Wednesday, 2 April 2025

मिशन लक्ष्यवेध अंतर्गत खाजगी अकादमीचे सक्षमीकरणाच्या आर्थिक सहाय्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

 


जालना,दि.2 (जिमाका) :  महाराष्ट्र राज्यात क्रीडा संस्कृतीचे संवर्धन, प्रचार, प्रसार व जोपासना करण्यासाठी व प्रतिभावंत खेळाडु तयार करण्यासाठी शासन सतत प्रयत्नशील आहे. राज्यातील खेळाडुनी ऑलिंम्पिक सारख्या अंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदके संपादित करण्याकरिता नियोजनबध्द प्रयत्न होणे गरजेचे आहे. राज्यातील खेळाडूंसाठी क्रीडा प्रशिक्षण यंत्रणा, क्रीडा विषयक पायाभुत सुविधा, क्रीडा वेधकशास्त्र, क्रीडा स्पर्धाचे आयोजन, क्रीडा पुरस्कार व प्रोत्साहन, खेळाडुंकरीता करीअर मार्गदर्शन व खेळाडुंच्या क्षमता विकासासाठी देशी/विदेशी प्रशिक्षक व संस्थाचा सहयोग हे सर्व घटक विकसीत करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने "मिशन लक्षवेध" या महत्त्वकांक्षी योजनेची अंमलबजाणी राज्यामध्ये करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मिशन लक्षवेध अंतर्गत निवडण्यात आलेल्या अॅथलेटिक्स, आर्चरी, बॅडमिंटन, बॉक्सिंग, हॉकी, लॉनटेनिस, रोईंग, शटींग, सेलींग, टेबल टेनिस, वेटलिफटींग, कुस्ती या 12 क्रीडा प्रकारांच्या राज्यातील उत्तम खेळाडु निर्माण करणा-या खाजगी अकादमी आर्थिक सहाय्य देऊन अश्या संस्थाचे सक्षमीकरण करण्यात येणार आहे.

मिशन लक्षवेध अंतर्गत खाजगी अकादमींना आर्थिक सहाय्य करावयाच्या दृष्टीने सबंधित अकादमी मधील खेळाडु, क्रीडा मार्गदर्शक, सहाय्यक प्रशिक्षक, प्रशिक्षणासाठी उपलब्ध पायाभूत सूविधा व त्यांचा स्तर, क्रीडा साहित्य व क्रीडा अकादमीच्या कामगिरींचे गुणांकन करण्यात येऊन 35 ते 50 गुण प्राप्त करणा-या संस्था "क" वर्ग, 51 ते 75 गुण प्राप्त करणा-या संस्था "ब" वर्ग, 76 ते 100 गुण प्राप्त करणा-या संस्था "अ" वर्ग अश्या प्रकारे वर्गीकरण करण्यात येणार आहे. "क" वर्ग अकादमींना वार्षिक रु.10.00 लक्ष, 'ब' वर्ग अकादमींना वार्षिक रु.20.00 लक्ष, "अ" वर्ग अकादमींना वार्षिक रु.10.00 लक्ष आर्थिक सहाय्य, पायाभूत क्रीडा सूविधा उभारणी, क्रीडा सुविधा उन्नत करणे, प्रशिक्षक मानधन, क्रीडा व प्रशिक्षण उपकरणे इ. बाबींवर खर्च करण्यासाठी देण्यात येणार आहे.त्यानुसार इच्छुक संस्थानी अधिक माहिती व अर्जची नमुन्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जालना येथे संपर्क साधावा व सदरचा अर्ज दि. 15 एप्रिल 2025 पर्यंत कार्यालयीन वेळेत आवश्यक कागदपत्रासह परीपूर्ण भरुन द्यावा.

तरी जालना जिल्हातील इच्छुकांनी या योजनेचा जास्तीत-जास्त लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकरी, संजय गाढवे यांनी  प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment