जालना,
दि.26 (जिमाका) : जालना जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी, प्रगतीसाठी तसेच शासनाच्या
सर्व योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी आपण कटिबध्द असल्याचे प्रतिपादन राज्याच्या पर्यावरण
व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन तथा जालना पालकमंत्री पंकजा गोपीनाथ मुंडे यांनी केले.
भारताच्या
77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त येथील पोलीस मुख्यालय मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण
पालकमंत्री पकंजा गोपीनाथ मुंडे यांच्या हस्ते आज झाले त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी आमदार सर्वश्री राजेश राठोड, अर्जुन
खोतकर, बबनराव लोणीकर, नारायण कुचे जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, जि.प. मुख्य कार्यकारी
अधिकारी मिन्नू पी.एम., पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधिक्षक आयुष नोपाणी,
अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ, निवासी उपजिल्हाधिकारी
शशिकांत हदगल यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी
पालकमंत्री श्रीमती मुंडे म्हणाल्या की, लोकशाही प्रणालीचा दीपस्तंभ ठरलेली भारतीय
राज्यघटना 26 जानेवारी, 1950 रोजी राष्ट्राला अर्पण करण्यात आली. जगामध्ये भारत देश
एक प्रजासत्ताक गणराज्य म्हणून उदयास आला. नागरिकांना राज्यकारभारात सहभागी होण्याचा
अधिकार मिळाल्याने या दिवसाला विशेष महत्व आहे. घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे यासाठी अमुल्य योगदान लाभले.
विविध योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे आपला जालना जिल्हा विविध क्षेत्रात सतत अग्रेसर राहिला असुन, जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून अतिशय आनंद आणि अभिमान
असल्याचे ही त्या यावेळी म्हणाल्या.
जिल्ह्यात
मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियान अंतर्गत ग्राम विकास विभागाच्यावतीने या अभियानाची
अंमलबजावणी करण्यात येत असून ग्रामीण, भागातील स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून काम
करणाऱ्या ग्राम पंचायती, पंचायत समिती, जिल्हा परिषदांना कामगिरीनूसार प्रोत्साहित
करण्यासाठी हे अभियान सुरु करण्यात आले आहे. तसेच मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ता
योजना ही महाराष्ट्र शासनाची एक नवीन योजना आहे, जी शेतकऱ्यांसाठी शेत आणि पाणंद रस्त्यांची
समस्या सोडवण्यासाठी सुरू केली आहे. कृषी विभागामार्फत सन 2025-26 अंतर्गत जिल्ह्यातील
सुमारे 15 हजार शेतकऱ्यांना यांत्रिकीकरण, ठिबक, तुषार, शेततळे, आस्तारीकरण, फळबाग
लागवड, सामुहिक शेततळे, कांदाचाळ, क्षेत्र विस्तार, संरक्षित शेती इत्यादी बाबीसाठी
76 कोटी रुपयांचा लाभ देण्यात आले आहे. तसेच प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजने अंतर्गत 96 लाभार्थ्यांना 7 कोटी
रुपयांचे कर्ज तसेच 2.69 कोटी रुपयांचे अनुदान वितरीत करण्यात आले आहे. शेतकऱ्यांसाठी
नविन विहिर, दुरुस्ती व इतर लाभांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना
अंतर्गत 11 कोटी रुपये तर बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत 30 लाख रुपये मंजूर
करण्यात आले आहे. जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत समावेश करण्यात आलेल्या 44 गावामध्ये
1 हजार 248 कामे पूर्ण झाली आहेत. गाळयुक्त धरण गाळमुक्त शिवार योजनेअंतर्गत सुमारे
5 लाख घनमिटर गाळ काढण्यात आला. तसेच अमृत सरोवर अंतर्गत सर्व कामे पुर्ण करण्यात आल्याचे
त्यांनी सांगितले. राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत कुक्कुट पालनाचे 2 प्रकल्प
पूर्णत्वास येत असून, शेळी-मेंढी पालनाचे 4 प्रकल्प जिल्ह्यात कार्यान्वित झालेले
आहेत.
जलजीवन
मिशन कार्यक्रमातंर्गत जिल्ह्यासाठी 733 योजना मंजूर असुन, यापैकी 414 योजनांची कामे
प्रगतीपथावर आहेत. स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी सानुग्रह योजने अंतर्गत 2025-26 मध्ये
अपघातात मृत्यू झालेल्या तसेच अपंगत्व आलेल्या जिल्ह्यातील एकुण 88 शेतकऱ्यांच्या वारसदारांना
1.76 कोटी रुपये सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात आले आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील
नागरिकांना चांगल्या आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी अंबड आणि घनसावंगी येथे 100
खाटांचे रुग्णालय रुग्ण सेवेसाठी सुरु होणार आहे. जिल्ह्यात
बालविवाह रोखण्यासाठी चांगले काम झाले असुन, महिला व बालविकास विभागाला 152
बालविवाह रोखण्यात यश आले आहे.
जिल्हा
परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत जिल्ह्यात ‘सक्षम जालना’ हा उपक्रम राबविण्यात
येत आहे. यामध्ये जिल्ह्यातील 100 शाळांची निवड करण्यात आली आहे. जालना तालूक्यातील
10 शाळांमध्ये ‘पढो जालना’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. तसेच शाळांची शैक्षणिक गुणवत्ता
वाढविण्यासाठी व भौतिक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्ह्यातील 20 शाळांची ‘पीएम
श्री शाळा’ मध्ये निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र
राज्याच्या क्रीडा धोरणाअंतर्गत जालना जिल्हा क्रीडा संकुलाच्या पहिल्या टप्प्यातील विकासकामे
पूर्ण झाली असुन, दूसऱ्या टप्प्यातील विकासकामे प्रगतीपथावर आहेत. तसेच जिल्ह्यातील
प्रत्येक तालूक्याच्या ठिकाणी अत्याधुनीक सुविधा असलेले तालूका क्रीडा संकुल विकसीत
करण्यात येत आहे. याद्वारे अद्ययावत
क्रिडा सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ अंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील
1 हजार 650 बेरोजगार युवकांची शिकाऊ प्रशिक्षणार्थी म्हणुन निवड करण्यात आलेली आहे.
राज्य शासनाच्या महत्वकांक्षी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती
कार्यक्रम योजनेच्या माध्यमातून मागील वर्षी 325 तर यावर्षी 255 नवीन उद्योग उभे राहिले
आहेत. तसेच जिल्ह्यातील निर्यातक्षम उद्योगांची क्षमतावृध्दीसाठी फेब्रूवारी-2026 मध्ये
‘IGNITE’ ‘महा एक्सपोर्ट कन्व्हेन्शन’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 योजनेकरीता जिल्ह्यातील 50 उपकेंद्रासाठी
693 हेक्टर जमीन प्रदान केली आहे. या योजने अंतर्गत जालना जिल्ह्यात 17 ठिकाणी 84 मेगावॅट
क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त जिल्ह्यात
32 उपकेंद्राकरीता 152 मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाची उभारण्याचे काम प्रगतीपथावर
आहे. तसेच केंद्र सरकार तर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘पीएम सुर्यघर मुफ्त बीजली योजने’
अंतर्गत मॉडेल सोलार व्हिलेज स्पर्धेचे आज उद्घाटन होत आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधी याच्या पुण्यतिथी निमित्त राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय
स्तरावर कुष्ठरोग निवारण दिन साजरा करण्याबाबत केंद्रशासनाने निर्देश जारी केले आहेत.
जिल्ह्यात ‘स्पर्श’ कुष्ठरोग जनजागृती अभियान अंतर्गत 30 जानेवारी रोजी ‘कुष्ठरोग निवारण
दिन’ तसेच 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी या पंधरवड्यात विविध आरोग्य शिक्षणाचे कार्यक्रम
राबविण्यात येणार आहेत. तसेच आज होणाऱ्या ग्रामसभेमध्ये ‘स्पर्श कुष्ठरोग जनजागृती
मोहिम’ बाबत ‘कुष्ठरोग मुक्त गाव’ करुन भेदभाव समाप्त करुन, सन्मानाची वागणूक देण्याचे
आवाहन केले. सार्वजनीक आरोग्य विभागामार्फत 1 ते 7 फेब्रुवारी, 2026 या कालावधीत ‘पॉलिएटीव्ह केअर कार्यक्रम’ राबविण्यात येणार आहे.
इयत्ता बारावीची लेखी परीक्षा 10 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत तर इयत्ता
दहावीची परीक्षा 20 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत होणार असून, या परीक्षांमध्ये
कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येणार आहे. या परीक्षांसाठी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा
देवून, विद्यार्थ्यांनी आनंददायी तसेच तणावमुक्त वातावरणात परीक्षा देण्याचे आवाहन
ही पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी केले.
यावेळी कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्वांना महिला बालविकास विभागामार्फत बालविवाह प्रतिबंध – बालविवाह मुक्त भारत शपथ देण्यात
आली.
ध्वजारोहण कार्यक्रमानंतर पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते विविध लाभर्थ्यांना
विविध लाभ व पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये पी.एम.ए.वाय घरकुल लाभार्थ्यांना
चावी वाटप. ओबीसी महामंडळ व वसंतराव नाईक महामंडळ अंतर्गत ट्रॅक्टर व आयशर वाटप. पोलीस
अधिक्षक कार्यालय श्री. भगवान बाळु नरोडे, पोलीस उप निरीक्षक पोलीस ठाणे अंबड यांना
केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक प्रदान करण्यत आले. तसेच राज्यस्तरीय चतुर्थ चरण पात्र
विद्यार्थी चेतन सतिष हिवाळे, साहिल सुनिल रोजेकर, ओम शिवाजी सपकाळ, स्वराज संदिप नेमाने,
प्रविण शिवाजी गावंदे, साई सोमिनाथ वरपे, साईराज मोहन सपकाळ, प्रथमेश संजय अवघडकर,
आदित्य संजय फुके, सुमित विलास गिरी, साई विशाल पवार, साई सचिन श्रीवास्तव यांचा गौरव
करण्यात आला. तसेच रोहन लक्ष्मण वाघमारे (तलवारबाजी), आदित्य आसाराम घुले (बुध्दीबळ), एकनाथ बाळाजी सुराशे (सॉफ्टबॉल) यांना
जिल्हा क्रीडा गुणवंत पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर श्रीमती करुण अच्युत मोरे (युवती),
स्वामी विवेकानंद आश्रम किन्होळा ता. बदनापुर जि. जालना (संस्था) यांना जिल्हा युवा
पुरस्कार प्रदान करण्यात आला. उप प्रादेशिक परिवहन कार्यालय जालना यांच्या तर्फे घेण्यात
आलेल्या रस्ता सुरक्षा विषयक प्रश्न मंजुषा मध्ये विशेष प्राविण्य मिळविलेले विष्णु
राजेश मिठे, गौतम दिगंबर वाढेकर, अभिषेक अर्जुन लोणके, गोविंद परमेश्वर भोसले, प्रियंका
संतोष पिठोरे,प्रियंका भगवान रोडे,करण केदारनाथ कोरडे,पुजा रामप्रसाद गवते, आदित्य
ज्ञानदेव अंभोरे, सिध्दांत रामेश्वर शिंगरे या विद्यार्थ्यांचा पुरस्कार देवून गौरविण्यात
आले. इन्स्पायर अवॉर्ड मानक स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या कु. साक्षी रविंद्र
ना-हेडा कु. आरुषी विजय काकरवाल तर डॉ.ए.पी.जे.
अब्दुल कलाम इंन्टरनॅशनल फा. यांचेवतीने स्नेहल कैलास पवार, कु. शबनम गुलाब बागवान,
सार्थक तुपे या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी शहीद सैनिक श्री. किशोर
पारवे हे युध्दजन्य कर्तव्य बजावतांना ऑपरेशन स्नो लेपर्डमध्ये वीर गती प्राप्त झाले.
त्यांच्या अदम्य साहस व बलिदान सन्मानार्थ महाराष्ट्र शासन सैनिक कल्याण विभाग पुणे
यांचेतर्फे पालकमंत्री यांचे हस्ते वीरपत्नी श्रीमती कविता किशोर पारवे यांना ताम्रपट
प्रदान करुन गौरविण्यात आले. गोरक्षण पांजरपोळ, परभणी ॲग्रो टेक प्रा. लि. यांना महाराष्ट्र
शुध्द देशी गोवंश सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले.
प्रारंभी पोलीस दलाच्यावतीने राष्ट्रगीत
व राज्यगीत सादर करण्यात आले व राष्ट्रध्वजास सलामी देण्यात आली. यानंतर पालकमंत्री
यांनी पोलीस परेडचे निरीक्षण केले. यावेळी पोलीस, होमगार्ड, सैनिक शाळेचे विद्यार्थी,
एनसीसीच्या विद्यार्थ्यांना सलामी देण्यात आली. विविध विभागांनी चित्ररथाद्वारे योजनांचे
सादरीकरण केले. तसेच विविध शालेय विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतीक कार्यक्रमाचे सादरीकरण
केले.
-*-*-*-*-*-*-