  रामदास आठवले यांनी (दि.25) रोजी अंबड तालुक्यातील पिठोरी सिरसगावात अतिवृष्टी झाल्याने सर्व गाव पुराचे पाणी खाली आले होते, या गावाची पाहणी करुन नागरिकांशी संवाद साधुन त्यांनी या आसमानी संकटात मराठवाड्यातील शेतीचे अतोनात नुकसान झालेले आहे. या नैसर्गिक संकटात शासन आपल्या पाठीशी असल्याचे आहे. तसेच प्रशासनाने तात्काळ पंचनामे करुन बाधीत नागरिकांना मदत करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

यावेळी शेतकऱ्यांनी मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहिर करावा अशी मागणी करत आपल्या समस्या श्री. आठवले यांच्यासमोर मांडल्या असता, त्यांनी मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतपिकांची नुकसान भरपाई करण्यासाठी  केंद्र  सरकारद्वारे राज्याला विशेष पॅकेज मिळवून देणार असल्याचे आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

यावेळी उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, तहसिलदार विजय चव्हाण, मंडळ अधिकारी, तलाठी यांच्यासह पिठोरी सिरसगावातील शेतकऱ्यांशी संवाद साधून शेतकऱ्यांच्या समस्या व अडचणी जाणून घेतल्या.


Thursday, 25 September 2025

सुधारीत दौरा कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा 26 सप्टेंबर 2025 रोजी जालना जिल्हा दौरा

 


  जालना दि.24 (जिमाका) : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा हे जालना जिल्‌ह्याच्या दौऱ्यावर येत असुन त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीप्रमाणे शुक्रवार  दि. 26  सप्टेंबर 2025 दुपारी 1.55 वाजता हुतात्मा जनार्धन मामा नागापूरकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जालना येथे आगमन. दुपारी 2.00 वाजता इन्क्युबेशन सेंटरच्या उद्घाटनास मुख्य अतिथी म्हणुन उपस्थिती. दुपारी 3.00 वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जालना येथील जागेवर झालेल्या अतिक्रमण विषया संदर्भात बैठक दुपारी 3.30  वाजता शॉर्ट टर्म कोर्सबाबत जालना जि.व्य.शि.प्र. विभागाची बैठक.सायंकाळी 4.30 वाजता पुरग्रस्त शेतकऱ्यांची भेट. स्थळ – मु. पो. शेलगाव, ता. बदनापूर, जि. जालना सायंकाळी 5.00 वाजता मु. पो. शेलगाव, ता. बदनापुर जि. जालना येथून छत्रपतीसंभाजीनगरकडे प्रयाण.

-*-*-*-*-*-